शाळेला सुट्टी लागली रे लागली की आमची १९५८ ते ६४ दरम्यान वर्षांतून एक तरी ट्रिप मुंबईला व्हायचीच. पुण्याहून मुंबईला गेलं की थोडं बावचळून जायला होई. सगळे आपापल्या उद्योगांत असायचे. बोलणं जुजबी lok02होई. सगळी एक प्रकारची घाई जाणवे. मुंबईत सुट्टीला जाण्याची आमची एकूण तीन ठिकाणं होती. एक म्हणजे विठ्ठलमामाचं दादरचं घर. लंडनहून बॅरिस्टर होऊन आलेल्या मामाचं लग्न ५५ मध्ये झालं आणि त्याने मुंबईला िहदू कॉलनीमध्ये बिऱ्हाड केलं. ‘बकरी व्हिला, ११६, िहदू कॉलनी’ या पाचव्या गल्लीमधल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये आम्ही दर सुट्टीत जायचो. आम्ही म्हणजे मी, कधी माझा धाकटा भाऊ सुधीर. बहीण भारती लहान असल्याने ती नसायची. मुंबईच्या मानानं िहदू कॉलनी त्यावेळी तरी शांत होती. मुख्य म्हणजे भरपूर झाडी. सतत आवाज म्हणजे लोकल गाडय़ांचा. मामाला दोन मुलं. मोठा- सध्याचा विधान परिषदेचा आमदार अनंत गाडगीळ आणि आता लग्नानंतर दिल्लीत स्थायिक झालेली मुलगी अर्चना (भालेराव). पुण्यातून मुंबईत आल्यावर लगेच फरक जाणवायचा तो म्हणजे घामट हवा, समुद्र आणि भाषा, तसेच येणारे सगळे फेरीवाले िहदीत बोलायचे. भाजीवाला, परीट, काबुलीवाला, कुल्फीवाला हे सगळे भय्ये असायचे. गावाकडच्या गप्पा मारत ते बसायचे. त्यांना जाण्याची घाई कधी असायची, तर कधी नसायची. मुंबईत पदार्थाची चवदेखील वेगळी जाणवायची. शनिवारवाडय़ाजवळची भेळ आणि दादर चौपाटीवरील भेळेच्या चवीत जमीन-अस्मानाचा फरक असायचा. पुण्यात कसं, की भेळ खाण्यासाठी जरा जाड असलेल्या कागदाच्या कार्डाचा तुकडा असायचा, तर दादर चौपाटीवरच्या भेळेत एक छोटी, चपटी कडक पुरी असायची. त्या पुरीने भेळ खायचा शिरस्ता असे. भेळेच्या अंतिम घासानंतर मग त्या चिंचेच्या पाण्याने ओल्या झालेल्या पुरीचा तुकडा मोडायचा. पुण्यात मिळणाऱ्या भेळेत रद्दीत टाकलेल्या एखाद्या पोस्टकार्डाचा तुकडा असायचा. त्यावर कधी शाईने लिहिलेला मजकूरदेखील असे. एकदा माझ्या भेळेत आलेल्या कार्डाच्या तुकडय़ावर छान हस्ताक्षरात लिहिलं होतं- ‘सर्वस्वी तुझीच – सौ. नयना.’ अखेरच्या घासापर्यंत ओल्या झालेल्या कार्डाच्या त्या तुकडय़ावरची ‘सर्वस्वी तुझीच – सौ. नयना’ शाईरूपात पूर्ण घशात उतरलेली असायची. रुईया कॉलेजजवळच्या मणीज्ची इडली, टिळक ब्रिज चौकात मध्या इराण्याकडचा ब्रून मस्का, आम्लेट, जवळच असलेल्या एल्फिन्स्टन या रेस्टॉरंटमधले विविध सामिष पदार्थ.. या काही खास चवी. मामीला मुलांचं कौतुक असायचं, तर मामा कायम तटस्थ भूमिकेत असायचा. फारसं बोलणं त्यावेळी तरी नसायचं. त्याची कसर मामी भरून काढायची. ती माहेरची जान्हवी गोखले. तिचं शिक्षण वडिलांची फिरतीची नोकरी असल्याने तिच्या आजोळी- म्हणजे वाईच्या दातारांकडे सुरुवातीला झालं. मग काही र्वष पुण्याला. नंतर कॉलेजच्या वेळी नागपुरात. मामीचा विषय- मराठी. त्यामुळे तिला साहित्य- संगीताची आवड. अनेक भावगीतं तिला म्हणता येत. ग. दि. माडगूळकरांच्या गीतांवर ती जाम खूश. अनेक कविता तिच्या पाठ असत. लग्नाआधी ती काही र्वष ह. रा. महाजनी संपादक असताना ‘लोकसत्ता’मध्ये नोकरी करीत असे. रविवारची पुरवणी संपादन करण्याच्या विभागात ती होती. मामा लोकलने रोज हायकोर्टात जायचा. एकदा आल्यावर त्याच्या बोलण्यात उल्लेख आला की, सकाळी लोकलमध्ये गप्पा मारायला कधी कधी फ्री प्रेस जर्नलचे व्यंगचित्रकार बाळ ठाकरे आणि एक नवे लेखक विजय तेंडुलकरही असतात.
