महाराष्ट्राचे महामर्द नेते महामहीम उद्धवजी ठाकरे यांचे शब्द म्हणजे साक्षात् अग्निफुले! त्यांची भाषणे म्हणजे ज्वलज्जहाल ज्वालामुखीच!
वाचकहो, हे आमचे स्वत:चे वैयक्तिक मत आहे! (क्रिपया याबाबतचे सर्व वाद वांद्रे न्यायालयाच्या कक्षात येतील, याची नोंद घ्यावी.) यातली चंमतग अशी, की दस्तुरखुद्द उद्धवजी यांचेही अगदी अस्सेच मत आहे! त्यामुळे होते काय, की ते भाषणे करतात! त्याने होते असे, की देशभर प्रचंड खळबळ उडते!
आता परवाचीच गोष्ट घ्या. उद्धवजींनी डोंबोलीत भाषण केले. म्हणाले, ‘शिवसेनेत याउप्पर लोकशाही बंद!’ आणि काय सांगू महाराजा, अवघी कायनात नि:स्तब्ध झाली! सर्वत्र एकच खळबळ माजली!
लोकशाही बंद म्हणजे काय चेष्टा आहे?
जो- तो एकमेकाच्या कानी सांगू लागला, ‘ऐकलं का भौ? आता लोकशाही बंद बरं का! आदेशच हाय तसा!’
कोणी पुसू लागले, ‘लोकशाही म्हंजे आखीर आसतंच काय? इलेक्शन! स्साला तेपन बंद केला, तर आपुन काय नुसता क्यारम खेळत बसायचा काय शाखेत?’
कोणी म्हणू लागले, ‘प्रॉब्लेम झाला ना! साहेबांनी फक्त बंदच पुकारला. डेट नाही डिक्लेर केली! आता रजा कशी टाकणार?’
कोणी बोलू लागले, ‘आपल्याला काय टेन्शन नाय. आपली पोरं अध्र्या रात्रीला पन फुल्टू तय्यारीत असतात! सायबांनी खुल्ला आवाज टाकायची खोटी, की अख्ख्या लोकशाहीचं शटर-मीटर डाऊन!’
हे तर हे. लोकशाही बंद म्हटल्यावर तिकडे काही नतद्रष्टांच्या दृष्टीसमोरून मातोश्रीतले बडवे चमकून गेले, ते वेगळेच!
तर हा असा अवघा गल्बला माजला. कोणास काही समजेना, उमजेना, आकळेना. याचा खुलासा करणे भाग होते. तेव्हा प्रत्यक्ष उद्धवजींकडेच जाणे आले.
उद्धवजी : (उजव्या बाहीने कपाळावरचा घाम पुसत) या! (बालराजे आदित्यजी यांचेकडे पाहत) बघा. ही शिवबंधन गंडय़ाची जादू! आपल्याकडं माणसं येतातसुद्धा! (पुन्हा आमच्याकडे संशयाने पाहत) तुम्ही आमच्याकडंच आलात ना?
आम्ही : (उगाच हॅ हॅ करीत.. कुठंही गेलं तरी माणसाने वार्ताहरधर्म सोडू नये!) हो, थोडं काम होतं..
उद्धवजी : (काहीतरी शोधत आहेत) तिकीट पायजे असेल तर रेल्वे-स्टेशनला जा. इथं लिस्ट फायनल झालेली आहे.
आम्ही : (वार्ताहरधर्म सुरूच) नाही ते काम नाही. एक थोडं विचारायचं होतं.
उद्धवजी : (बालराजांना उद्देशून) त्या उशीखाली पाहिलं का? त्या नाही, त्या. सोफ्यावरच्या रे! (आम्हांस उद्देशून) हं, बोला.
आम्ही : काही शोधताय वाटतं..
उद्धवजी : (चमकून, डोळे बारीक करून पाहत) तुम्हाला कसं समजलं? कोणी सांगितलं?
आम्ही : नाही. तुमची शोधाशोध चाललीय ना मघापासून, म्हणून विचारलं.
उद्धवजी : असं असं! (दोन्ही हात आणि गुडघे टेकवून कपाटाखाली वाकून पाहत) आम्हाला वाटलं..
आम्ही : एखादी महत्त्वाची गोष्ट हरवलीय का? (निरागसता निरागसता म्हणतात ती हीच! काही लोक यास भोचकपणाही म्हणतात!)
उद्धवजी : (पायजम्याचे दोन्ही खिसे उलटे करून पाहत) हो ना. कालपासून शोधतोय. पण पत्ताच लागत नाही. (बालराजांना उद्देशून) मििलदकाकांना फोन कर पाहू. विचार त्यांना, तिकडं सेनाभवनात तरी सापडली का?
आम्ही : पण नेमकी कोणती गोष्ट शोधताय? (वार्ताहराने निरागसता कधी सोडू नये!)
उद्धवजी : लोकशाही!
आम्ही : म्हणजे?
उद्धवजी : (चिडून) म्हंजे काय म्हंजे? लोकशाही! सापडतच नाहीये. आता ती बंद करायची तरी कशी? (बालराजांना उद्देशून) आईला विचार बरं, तिच्या पर्समध्ये तर नाही ना चुकून गेली?..
वाचकहो,
ताज्या वृत्तानुसार, अजूनही लोकशाही सापडलेली नसून विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता अन्य पक्षांतही तिचा शोध घेण्यात येत आहे.