संदीप आचार्य यांचा ‘स्टेंटचा बाजार’ हा अभ्यासपूर्ण लेख वाचून सखेद आश्चर्य वाटले आणि दु:खही झाले. हॉस्पिटल आणि डॉक्टरांनी लोकांच्या आयुष्याचा अक्षरश: बाजार मांडला आहे. पूर्वी वैद्यकीय व्यवसाय lok03होता, हल्ली तो धंदा झाला आहे. आजारी माणूस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला की त्याच्या नातेवाईकांना घाबरवून सोडायचे, अव्वाच्या सव्वा फी आकारून जेवढे ओरबाडता येईल तेवढे ओरबाडायचे, रुग्ण दगावला की, आम्ही सारे प्रयत्न केले, असे म्हणायचे.
भारत देशाला भ्रष्टाचार नावाची कीड लागली आहे.  तिचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय तरणोपाय नाही. आम्हाला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवणारे सरकारदरबारी रुजू झाले आहेत. जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करतील का?
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वर्सोवा.

देवलांच्या आठवणींना उजाळा
कमलाकर नाडकर्णी यांचा ‘दुर्गा’ या गो. ब. देवलांच्या नाटकाविषयीचा लेख वाचला. गोविंद बल्लाळ देवलांनी ‘दुर्गा’ हे नाटक ‘इसाबेला’ या इंग्लिश नाटककाराच्या ‘फेटल मॅरेज’ या नाटकावरून मूळ साहित्याला न छेडता रचले. या लेखामुळे त्यांच्या स्मृतिशताब्दीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
 – अजिंक्य भांडारकर, नागपूर.

‘मॅगी’बद्दलची सत्यासत्यता पडताळण्याची गरज
डॉ. संजय ओक यांचा मॅगी संदर्भातील लेख वाचला. ‘मॅगी’ भारतात सुमारे ३० वर्षांपूर्वी आली. मोनोसोडियम ग्लुटामेट या रसायनाची ओळख ‘स्वाद का फूल’ व इंग्रजीत ‘फ्लेव्हरएनहान्सर’ म्हणून आहे. भारतात हे रसायन ‘बेबी फूड’मध्ये-म्हणजे लहान बालकांसाठीच्या खाद्यामध्ये घालण्यास अपायकारक व मेंदूवर दुष्परिणाम करणारे म्हणून प्रतिबंधित आहे. या वस्तुस्थितीची डॉ. ओक यांना नक्कीच जाण असणार. कारण ते बालकांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. निसर्ग बालकांचा मेंदू व प्रौढांचा मेंदू यात रसायनांच्या दुष्परिणामांसाठी काहीच फरक करीत नाही. हे रसायन मोठय़ा माणसांच्या मेंदूस आणि मज्जासंस्थेलादेखील तितकेच धोकादायक आहे. मोनोसोडियम ग्लुटामेटमुळे ‘चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम’ नावाचा मज्जासंस्थेचा गंभीर आजार होतो, हे टेबर्स व इतर मेडिकल डिक्शनरीत स्पष्ट लिहिलेले आहे, हे लेखकाला माहीत असेलच. यास्तव मॅगीची भलामण कोणी करावी व करावी का, हा वादाचा मुद्दा असू शकतो. भारतीय मानसिकता अशी आहे की, पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतीय उत्पादने गुणवत्तेत बसत नाहीत म्हटले की आपण म्हणतो, ‘होऽऽऽना! पाश्चिमात्य राष्ट्रे गुणवत्तेत तडजोड करीत नाहीत.’ मात्र, भारतीय प्रयोगशाळांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांवर गुणवत्तेच्या निकषांत न बसल्याबद्दल प्रतिबंध घातला की आपण भारतीय प्रयोगशाळांवर संशय व्यक्त करतो. भारतीयांनी ‘बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्व काही चांगले’ ही मानसिकता आता सोडायला हवी. भारतीय मानके गुणवत्तेत बसत नसलेले पदार्थ जर प्रतिबंधित करीत असतील तर त्यात चूक ते काय? डॉ. ओक यांना माहीतच असेल की, भारतीय संसदेच्या कॅन्टीनमध्ये सर्व प्रकारच्या शीतपेयांच्या विक्रीवर व जाहिरातींना २००३ सालापासून प्रतिबंध घातले गेले आहेत. (संसद परिपत्रक सही करणार- ई. अहमद.. ६ ऑगस्ट २००३. ही माहिती मला माहितीच्या अधिकाराखाली संसदपत्र क्रमांक- लोकसभा सेक्रेटेरियट ११७३ दिनांक- २ सप्टेंबर २०१४ खाली मिळाली.) तसेच बहुतेक सर्व शीतपेयांमध्ये फॉस्फॅरिक अ‍ॅसिड हे रसायन घालतात. हे रसायन भयानक विषारी आहे, असे रसायनशास्त्रात सांगितले जाते. असे विषारी रसायन पिऊन आपण कोणते आरोग्य टिकवणार आहोत? याहीपेक्षा विशेष म्हणजे बाजारात अत्यंत स्वस्तात मिळणारे व्हॅनिलिन हे व्हॅनिलाच्या वासाचे रसायन डांबरापासून बनते, हे समाजास माहीत आहे काय? औषधीशास्त्राप्रमाणे कोणत्याही औषधात शिसे प्रमाणापेक्षा जास्त अस्तित्वात असल्यास ते उत्पादन कारखान्यात गुणवत्तेत बाद केले जाते. (संदर्भ- यू. एस. फार्माकोपिआ) जर मॅगी या खाद्यपदार्थात शिसे मान्यतेपेक्षा जास्त मिळाले आहे, तर त्याला प्रतिबंध का नको? भारतीय लोक हे परदेशी कंपन्यांचे गिनिपिग वा दलाल आहेत काय, की त्यांनी औषधाचे व खाद्यांचे भारतीयांवर हवे ते घातक प्रयोग करावेत आणि त्यांची उत्पादने चांगली म्हणून असे खाद्यपदार्थ भारतीयांनी सारासार विचार न करताच पोटात ढकलावेत?
– देवेन अ. जोगदेव, मालाड.