कोकण वगळता (अपवाद मालवण!) ‘उभा’ महाराष्ट्र कमालीच्या तिखट चवीचे पदार्थ आवडीने खातो आणि निरनिराळ्या रोगांनी ‘आडवा’ होतो. कोल्हापूर, खान्देश, मराठवाडा, विदर्भ सगळ्यांची तिखट खाण्याची तऱ्हा वेगळी; पण झणझणीतपणा, ठसका मात्र तोच. कुठे लाल मिरचीचा, कुठे हिरव्या मिरचीचा. कुठे मिरीचा, कुठे आलं-लसणाचा. कुठे लाल तिखटाचा, तर कुठे गरम मसाल्याचा. मला आठवतंय, जामनगरला आमच्याबरोबर शिकायला असलेला आमचा एक दाल-चावलप्रिय, दूध-भात स्वरूपाचा सात्त्विक उत्तर भारतीय मित्र एम. डी. झाल्यावर कोल्हापूरच्या एका आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्याता म्हणून रुजू झाला. घरी आणि जामनगरला त्याला अगदी फिक्क्या आहाराची सवय होती. त्यामुळे कोल्हापूरच्या खानावळीतलं घरगुती जेवणसुद्धा त्याला बिचाऱ्याला मानवलं नाही. भाजीच्या लाल रश्श्यानं त्याचे डोळे पांढरे व्हायचे नि पांढऱ्या रश्श्यानं लाल! सकाळी आलेला डबा उघडण्याचं धाडस त्याला रात्रीपर्यंत होत नसे. अखेर भरल्या डोळ्यानीच त्यानं कोल्हापूर सोडलं.
तिखट खाणारी महाराष्ट्रीय माणसं मात्र अशा काही बढाया मारतात, तिखट न खाणाऱ्याला असं काही हिणवतात, की समोरचा माणूस न्यूनगंडाचा बळी झालाच पाहिजे. जाळ तिखट खाणं म्हणजे शौर्य किंवा पराक्रमाची परमावधी आणि सपक पदार्थ खाणं म्हणजे अगदीच बुळचटपणा असा भाव त्यांच्या बोलण्यात ओतप्रोत भरलेला असतो. प्रेमानं कुणी त्यांना ‘जरा तिखट कमी खात जा,’ असं सांगायला गेलं तर शेवेच्या तऱ्हीदार भाजीनं कुर्रेबाजपणे भेंडीच्या बुळबुळीत भाजीकडे बघावं तितक्या तुच्छतेनं ते सांगणाऱ्याकडे बघतात. ‘तिखट पदार्थ’ या विषयावर गप्पा (आणि थापा) चालू असतील तर प्रत्येकाच्या बोलण्याची सुरुवात बहुतांशी, ‘हे तं कायच नाय, आमच्याकडं तर इतकं तिखट खातात, की..’ अशीच असते. आहारात भरपूर तिखट नसेल तर अन्नाला चव लागत नाही, शौचाला साफ होत नाही, अंगात शक्ती येत नाही, पौरुषत्व येत नाही.. असे पुष्कळ गैरसमज लोक बाळगून असतात.
तेज आणि वायू या दोन महाभुतांच्या आधिक्यानं बनलेला हा रस पचायला हलका, तीक्ष्ण आणि रुक्ष/ कोरडा असतो. हलका असतो याचा अर्थ मिरी, मिरची, लवंग, सुंठ, पिंपळी, लाल तिखट हे पदार्थ स्वत: पचायला सोपे असतात, पण ते फळांसारखे एकटे खाता येत नाहीत. मांस, कडधान्यं अशा पचायला जड पदार्थामध्ये तिखट चवीचे पदार्थ घातले तर ते जड पदार्थ पचायला सोपे जातात. मात्र, भुकेच्या वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ले तरच! तिखट रस हा अग्नी (भूक आणि पचनशक्ती) वाढवतो. अन्न चविष्ट बनविण्यातही या चवीचा वाटा मोठा आहे. स्वत:च्या तीक्ष्णतेमुळं हा रस शरीरात जिथे पोचेल तिथे स्राव निर्माण करून तो अवयव स्वच्छ करतो. म्हणून तोंड स्वच्छ करायचं असेल तर सकाळी आणि रात्री दात घासायला गोड पेस्ट न वापरता तिखट, कडू, तुरट चवीचं मंजन वापरावं. तिखटाच्या चरचरण्याने तोंडात भरपूर लाळ स्रवून तोंड स्वच्छ होतं. (पण आम्ही आमचं डोकं जाहिरातींच्या ताब्यात दिलंय. त्यात म्हणतात, ‘टूथपेस्ट टेस्टी भी तो होना चाहिए!’ ते ऐकून तोंडाच्या आरोग्याचा सत्यानाश करणारी, भरपूर रसायनांनी युक्त, तोंडाला फेस आणणारी, बुळबुळीत पेस्ट आमच्या बेसिनवर स्थानापन्न होते. आमची कोवळी, गोंडस बालकं आमच्यावर विश्वास ठेवून ती विषारी रसायनं मिटक्या मारत गिळतात. मुलांनी मंजन गिळलं तर आभाळ कोसळेल की काय, या भयानं पछाडलेले पालक या पेस्टरूपी विषाबाबत मात्र निर्धास्त असतात. ती गिळली तरी चालते. वास्तविक या पेस्टमधील रसायनांवर खरोखर किती संशोधन झालं आहे, हाच एक संशोधनाचा विषय आहे. आणि कितीही संशोधन झालं तरी ती रसायनंच राहणार. असो. पेस्टलाही एका खाद्यपदार्थाचं स्वरूप प्राप्त झाल्यानं ‘आहार’ या सदरात तिची दखल घ्यावी लागली.)