मुंबईमधली सुट्टीतल्या मुक्कामाची दुसरी दोन ठिकाणं म्हणजे आमचे दोन काका. एकूण चार काकांपकी दोन पुण्याला असायचे. ग्रँट रोड स्टेशनजवळच्या स्लेटर रोडवरच्या अभ्यंकर चाळीत राहणारे विष्णूकाका आणि वर्सोवा चौपाटीच्या जवळ मोठय़ा सरकारी बंगल्यात राहणारे भास्करराव ऊर्फ भाऊसाहेब. अभ्यंकर चाळीत जायची वाट विलक्षण होती. कारण अभ्यंकर चाळीचा जिना पटकन् सापडत नसे. कारण तळमजल्यावर कोळशाची वखार, लोखंडी सामानाचे दुकान आणि त्यामधून वर जाणारा जिना जर सापडला तर पहिल्या मजल्यावर गेल्यावर त्या घरात एकदा डोकावून बघावं असं मनात येई. कारण त्या मजल्यावर रहस्यकथासम्राट बाबुराव अर्नाळकर राहत असत. जिना चढताना मनात वरच्या मजल्यावर झुंझार, काळा पहाड आणि पिवळा डांबिस दिसतील असं वाटे. हीच आमची त्यावेळची हॅरी पॉटर गँग होती. जोडीला नाथमाधवांचा (द्वारकानाथ माधवराव पितळे.. १८८२- १९२८) ‘वीरधवल’ आणि ‘सोनेरी टोळी’ म्हणजे आमचे ‘लॉर्ड ऑफ द िरग्स’ आणि ‘द हॉबिट’! काकांचं बिऱ्हाड दुसऱ्या मजल्यावरच्या तीन मोठय़ा खोल्यांत होतं. विष्णूकाका सगळं जग फिरून आले. व्यापारी उद्योगाच्या सरकारी कंपनीत ते मोठय़ा हुद्दय़ावर होते. मधे तीन-चार वष्रे त्यांची बदली टोकियोला झाली होती. सहकुटुंब ते जपानला होते. तरी त्यांनी ही चाळ काही सोडली नाही. त्यांनी आमच्या शनवार पेठेतल्या वाडय़ात दोन इम्पोर्टेड गोष्टी सर्वात आधी आणल्या. एक म्हणजे निप्पॉन कंपनीचा ट्रान्झिस्टर रेडिओ आणि कॅननचा ३५ मिमीचा कॅमेरा. या दोन गोष्टींचं फार अप्रूप तेव्हा शनवारात होतं. विशेषत: आकाशवाणीवर माडगूळकरांचं गीतरामायण, आपली आवड किंवा रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमाला लागण्याच्या वेळेला वाडय़ातल्या अंगणात जपानी ट्रान्झिस्टरची गणपतीसारखी प्रतिष्ठापना होत असे आणि आरतीला जमावेत तसे सगळे गाणी ऐकायला जमत. हा जपानी रेडिओ बॅटरीवर चाले. त्यावर नेमकं हवं ते स्टेशन लावणं हे कौशल्याचं काम वाटे. कारण किंचित बटण फिरलं की चार-दोन स्टेशनं पुढे-मागे होत. रेडिओतून खरखर ऐकू येण्याच्यादेखील विविध तऱ्हा असत. निरनिराळ्या प्रकारच्या खरखरी लक्षपूर्वक शांतपणे ऐकत ऐकत आपल्याला हवं ते आकाशवाणी केंद्र लागलं की हुश्श्य होत असे. अखेर खरखर संपून गाणं ऐकू येणं हा उत्कट असा आनंदाचा क्षण असे. त्यामुळे एकदा गाणं रंगात आलं असताना जर कोणी चुकून फाजील आत्मविश्वासाने ‘मी जरा आवाज मोठा करतो’ म्हणत चुकीच्या बटणाला हात लावला आणि गाण्याऐवजी परत खरखर ऐकू यायला लागली, की सगळं संपलंच. त्यात जर ‘धुंद येथ मी’ किंवा ‘तोच चंद्रमा नभात, तीच चत्र यामिनी’ यासारखं गाणं असेल आणि चुकीच्या बटणामुळे पुन्हा खरखर ऐकू येणार असं जर अंगणात जमलेल्या श्रोतृवृंदाला वाटलं, तर मग जणू जग फिरायचं थांबलंच. इतके मग सगळे त्याला बोल बोल बोलत, की पुढे आयुष्यात कोणतीही बटणं फिरवताना त्याला दहा वेळा विचार करावा लागला असेल.
