मराठीत विज्ञानकथा म्हणावी तशी बहरली नाही. म्हणूनच नव्या विज्ञानकथेच्या शोधातील सदर..
२जानेवारी २१२१. आज आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचा पहिला दिवस. यंदा परिषदेचे आयोजन करण्याचा lok04मान पुण्याच्या मल्टिव्हर्सिटीला मिळाला होता. पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर उद्घाटन सोहळ्यास सुरुवात झाली. पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वाना संबोधित केले. तारका अभ्यंकर यांचा पेपर सादर होईपर्यंत आपण हजर राहणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्यावर उपस्थितांनी त्यांच्या जिज्ञासेचे स्वागत केले. बुद्धिवंतांप्रमाणेच सामान्यजनही त्यांचे भाषण ऐकायला उत्सुक असल्यामुळे इंटरनेट आणि टेलिव्हिजनवरही परिषदेचे थेट प्रक्षेपण होत होते.
मल्टिव्हर्सिटीतील ज्येष्ठ वैज्ञानिक तारका अभ्यंकर म्हणजे विज्ञानजगतातील एक लखलखता ताराच. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय गटाने सजीवांच्या प्रतिकायेच्या (अँटिबॉडी) अस्तित्वाचा सादर केलेला पुरावा क्रांतिकारक ठरला होता.
पॉल डिरॅक यांनी अनुमान केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनच्या प्रतिकणाचे- पॉझ्रिटॉनचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर वैज्ञानिकांच्या लक्षात आले की, प्रत्येक परमाणूचा ‘प्रतिपरमाणू’ अस्तित्वात असतो. परमाणू व त्याच्या प्रतिपरमाणूचे मीलन झाले असता दोघांचाही नाश होऊन ऊर्जा उत्सर्जित होते. स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या ‘द ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या पुस्तकात या जगाचे ‘प्रतिविश्व’ अस्तित्वात असण्याविषयी अंदाज बांधला होता. अशा प्रतिविश्वात सर्व सजीवांच्या ‘प्रतिकाया’ अस्तित्वात असतील. त्यांनी या पुस्तकात गमतीने सल्ला दिला होता की, कृपया, तुमच्या प्रतिकायेशी हस्तांदोलन करू नका; अन्यथा तुम्हा दोघांचाही नाश होऊन ऊर्जा उत्सर्जित होईल.
तारका अभ्यंकर पेपर सादर करण्यासाठी उभ्या राहिल्यावर सभागृहात शांतता पसरली. सर्वाच्या नजरा व कान त्यांच्यावर रोखले गेले. चाळिशीतल्या तारका अभ्यंकर म्हणजे सौंदर्य व प्रज्ञेचा अनोखा संगम होता. व्यासपीठामागील भव्य पडद्यावरील स्लाइड शोच्या साहाय्याने त्यांनी पेपर सादर करायला सुरुवात केली..
‘पाच वर्षांपूर्वी मी व माझ्या सहकाऱ्यांनी सजीवांच्या प्रतिकायेचे अस्तित्व सिद्ध केल्यानंतर अधिक संशोधन करण्यासाठी प्रतिकाया प्रकल्पाचा विस्तार केला गेला. मल्टिव्हर्सिटी, ‘आयुका’, टी. आय. एफ. आर. आणि इतर दहा देशांमधील विज्ञानसंस्थांमधून दोनशे वैज्ञानिक या प्रकल्पात काम करीत आहेत. त्याचप्रमाणे काही सरकारी व खासगी क्षेत्रातील कंपन्यांचाही यात सहभाग आहे.
सजीवांच्या प्रतिकायेच्या अस्तित्वाचा शोध घेत असताना असे दिसून आले की, हे विश्व त्रिमितीय नसून यापेक्षा अधिक मितींनी बनलेले आहे. सूर्यमाला ओलांडून आंतर-तारकीय अभिक्षेत्रात गेलेल्या ‘व्हॉयेजन’ने पाठविलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यावर ‘आयुका’च्या वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, हे अभिक्षेत्र चौमितीय असावे. हॉकिंग यांच्या ‘सुपरस्ट्रिंग थिअरी’नुसार विश्व दहा मितींनी बनलेले असावे.