कफाचे आजार, विविध त्वचाविकार, खाज, कृमी यांत तिखट रस उपयोगी पडतो. हा रस स्थौल्य व आळस कमी करतो. म्हणून स्थूलपणा किंवा आळस वाढलेल्या व्यक्तींनी आईस्क्रीम, केक, चॉकलेट असे गोड पदार्थ पूर्णत: वज्र्य करून मिरपूड घातलेलं डाळींचं कढण, लाह्यांचा चिवडा, आलं- लसूण- मिरपूडयुक्त  विविध सूप्स, आलं लावलेली ताकाची कढी, दाक्षिणात्य पद्धतीचं  रस्सम्, ओव्याचे पराठे, ओव्याचं थालीपीठ, महाराष्ट्रीय पद्धतीचा मसालेभात, विविध सुक्या चटण्या, सुंठसिद्ध पाणी असे तिखट पदार्थ आहारात ठेवावेत.
तिखट ही चव शरीरात उष्ण, तीक्ष्ण, रुक्ष असे गुण वाढवते. म्हणून उष्ण ऋतूत पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी, कृश व्यक्तींनी, गुद्विकार असणाऱ्या व्यक्तींनी, रक्तस्राव होत असणाऱ्या व्यक्तींनी असे पदार्थ जपूनच खावेत. प्रसंगी वज्र्य करावेत. हा रस शुक्र आणि स्तन्य कमी करणारा आहे. म्हणून आपल्याकडे विवाहापूर्वीच्या केळवणात तिखट पदार्थ नसून गोड पदार्थ जास्त असतात. (आपण आजकाल पुढारलेपणा/ पुरोगामीपणा/ वेगळेपणा/ आवड या सबबीखाली हॉटेलमध्ये चरचरीत शेझवान भाताची केळवणं करतो, ते कितपत योग्य आहे, हे आता आपणच तपासून बघू या.) गर्भिणी, बाळाला स्तनपान देणारी माता यांच्या आहारातही तिखट चव चवीपुरतीच असावी. रात्री जागून अभ्यास करणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये, रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आधीच जागरणाने रुक्षता आणि तीक्ष्णता वाढलेली असते. त्यात रात्री भूक लागली म्हणून वडा, सामोसा, चायनीज, वेफर्स असे तिखट पदार्थ खाणं म्हणजे आगीत तेल ओतणं. (अशावेळी सगळ्यात उत्तम पदार्थ म्हणजे गाईचे गरम दूध + गाईचे चमचाभर तूप. रसायनंयुक्त हेल्थ ड्रिंक्सपेक्षा हे पेय कधीही छान. कारण हे मिश्रण शीत, स्निग्ध आणि मृदू आहे. म्हणजे जागरणाच्या उष्ण, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या अगदी विरुद्ध. रात्रपाळी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री कंपनीत हे पेय दिलं तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारेल आणि आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होऊ  शकेल.)
तिखट खाल्ल्यानं शौचाला साफ होते, हा तर एक सार्वत्रिक गैरसमजच आहे. उलट, तिखटाच्या रुक्ष गुणामुळे मल अधिक कडक होतो, आतडीही रुक्ष होतात आणि पर्यायाने मलावष्टंभ वाढतो. तरीही तिखट खाणं चालू ठेवलं तर मूळव्याध, ऋ्र२२४१ी, ऋ्र२३४’ं असे वेदनादायक, दीर्घकाळ छळणारे आणि बरे व्हायला अवघड असे गुद्विकार होऊ  शकतात. म्हणून मलावष्टंभ असलेल्या अवस्थेत तिखट पदार्थ कमी करून दोन्ही जेवणापूर्वी एक चमचा गाईचं तूप खावं. या उपायाचा फायदा झाला नाही तर जवळचा वैद्य गाठावा.
अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ले तर आम्लपित्त, चक्कर येणं, गळा- टाळू- ओठ सुकणं, शरीराची आग होणं, मनाचा संताप होणं, मूळव्याध, शरीरात कुठेही रक्तस्राव होणं, अशक्तपणा, शरीरात टाचणीने टोचल्याप्रमाणे किंवा फुटल्याप्रमाणे दुखणं, कंबर- बरगडय़ा- हात- पाय- पाठ यांत वेदना, वजन कमी होणं, मांसक्षय अशी विविध लक्षणं शरीरात निर्माण होतात. तिखटाच्या अतिरेकानं शरीरबल आणि पौरुषत्व वाढत नसून कमीच होतं. तसंच सांधे रुक्ष होतात. त्यातलं वंगण कमी होतं आणि संधिबंध कमकुवत होण्याची शक्यता बळावते.
सामान्यपणे मराठी माणसाच्या आहारात भाजी, चटणी, कोशिंबीर, आमटी या सर्व पदार्थामध्ये लाल तिखट, आलं, लसूण, मसाला, हिरवी मिरची, मोहरी, कांदा, हिंग, मिरी अशा विविध स्वरूपांत तिखटाचा समावेश असतो. तिखट पदार्थ खाताना तोंडाची आग होत असेल, डोळ्यांतून/ नाकातून पाणी येत असेल, खाल्ल्यानंतर तोंडाला कोरडेपणा येऊन वारंवार तहान लागत असेल, दुसऱ्या दिवशी मलप्रवृत्तीनंतर गुद्स्थानी आग होत असेल तर जेवणात तिखट जास्त होतंय असं समजावं. आणि ‘अति तिथे माती’ हे तर आपण प्राथमिक शाळेतच शिकलोय, नाही का?