वर्सोव्याचे आमचे भाऊसाहेब हे काका पीडब्ल्यूडीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर होते. ते कराचीच्या इंजिनीअिरग कॉलेजात शिकलेले. पुढे ते राज्य शासनाचे चीफ इंजिनीअर होऊन निवृत्त झाल्यावर पुण्यातल्या वाडय़ात मुक्कामाला आले. आमच्या वर्सोव्याच्या इंदिराकाकूची सख्खी धाकटी बहीण म्हणजे कवी वि. म. कुलकर्णी यांची पत्नी. कविवर्य वि. म. कुलकर्णी यांची नेहमी शनवारात चक्कर असे. त्यांनी आणि वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेली ‘मंगल वाचनमाला’ ही आम्हाला रमणबाग शाळेत पाचवी ते दहावी मराठीची पाठय़पुस्तकं म्हणून होती. त्यामुळे कुलकर्णीकाका वाडय़ात आले की त्यांना आमच्या पुस्तकात असलेली त्यांची ‘चालला चालला लमाणांचा तांडा, एका गावाहून दुज्या गावाला’ ही कविता म्हणावीच लागे. मुंबईच्या तीनही घरांतला कॉमन फॅक्टर म्हणजे समुद्र. दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, आणि वर्सोव्याला तर काय- काकांच्या बंगल्याजवळच समुद्र. वर्षभर ओढय़ासारख्या वाहणाऱ्या पुण्याच्या मुठा नदीसमोर मुंबईच्या प्रचंड समुद्रामधला सूर्यास्त रोज दिसण्यातला आनंद अजून ताजा वाटतो. असो.
तर आमचा विठ्ठलमामा ६७ च्या पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत बारा हजार मतांनी पडला. त्यानंतर त्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाली. हायकोर्टाची प्रॅक्टिस चालूच होती. ६७ च्याच निवडणुकीत बारामतीमधून विधानसभेवर शरद पवार प्रथमच निवडून गेले. सर्वात तरुण, अभ्यासू आमदार म्हणून त्यांचं सर्वत्र कौतुक होत होतं. मामा बरीच र्वष मुंबईच्या रुपारेल कॉलेजच्या परिसरातील न्यू लॉ कॉलेजमध्ये शिकवायला जात असे. त्यावेळी त्याचे दोन विद्यार्थी होते, तेपण नंतर राजकारणात आले. एक म्हणजे प्रमोद नवलकर आणि दुसरे होते सुशीलकुमार िशदे! एक दिवस पुण्याला नेहमीप्रमाणे शनिवारी मामा डेक्कन क्वीनने आला. मामा म्हणाला की, ‘आज डबा आपल्या चौघांचा आण. आणि अप्पा बळवंत चौकातून सीडलेस थॉम्पसन घेऊन ये. अजून दोघेजण यायचे आहेत. ते मुक्काम करून सकाळी जातील.’ मी डबा आणायचो तो निळूभाऊ लिमयेंच्या पूनम रेस्टॉरंटमधून. पानशेत पुरानंतर नदीकाठी पुलाच्या वाडीजवळ एका शेडमध्ये हे जुनं हॉटेल स्थलांतरित झालं होतं. त्याआधी ते कित्येक र्वष जिमखान्यावर आत्ताच्या पॉप्युलर बुक हाऊसच्या जागी होतं. त्यानंतर जिमखाना बस स्टॅण्डच्या समोर सध्याच्या आर डेक्कन जागी असलेल्या पूना कॉफी हाऊसच्या जागी गेलं. मग पुलाच्या वाडीत शेडमध्ये. मग शेड पाडून इमारत बांधून तिथं नंतर लॉजिंगही सुरू झालं. पूनम हॉटेल हे त्यावेळी एक प्रस्थच होतं. सर्व पक्षांचे