मस्ती.. उत्साह.. उत्स्फूर्तता.. धमाल आणि काजळकिनारी दु:ख.. विरह.. जखमी हृदयाची आर्तता.. असं सगळं तेवढय़ाच ताकदीने व्यक्त करणारा संगीतकार कसा असेल? अशी प्रचंड विरोधाभासी कॉम्बिनेशन lok04घेऊन जन्माला येतो त्याला अवलिया जादूगारच म्हणावं लागेल. एखाद्या मस्तीखोर मुलाला दरडावून गंभीर व्हायला सांगितल्यावर त्याने अत्यंत गांभीर्याने काहीतरी खूप छान बोलावं.. आणि चक्क विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडणारी एखादी थिअरी मांडावी, तसं- ‘आना मेरी जान मेरी जान’ किंवा ‘हम तो जानी प्यार करेगा..’चा दंगा करून झाल्यावर ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए..’ किंवा ‘कटते है दुख में ये दिन’, ‘महफिल में जल उठी शमा’, ‘ये जिंदगी उसी की है’सारखी अप्रतिम पॅथॉसची गाणीही प्रचंड ताकदीने काळाच्या विशाल पडद्यावर कोरावीत ते अशा कलंदरानंच. हे शिकून येत नाही.. ‘वरून’च घेऊन यावं लागतं. ‘शास्त्र’ आणि ‘कला’ हा नेमका काय प्रकार आहे? शास्त्र संपल्यावर कला सुरू होते, की कलेपासून शास्त्र निर्माण होतं, हा झगडा ज्यांच्या गाण्यात संपतो  ते अण्णासाहेब चितळकर, ‘श्यामू’.. आपले सी. रामचंद्र! शास्त्र शोधणाऱ्याला तेही सापडेल आणि निव्वळ संगीताची ‘भाषा’ व्याकरणाशिवाय बोलायला आवडणाऱ्यांना त्या भाषेची गंमतही अनुभवता येईल. कमालीची सहजता आणि ‘आपणही गाऊ शकतो की!’ असा धीर देणाऱ्या गाण्यांपासून ते मंत्रमुग्ध, विचार करायला भाग पाडणाऱ्या अत्युच्च कलाकृतींपर्यंत मुक्त विहरणाऱ्या प्रतिभेचा धनी म्हणजे सी. रामचंद्र! एक अस्सल, रांगडा, रंगेल, पण तेवढाच हळवा, रोमँटिक.. सुरांशी बेइमानी कधीच न खपणारा.. कलाकाराची गुर्मी एखाद्या शिरपेचासारखी डौलात मिरवणारा मेलडीचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे सी. रामचंद्र. ज्याच्या प्रतिभेला साकार होण्यासाठी कुठलाही ‘पवित्रा’ घेण्याची जरूर भासत नसे. उगीचच एका धुनेला दिवसेंदिवस ‘घासत’ बसण्याची ज्याला कधी गरज भासली नाही आणि ज्याच्या टेंपरामेंटमध्ये खऱ्याखुऱ्या उत्स्फूर्त निर्मितीलाच सगळ्यात जास्त महत्त्व होतं. ज्याची ‘दादा’गिरी आजही चालते आणि ज्याचं नाव टाळण्याचा करंटेपणा सच्चा संगीतप्रेमी कधीही करणार नाही, असा हा ‘मोठा’ संगीतकार अण्णासाहेब चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र!
