शिक्षकी पेशात आपल्या विद्यार्थ्यांची संख्या हमखास वाढत जाते. वर्ष संपलं की माजी विद्यार्थ्यांच्या संख्येत आपोआप वाढ होते. वर्षांच्या सुरुवातीला नवे विद्यार्थी दाखल होतात. म्हणजे तोटी सैल झाल्यामुळे थेंब थेंब टपकणाऱ्या नळाखालची बादली भरतच जावी तसे शिक्षकाच्या खात्यात विद्यार्थी वाढतच जातात. lok01त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गावात राहणारा प्रत्येकजण आपला गाववाला असतो तसा वर्गात बसणारा हरएक विद्यार्थी होऊन जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या वाढत्या यादीचं वेगळं श्रेय घेण्याची गरज नाही. बरं, यातले सगळेच विद्यार्थी लक्षात राहतात असंही नाही. याउलट, काही विद्यार्थी विसरताच येत नाहीत. साधारणपणे चळवळे, बोलके, अंगी काही गुण असणारे किंवा उपद्रवी विद्यार्थी बऱ्यापैकी लक्षात राहतात. असे विद्यार्थी पुढं कुठं कुठं भेटत राहतात. वर्गातल्या डायसवर चोख असणारा आणि विद्यार्थ्यांबद्दल आस्था ठेवणारा शिक्षक विद्यार्थ्यांच्याही विस्मरणात जात नाही. एखाद्या लग्नकार्यात एखादी स्त्री आपल्या छोटय़ा मुला-मुलीला ‘हे माझे सर बरं का!’ अशी आत्मीयतेनं ओळख करून देते. गच्च भरलेल्या एसटीत स्वत:ची खिडकीत धरलेली जागा उभ्या असलेल्या शिक्षकाला सन्मानाने विद्यार्थी देतो, तेव्हा या पेशाचं वेगळेपण अधिक ठळक होतं.
पोटापाण्याला, संसाराला लागलेले विद्यार्थी बऱ्याचदा भेटायला येतात. बोलताना संदर्भ आठवतात. त्यांची जुनी बॅच लक्षात येते. तेव्हाचे प्रसंग, घटना आठवतात. गेल्या महिन्यात असाच एक माजी विद्यार्थी सहज भेटायला आला. पहिल्या भेटीपासूनच हा विद्यार्थी माझ्या लक्षात होता. पाचेक वर्षांपूर्वीची त्यांची बॅच होती.
आमच्या विद्यापीठात ‘कमवा आणि शिका’ नावाची एक चांगली योजना आहे. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत विद्यार्थ्यांनं सकाळी दोन तास बागेत काम करायचं, त्याचा मोबदला म्हणून महिन्याला पैसे मिळतात. या पैशांची गरीब विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होते. काहींचं तर या योजनेमुळं शिक्षण पूर्ण होतं. या योजनेत नंबर लागण्यासाठी काही नियम व अटी आहेत. आलेल्या अर्जाची छाननी होऊन गरजू विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या निवड समितीवर त्या वर्षी मी होतो. सहकारी प्राध्यापकासोबत मुलाखती घेणं सुरू होतं. खरं तर जवळपास सर्वच मुलांची आर्थिक परिस्थिती खराब आहे हे जाणवत होतं. पण मर्यादित जागा असल्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांची निवड करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यातल्या त्यात बिकट परिस्थितीवाला होतकरू विद्यार्थी आम्ही शोधत होतो. पोरांच्या अडचणी ऐकून आम्हालाच अपराधी वाटत होतं. प्रश्न विचारतानाही संकोच वाटत होता. मुलं भडाभडा बोलत होती. जे बोलत नव्हते त्यांची परिस्थिती बोलत होती. पार लांबच्या गावावरून पॅसेंजर ट्रेनने रात्रभर प्रवास करून एक विद्यार्थी आलेला होता. चुरगळलेले मळके कपडे. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर केस ओले करून काढलेला केसांचा चापट भांग. पहाटे चार वाजता स्टेशनात येऊन झोपला. सकाळी उठून रेल्वे स्टेशनपासून दहा-बारा कि. मी. अंतर पायी आलेला. गावाकडे घरी अत्यंत वाईट परिस्थिती. पण शिकण्याची जिद्द नि आत्मविश्वास त्याच्यात जाणवत होता. फार प्रश्न विचारण्याची गरजच नव्हती.