राजकारणी, नाटकवाले, सिनेमावाले यांचा तो सायंकालीन अड्डा असे. मालक निळू लिमये हे समाजवादी. माझ्या वडिलांचे मित्र. निळूकाकांच्या वडिलांचा मोठा वाडा पुण्याच्या लक्ष्मी रोडवर सध्या शगुन दुकानाची इमारत ‘महाराज स्मृती’ जेथे आहे त्या जागी होता. ते ‘लिमये महाराज’ म्हणून प्रसिद्ध होते. आत्ताच्या भाषेत ते आद्य असे फिजिओथेरपिस्ट होते. पण तेव्हा त्यांना ‘चोळणारे लिमये’ म्हणत. सांधेदुखीसारख्या आजाराचे ते तज्ज्ञ होते. निळूभाऊ नागरी संघटनेमार्फत महानगरपालिकेवर निवडून गेलेले. ते पुण्याचे मेयरदेखील झाले होते. त्यांची बहीण शशीताई गोळे आणि आमची आई ४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत एकाच वेळी येरवडय़ाच्या तुरुंगात होत्या. तेव्हा नुसतं पूनममधून डबा आणला म्हणून भागत नाही, तर त्यामागचं समाजशास्त्रीय सांस्कृतिक कवित्वही सांगावं लागतं!
‘पूनम’च्या काऊंटरवर नेहमी बाळ खरे असत. बाळासाहेब हे निळूभाऊंचे उजवे हात. मला बघून झालेला संवाद साधारणपणे असा..
– मागचा नेलेला डबा आणलास का?
– विसरलो. आज चौघांचा द्या.
– डबा विसरलास? इथे काय डब्यांचं दुकान आहे का? चौघं कोण? कोण येणार आहे?
– आम्ही दोघं आहोत. दुसरी दोन नावं अजून कळायची आहेत.
– वकील आहेत की काँग्रेसची आहेत?
– पुढच्या शनवारी सांगतो.
– ठीक. व्हेज की नॉन-व्हेज देऊ?
– नॉन-व्हेज?
– बीयर किती देऊ?
– सांगितली नाहीये, पण देऊन ठेवा. परत रात्री बोंबलत हेलपाटा नको.
बाळासाहेब खरे कसब्यात राहायचे. ते सायकलीवरून ‘पूनम’च्या वाटेवर आळेकर वाडय़ात चहाला कधी कधी थांबत. अगदी वृद्ध होईपर्यंत ते ‘पूनम’मध्ये होते. सगळ्यांच्या ओळखी धरून होते. कमालीचं कुतूहल असलेलं असं त्यांचं निव्र्याज व्यक्तिमत्त्व होतं. अनेक कलाकार, राजकारणी, गायक यांच्याशी त्यांचं सख्य असे. अनेकांच्या उधारीवर ते बेमालूमपणे पांघरूण घालीत असत. कधीतरी नजाकतीनं वसुलीही करीत असत. हॉटेलात गल्ल्यावर बसणाऱ्यांचं घराणंच असतं की काय कोण जाणे! जिमखान्यावरच्या प्रसिद्ध ‘गुडलक’ हॉटेलच्या गल्ल्यावर बसणारा कासीमशेट हे एक असंच व्यक्तिमत्त्व. त्याला ज्यांनी पाहिलंय त्यांनाच यातलं मर्म समजू शकेल. खासगी चौकश्या कशा करायच्या, न दुखावता कोणाकडून उधारी कशी वसूल करायची, याचं एक व्यवस्थापनशास्त्रच या गल्ल्यावरील मंडळींनी तयार केलंय. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनचा मालक शेट्टी हाही असाच होता. त्याविषयी सविस्तर पुढे केव्हातरी येईलच. कालौघात हॉटेलं बदलली, बारही बदलले; पण त्यांच्या गल्ल्यावरच्या माणसांत या जीन्स (गुणसूत्रं) तशाचं झिरपत आलेल्या दिसतात. आपापल्या गावात त्याची प्रचीती संबंधितांना येत असेलच.