वेस्टर्न काय, भारतीय काय.. अण्णांसाठी सूर व ताल महत्त्वाचा.. त्यातून होणारी अभिव्यक्ती महत्त्वाची. उगीच सोवळेपणा न दाखवता ‘आपल्या’ सुरावटींमध्ये ‘त्यांना’ मानाचं स्थान देऊन एक मस्त रंग.. एक आगळा ढंग.. वेगळा तरंग चालींमध्ये त्यामुळे त्यांना आणता आला. अतिशय निर्मळ, पूर्वग्रहविरहित मन असल्याशिवाय हे होत नाही. मग सारंगी, हार्मोनिअम, तबला, सितार, बासरी यांसोबत ट्रम्पेट, कोंगो, बोंगो, गिटार, क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, हार्मोनिका यांनाही त्या संगीतात मानाचं स्थान मिळतं. अंगातली बंडखोरी चांगल्या अर्थाने चालींमध्ये उमटताना आपलं संगीत नकळत समृद्ध होत जातं. नंतर चित्रपट संगीतात बहरलेल्या अनेक शाखांचं मूलतत्त्व अण्णांच्या संगीतात आधी सापडतं आणि जाणवतं, की अरे.. हे सगळं यांचं आधीच करून झालंय की! ‘मेलडी’ हे एक घराणं मानलं तर अनिल विश्वासजींपासून सुरू झालेली ही शाखा परमोच्च िबदूला नेली ती अण्णांनी. ज्यांच्या सुरेल आणि उत्तम रचनेची सगळी लक्षणं मौजूद असणाऱ्या चालींनी. पुढच्या अनेक संगीतकारांसाठी प्रेरणा निर्माण करून ठेवल्या त्या सी. रामचंद्रांचं नाव या घराण्यात अग्रभागी राहीलच; पण ‘रिदम’चं महत्त्व वाढायच्या आधी पायाला ठेका धरायला लावणाऱ्या अण्णांच्या चालींनी ‘पब्लिक’ला नाचायला भाग पाडलं आणि ‘आपल्या’ मेलडीत ‘त्यांचा’ रॉक एन् रोल अलगद येऊन मिसळला.
अण्णासाहेब चितळकर ऊर्फ सी. रामचंद्रांचा जन्म १२ जून १९१५ ला झाल्याची नोंद सापडते. (काही ठिकाणी १९१८ साली त्यांचा जन्म झाल्याचंही लिहिलंय.) पुणतांबे (काही जणांच्या मते- ‘चितळी’) गावी जन्मलेल्या रामचंद्र नरहर चितळकर या मनुष्यविशेषाने पुढे इतिहास घडवावा, अशा काही सुरेल घराण्यात हा जन्म मात्र झाला नाही. आई-वडिलांचा सुरांशी संबंध नसताना हे रोपटं त्या अंगणात कसं वाढलं असेल? पण अण्णांनीच सांगितल्याप्रमाणे, स्टेशनमास्तर वडिलांची बदली डोंगरगड (मध्य प्रदेश)ला झाल्यावर तिथल्या गोंडिणींची (आदिवासी जमात) गाणी ऐकता ऐकता निसर्गरम्य वातावरणात संगीत मनात झिरपत गेलं. शालेय शिक्षणात अजिबात गोडी नसलेल्या लहानग्या रामला लोकसंगीताची समज मात्र फार लवकर आली. वडिलांची बदली नागपूरला होताच शाळेबरोबरच सप्रेबुवांच्या गायन क्लासात राम दाखल झाला आणि सप्रेबुवांकडून मात्र त्याने शाबासकी मिळवली. ‘हा मुलगा नाव काढणार!’ हे छातीठोकपणे सप्रेबुवा सांगू लागले. बुवांकडे स्वरांवर, नोटेशनवर विलक्षण प्रभुत्व मिळाल्यावर, शास्त्रीय संगीताचा पाया मजबूत झाल्यावर स्वरांची अनोखी दुनिया रामला अलीबाबाच्या गुहेसारखी सापडली नसती तरच नवल. पुण्यात आल्यावर पं. विनायकबुवा पटवर्धनांसारखा गुरू मिळाला आणि कोल्हापूरला वयाच्या १८ व्या वर्षी चक्क चित्रपटात कामही (दिसायला अत्यंत देखणा असल्यामुळे) मिळालं. ‘प्रतिमा’ हा तो बोलपट पडद्यावर मात्र आलाच नाही. पण वामनराव सडोलीकरांच्या ‘नागानंद’मध्ये त्यांना  नायकाची भूमिका मिळाली. चित्रपट प्रदíशत झाला आणि सणकून आपटलासुद्धा! या सगळ्या प्रकारात मिनव्‍‌र्हा मूव्हीटोन (सोहराब मोदी)ची नोकरी हाताशी लागली, आणि हबीब खाँ, हूगन यांसारख्या संगीतकारांना साहाय्य करता करता नोटेशनवरच्या प्रभुत्वामुळे वादकांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या रामचंद्र चितळकरांचं ‘संगीतकार’ म्हणून सृजन साकार होऊ लागलं. ‘भगवान’शी झालेल्या जिगरी दोस्तीतून ‘जयकोडी’ (तामिळ) चित्रपटाचं संगीताचं काम मिळालं. आणि भगवाननंच पहिला िहदी चित्रपटही दिला- ‘सुखी जीवन.’ ‘सारे जहाँसे अच्छा’ या डॉ. इक्बाल यांच्या गाण्याला पहिली चाल अण्णांनी लावली. यानंतरच्या चित्रपटांमध्ये प्रथम ‘सी. रामचंद्र’ हे नाव झळकलं. ते दाक्षिणात्य थाटाचं असल्याने अनेक गमती घडल्या. सी. रामचंद्र हे नाव गाजायला लागल्यावर सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजानन जागीरदारांनी, ‘अहो, तो कोण साऊथ इंडियन संगीतकार धुमाकूळ घालतोय! आपण मराठी माणसांनी काहीतरी करायला हवं,’ असं खुद्द अण्णांनाच सांगितल्याचा किस्सा बोलका आहे.
अण्णांच्या खुद्दारीचा पहिला प्रत्यय ‘शहनाई’ चित्रपटाच्या संदर्भात येतो. एखाद् दोन गाणी करायला नकार देत, संपूर्ण चित्रपटासाठी गाणी करण्याचा आग्रह धरत त्यांनी तो चित्रपट मिळवला आणि ‘सगळ्यांना म्हणता येतील अशीच गाणी बनवायची’ याच वेडाने झपाटल्यासारखं पी. एल. संतोषीसारख्या सोपं लिहिणाऱ्या, फार खोल किंवा वैचारिक वगरे शैली नसणाऱ्या कवीला हाताशी धरत ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणं त्यांनी बांधलं. अनेकांना ही धून पाश्चात्त्य वाटली. पण खरं तर गोव्याच्या ‘माझी एकटय़ाची एकटय़ाची मजा झाली’ या मराठी गाण्यावरून ही चाल सुचल्याचं अण्णांनी सांगितलंय. अर्थात पोर्तुगीज वळणाच्या या मराठी गाण्यातून आलेली ही एक अफलातून गंमत आहे. ‘मेरी’ या शब्दाचा खास इंग्रजाळलेला उच्चार, ‘आओ हाथों में हाथ लिए ‘६ं’‘ करें हम’सारखा इंग्रजी शब्द वापरण्याचा, त्या राहणीमानाचा आव आणण्याचा पडद्यावरचा तो केविलवाणा प्रयत्न.. ही सगळी केमिस्ट्री मस्त जुळून आली. अण्णा ज्यांना गुरुस्थानी मानत, त्या अनिलदांना हा सगळा वात्रटपणा कसा खपावा? पण ‘सामान्य माणसाला म्हणता येईल असंच गाणं देईन..’ या मुद्दय़ावर अण्णा ठाम राहिले. गाणं तुफान लोकप्रिय झालं आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, ‘म्हशीच्या पाठीवर पडून उन्हात नदीकडे निघालेला गुराखी पोरदेखील गाऊ लागला- ‘आना मेरी जान संडे के संडे..’