विश्व तीनपेक्षा अधिक मितींचे आहे व आपल्याला जाणवणारे त्रिमितीय जग त्याचा उप-अवकाश (सब-स्पेस) आहे हे लक्षात आल्यावर द्विमितीय जगसुद्धा अस्तित्वात असण्याच्या शक्यतेचा विचार करून आम्ही त्या दिशेने संशोधन सुरू केले.
कालयंत्राच्या साहाय्याने कालभ्रमण (टाइम ट्रॅव्हल) करण्याविषयी आपण परिचित आहोत. त्याप्रमाणे ‘मितीभ्रमण’ करण्यासाठी आम्ही मितीयंत्र बनविण्याचे ठरविले. दोन वर्षांच्या परिश्रमांनंतर सजीवांना द्विमितीय जगात नेणारे पहिले ‘प्रोटोटाइप’ तयार झाले. त्याचे परीक्षण करण्यासाठी प्रथम आम्ही बेडूक व उंदीर यांच्यावर प्रयोग केले. त्यांना द्विमितीय जगात नेऊन परत आणण्यात आम्ही यशस्वी झालो.
द्विमितीय जगाचा अभ्यास करण्यासाठी कुणा व्यक्तीला त्या जगात जाणे आवश्यक होते. त्यात धोका हा होता की, द्विमितीय जगात गेलेल्या सजीवांचे अस्तित्व पूर्णपणे जाणवेनासे होते आणि कुठल्याही साधनाने ते शोधता येत नाही. त्यासाठी आम्ही मितीयंत्रात अनेक सुधारणा केल्या, सुरक्षेसाठी उपाययोजना बसविल्या आणि या प्रयोगाच्या यशस्वीतेकरिता मी स्वत: त्या जगात जाण्याचे ठरविले.
ठरलेल्या दिवशी मी मितीयंत्रात गेल्यावर सहकाऱ्यांनी मितीयंत्र सुरू केले. हळूहळू माझी एक मिती आक्रसली जाऊ लागली व काही वेळातच मी द्विमितीय जगात प्रवेश केला. प्रथम मी जवळपासच्या खाणाखुणांचा अंदाज घेतला आणि माझे श्वासोच्छ्वास मोजायला सुरुवात केली. श्वासोच्छ्वास मोजून मी तिथे किती काळ आहे याचा अंदाज घ्यायचा व जास्तीत जास्त पाच तास होताच, किंवा काहीही धोका वाटल्यास परत त्याच जागी यायचे असे आमचे ठरले होते. माझे सहकारी मला परत आणण्यासाठी मितीयंत्राचे अनुयोजन करून ते सतत सुरू ठेवणार होते.
तिथे मंदसा प्रकाश पसरलेला होता. आजूबाजूला कोणीही नव्हते. पण एका दिशेने काही आवाज येत होते. मी त्या दिशेने जाऊ लागले. वाटेत काही त्रिकोणी व चौकोनी प्राणी दिसले. जवळ आल्यावर ते थांबून काहीसा आवाज करून परत त्यांच्या मार्गाने जाऊ लागत. येथील सर्व गोष्टींना लांबी व रुंदी अशा दोनच मिती होत्या.
पुढे गेल्यानंतर मला एक वर्तुळाकार प्राणी दिसला. माझ्या जवळ येऊन स्वत:भोवती प्रदक्षिणा घालून तो उभा राहिला. काय करावे, हे न कळल्याने मी स्तब्ध उभी राहिले. माझ्याभोवती एक प्रदक्षिणा घालून तो म्हणाला, ‘तुम्ही इथे नवीन आहात वाटतं. मी श्याम. तुमचे नाव काय? तुम्ही कोठून आलात?’ मी माझे नाव व त्रिमितीय जगातून आल्याचे सांगितले. त्याला माझे नाव कळले असावे आणि मी दुसऱ्या कुठल्यातरी जगातून आल्याचे समजले असावे. तो फक्त हसला व आम्ही आवाजाच्या दिशेने चालू लागलो.