..तर चौघांचा डबा आणि अन्य वस्तू घेऊन मी सायकल मारत पुलाच्या वाडीशेजारच्या अष्टभुजा देवीच्या देवळाजवळच्या कॉजवेवरून मुठा नदी ओलांडून नारायण पेठमाग्रे शनवारात आलो. पण एक घोटाळा झाला. ते सीडलेस थॉम्पसनचं विसरलोच. म्हणून मग डबा ठेवून परत अप्पा बळवंत चौकात आलो. पण हे सीडलेस थॉम्पसन म्हणजे काय? मामांनी सांगितलंय म्हणजे ते नक्कीच कायद्याच्या पुस्तकाचं नाव असणार, असं समजून चौकातल्या समस्त लॉच्या पुस्तकांची दुकानं पालथी घातली. एका लॉ बुक डेपोच्या मालकानं विचारलं की, ‘ऑथर थॉम्पसन म्हणजे ब्रिटिशच ना?’ म्हणून त्यांनी वाडय़ावर फोन लावला. त्यांचं मामाशी बोलणं झाल्यावर ते जोरात हसायला लागले. म्हणाले की, ‘सीडलेस थॉम्पसन म्हणजे तुला सीडलेस द्राक्षं आणायला सांगितली आहेत.’ त्यावेळी ही बिया नसलेली सीडलेस थॉम्पसन जातीची द्राक्षं बाजारात नवीनच आलेली होती. अशी माझी पूर्ण फजिती होऊन मी द्राक्षं घेऊन आलो. तर ते येणारे दोघे एव्हाना आलेले होतेच. मामांनी त्यांची ओळख करून दिली, की हे शरद पवार आणि दुसरे सुशीलकुमार िशदे.
जेवणं झाली. आलेले दोघे वाडय़ावरच मुक्कामाला होते. पण त्यांच्याजवळ सामान काहीही नव्हतं. छोटय़ा पिशव्या होत्या. झोपायची वेळ झाल्यावर दोघांनी झोपायचा पोशाख केला. शरदराव बंडी आणि चट्टय़ापट्टय़ाच्या पायजम्यात. सुशीलकुमारांचादेखील डिट्टो तोच पोशाख. फक्त बंडीऐवजी बाह्य़ांचा बनियन!
एव्हाना तुम्हाला एक प्रश्न सतावत असेलच की, आजच्या गगनिकेत ‘बेगम बर्वे’ (१९७९) या नाटकाचा फोटो चुकून तर दिला नाही ना? आता हा जो ‘बेगम बर्वे’ नाटकातला फोटो आहे, त्याविषयी.. फोटोत पहिल्या अंकाच्या तिसऱ्या प्रवेशातली पात्रं जावडेकर आणि बावडेकर हे आहेत. हे दोघं अविवाहित, मध्यमवयीन सरकारी कारकून आहेत. ते दोघं इतके सर्वसामान्य आहेत, की जणू ही सरकारी नोकरी म्हणजेच त्यांचं अस्तित्व! जावडेकरांना त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला असणाऱ्या विधवा नलावडेबाई आवडत असतात. पण त्यांच्याशी संपर्क साधण्यास ते संकोचत असतात. त्यांची अवचित एन्ट्री व्हावी, असं त्यांचं मन म्हणत असतं. एकाच खोलीत राहणारे हे दोन मध्यमवर्गीय जीव. दोघेही अत्यंत अस्वस्थ असतात. त्यांना खूप उकडतंय. दोघे परिस्थितीने घामाघूम झालेले आहेत. अखेर मनी वसे ते स्वप्नी दिसे! अशा या घामट वातावरणात उदबत्ती विकणारा स्त्रीपार्टी नट बर्वे नलावडेबाई म्हणून एन्ट्री घेतो.. असा हा सीन! म्हणून जावडेकर आणि बावडेकर या पात्रांनी कुठला पोशाख करावा, असं तालमीत आमचं बोलणं चाललेलं असतानाच माझ्या डोळ्यांसमोर आले- वर उल्लेख केलेल्या पोशाखातले शरदराव आणि सुशीलकुमार! मग त्या प्रवेशासाठी तोच पोशाख पक्का झाला. आमच्या नाटकाच्या एका प्रवेशाच्या कॉस्च्युमची अशी ही शोधकथा!
..तर शाळेची सुट्टी, समुद्र, भेळ, सौ. नयना, अर्नाळकर, विष्णूकाका, भाऊसाहेब, निप्पॉन, तोच चंद्रमा नभात, कॅनन, सीडलेस द्राक्षं, पूनम, शरदराव, सुशीलकुमार, पायजमा, बंडी वगरे सगळं प्रत्यक्ष घडलेलं सुसंगत आणि यातलं काही विरघळून आमच्या नाटकांत आलं की ते मात्र मग असंगत (absurd)!
सतीश आळेकर – satish.alekar@gmail.com