पहिला चित्रपट १९४२ साली देणाऱ्या अण्णांनी आपल्या सुरुवातीच्या कारकीर्दीत नूरजहाँ, शमशाद बेगम, मीना कपूर, बीनापानी मुखर्जी, ललिता देऊळकर (नंतरच्या ललिता सुधीर फडके), अमीरबाई, जोहराबाई या गायिकांकडून गाणी गाऊन घेतली. ललिताबाईंच्या आवाजातली ‘साजन’, ‘नदिया के पार’ या चित्रपटांतली गाणी गाजली. ‘मोरे राजाहो ले चल नदिया के पार’ (रफी- ललिता देऊळकर), ‘मार कटारी मर जाना (अमीरबाई) ही त्यांची गाणी आजही ताजी आहेत. पन्नासच्या दशकात मात्र लताबाईंची शैली विकसित होण्याच्या काळात सी. रामचंद्रांची गाणी, त्यातले बारकावे, गाण्यातला भाव उत्कटपणे व्यक्त करण्याची लताबाईंची क्षमता आणि चालींमधलं ते अनुपम सृजन.. एकमेकांच्या साथीने परमोच्च िबदूला पोहोचलं.. ेी’८ि ही सम्राज्ञी असण्याच्या काळातले प्रमुख संगीतकार अनिल विश्वासांपासून सी. रामचंद्र, मदनमोहन अशी ही शाखा बहरतच गेली आणि अनेक रत्नं जन्माला आली. लताबाईंचा आवाज, त्यांची रेंज हे सगळं जसं संगीतकारांच्या प्रतिभेला आव्हान देत होतं, तसंच लताबाईंची गायकीसुद्धा या संगीतकारांच्या चाली पेलता पेलता कशी समृद्ध होत गेली, हे ऐकण्यासारखं आहे. ‘दिल से भुला दो तुम हमे’ (पतंगा), ‘इक ठेस लगी आंसू टपके’ (नमूना) ही गाणी त्या मेलडी- युगाची सुमधुर प्रतीकं आहेत.
अण्णांच्या धमाल गाण्यांमध्येसुद्धा मेलडीची साथ सुटत नाही. अगदी ‘मेरे पिया गए रंगून’सारखं गमतीदार आणि सिच्युएशनल गाणंसुद्धा एक विशिष्ट मेलडी देऊन जातं. या गाण्याची गंमत आजच्या घडीलाही टिकून आहे. ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ची विलक्षण सुंदर लय, ताजेपणा आणि लता-अमीरबाईंच्या आवाजाचं ते सुंदर कॉम्बिनेशन.. ‘रोज रोज मुलाकात अच्छी नहीं’ म्हणताना किती नाजूक आवाज.. आणि ‘घडी घडी, ओ बडी बडी.. ऐसी बातें न बनाया करो..’ हा दणदणीत पुरुषी प्रतिसाद.. दोन गायिकांच्या भिन्न टोनल क्वालिटीचा सुंदर उपयोग करत बांधलेलं हे गाणं.. ‘गोरे गोरे’ ही लताबाईंची हाक काळजाला गुदगुदल्याच करते. आणि ‘गोरी गोरी’ हा जवाब मस्त रांगडेपणा आणतो.
‘निराला’, ‘अलबेला’, ‘परछाई’, ‘सुबह का तारा’, ‘नौशेरवान-ए-आदिल’, ‘शिनशिनाकी बुबला बू’, ‘आजाद’, ‘अनारकली’ यांसारख्या चित्रपटांची गाणी म्हणजे विलक्षण वैविध्य, कमालीचा गोडवा आणि सर्व प्रकारच्या संगीताचा घातलेला अप्रतिम मेळ यांचे दिमाखदार दाखलेच! या चालींची नजाकत, त्यांची नाचरी लय आणि डौल अनुभवणं म्हणजे स्वत:च स्वरश्रीमंत होत जाणं.. मग त्या अनारकलीचा तो रुबाब असो किंवा ‘शोला जो भडके’ची जवानमस्त धुंदी.. एकेक गाणं म्हणजे बुद्धी आणि भावना यांचा मनोज्ञ संगमच. या गाण्यांनी पुढे इतिहास घडवला. पण ही गाणी ‘इतिहासजमा’ मात्र कधीच होणार नाहीत, हे नक्की.