वाटेत आणखी वेगवेगळ्या आकारांचे प्राणी दिसले. त्यांच्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘या जगात सुरुवातीला तापमान खूप कमी असे. तेव्हा केवळ एकरेषीय प्राणी असत. अनेक शतकांनंतर सरासरी तापमान वाढू लागल्यावर त्यांच्यात परिवर्तन होऊन त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी असे अधिक प्रगत प्राणी निर्माण होत गेले. उत्क्रांतीच्या या टप्प्यावर माझ्या जातीचे सर्वाधिक प्रगत वर्तुळाकार प्राणी अस्तित्वात आले आहेत.
निसर्गाने आमच्या दोन डोळ्यांची रचना अशा प्रकारे केली आहे की ‘द्विनेत्री दृष्टी’मुळे (बायनॅक्युलर व्हिजन) आम्हाला सर्व गोष्टींच्या द्विमितीय आकाराची जाणीव होते. अन्य प्राण्यांना सर्व काही एकमितीय म्हणजेच एका सरळ रेषेसारखे दिसते. सर्व प्राण्यांच्या छातीच्या रंगावरून लिंगभेद ओळखता येतो. वयात आलेल्या मादीची छाती पिवळ्या रंगाची आणि नराची भुरकट रंगाची असते.’
आजपर्यंत आपल्याला अज्ञात असलेल्या द्विमितीय जगाविषयी जाणून घेत असताना माझ्या लक्षात आले की, तिथे राहण्याची पाच तासांची मुदत संपत आली आहे आणि मला त्रिमितीय जगात परतण्यासाठी प्रारंभीच्या ठिकाणी जायला हवे. मी श्यामला म्हणाले, ‘इथल्या सर्व गोष्टींविषयी, विशेषत: तुमच्याविषयी जाणून घेण्याची मला खूप इच्छा आहे. परंतु आता मला माझ्या जगात जाणे आवश्यक आहे. माझे मित्र माझी वाट बघत असतील. मी गेले नाही तर ते काळजी करतील. पण मी परत नक्की येईन.’
मी परत जाणार हे ऐकून श्याम हिरमुसला. पण त्याला माझे म्हणणे पटले व तो मला प्रारंभीच्या ठिकाणी सोडायला आला. प्रारंभीचे ठिकाण जवळ आल्यावर मी म्हणाले, ‘इतक्या लवकर जाताना मलाही वाईट वाटते आहे. पुढच्या वेळी मी जास्त वेळाकरिता येईन. पण जाण्याआधी मला एक सांगा की, वयात आलेल्या नराची छाती भुरकट व मादीची पिवळी असते, मग तुमची छाती काळपट व माझी लाल रंगाची आहे याचा अर्थ काय?’ श्याम हसत म्हणाला, ‘मी याचे सविस्तर उत्तर तुम्ही परत याल तेव्हा देईन. आता थोडय़ा वेळात सांगता येणार नाही.’ आणि स्वत:भोवतीच प्रदक्षिणा घालून तो उभा राहिला.
मीसुद्धा स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घालून प्रारंभीच्या ठिकाणी जाऊन उभी राहिले. हळूहळू माझी तिसरी मिती प्रसरण पावू लागली व काही वेळातच माझा त्रिमितीय जगात प्रवेश झाला. मी सर्वत्र नजर फिरवली. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात माझे स्वागत केले. मितीयंत्र बंद करण्यात आले. आणि माझ्या सर्व शारीरिक तपासण्या करण्यासाठी मला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत ठेवून माझी रवानगी रुग्णालयात करण्यात आली..
या प्रकल्पातील माझ्या सहकाऱ्यांचे हे यश आपल्यासमोर सादर करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आभारी आहे.’
तारका अभ्यंकरांनी बोलणे थांबविल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालिकेने त्यांच्या द्विमितीय जगाच्या पुनर्भेटीविषयी सर्वाना उत्सुकता असल्याचे सांगून त्यांच्या प्रकल्पाला सुयश चिंतिले.