मुलाखती संपत आल्या होत्या. बराच वेळ झाला होता. एक शेवटचा विद्यार्थी आत आला. त्याचं नाव सुरुवातीला पुकारून झालं होतं, पण तो उपस्थित नव्हता. उशिरा पोहोचल्यामुळे त्याला शेवटी बोलावलेलं होतं. त्याच्या डोळ्यांत विलक्षण चमक होती. छोटय़ा गावातून आलेला असल्यामुळे थोडासा संकोचलेला, लाजलेला होता. पण बोलता बोलता खुलला. छान बोलायला लागला. त्याची ग्रामीण ढंगाची लयदार भाषा होती. लेखक होणं हे त्याचं स्वप्न होतं. म्हणून तो विद्यापीठात शिकायला आला होता. सोबत जिल्हा दैनिकांत छापून आलेल्या कथांची कात्रणं होती. कथालेखन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार मिळालेलं प्रमाणपत्र होतं. आम्हीही त्याच्या लेखनाला दाद दिली. तो अधिकच खुलला. ‘सर, आपल्याला तुमच्यासारखा प्राध्यापक व्हायचंया.. अन् खूप गोष्टी लिव्हायच्यात. म्हणून मी इथं आलोया. राह्य़ाची-खायाची सोय झाली ना मंग फिकीर नाही. लागलं तर मी एसटीडीवर काम करीन, नाहीतर पेपर वाटीन.’ त्याचा निर्धार पक्का होता. त्याच्या परिस्थितीचा नेमका अंदाज घेण्यासाठी वडिलांच्या व्यवसायाची चौकशी केली. तो जरा हळवा झाला. म्हणाला, ‘माय-बाप दोघंबी मजुरी करत्यात. पण आम्ही वायलं राहतो. माय-बापानं आम्हाला घराबाहीर काढलंया.’ आमच्या डोक्यात प्रश्न आला- आम्हाला म्हणजे कोणाकोणाला घराबाहेर काढलंय? सगळ्या भावा-बहिणीला? त्यानं थोडंसं लाजून उत्तर दिलं, ‘माझंवालं बारावीलाच लगीन झालंय. मला अन् बायकोला घराबाहेर काढलंया.’ गंमत म्हणजे घराबाहेर काढण्यासाठी मालमत्तेचे किंवा इतर कोणते वाद नव्हते. माय-बापाच्या मजुरीवर घर चालत होतं. घर म्हणजे झोपडपट्टीतल्या पत्र्याच्या दोन खोल्या. माय-बापाच्या मते बी. ए. झाल्यावर पोरानं मिळंल ती नोकरी धरावी. बायकोच्या मते, नवऱ्यानं अजून  शिकावं. घरात दोन गट पडले. सुनेमुळं एकुलतं एक पोरगं बिघडलं म्हणून माय-बापानं भांडण काढलं. शेवटी त्यांना घराबाहेर काढलं. ही तरुण पोरगीही मोठी जिद्दीची. नवऱ्याला घेऊन वेगळी झाली. एका खोलीत संसार थाटला. स्वत: मजुरीला जाऊ लागली. बिडय़ा वळू लागली. आणि नवऱ्याला शिकायला पाठवलं. त्या पोरीची जिद्द आणि त्या विद्यार्थ्यांचा लेखक होण्याचा संकल्प आम्हाला प्रभावित करून गेला.
त्यानं कथेचा ‘गोष्ट’ असा उल्लेख करणं मला फार भावलं. ‘कमवा आणि शिका’ योजनेत काम करीत त्यानं अभ्यास सुरू केला. नियमित तासाला हजर असायचा. चर्चेत सहभागी व्हायचा. विभागाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत सक्रिय असायचा. त्याला पडणारे प्रश्न वर्गात मोकळेपणाने विचारायचा. गोष्टी लिहिणं सुरूच होतं. दरम्यान, त्यानं वेगवेगळी नियतकालिकं नेऊन वाचायलाही सुरुवात केली होती. आता त्याला चांगल्या अंकांतून गोष्टी प्रकाशित करण्याचे वेध लागले होते. बोलता बोलता एकदम शून्यात नजर नेण्याची त्याची लकब वेगळीच होती. कशाबद्दलच त्याने कधी तक्रार केली नाही. कुठल्या तरी कथाकथन स्पर्धेत सहभागी झाला. बक्षीस मिळालं नसल्याची बातमी शांतपणे स्वत:च येऊन सांगितली. एकूण सगळा साहित्यव्यवहार तो समजावून घेत होता असं वाटत होतं. नवोदित लेखक व सर्वाशी संवादी असणारा विद्यार्थी म्हणून प्राध्यापक मंडळीही त्याच्यावर खूश होती. त्यालाही त्याच्या लेखकपणाचा अभिमान होता. त्यात उत्साहाचा भाग असला तरी त्याच्या कथांमध्ये उद्याच्या चांगल्या लेखनाच्या अनेक सुप्त शक्यता होत्या. त्याची ग्रामीण भाषेची समज उत्तम होती. त्याच्या डोळ्यांतली निरागसता आश्वासक होती.
सगळं व्यवस्थित सुरू असतानाच तो एकदम तासाला येईनासा झाला. रोज काहीतरी निमित्त काढून भेटणारा हा विद्यार्थी आठ दिवस दिसलाच नाही. वर्गातल्या इतर मुलांकडे चौकशी केली तर तो हॉस्टेललाही नसल्याचं कळलं. ‘कमवा आणि शिका’च्या कामातही तो गैरहजर होता. कदाचित आजारी पडला असेल, घरी काही अडचण असेल म्हणून आम्हीही काही दिवस वाट पाहिली. पण महिना उलटला तरी त्याचा पत्ता नाही. काही खबर नाही. अनेक अडचणींमुळं खेडय़ांतून आलेली काही मुलं अध्र्यातूनच गावी निघून जातात. बऱ्याचदा कौटुंबिक अडचणी असतात. म्हणजे प्रामुख्याने आर्थिक अडचणच असते. एवढं मोठं झालेलं पोरगं कमवायचं सोडून शिक्षणच घेतंय, ही कल्पना अशिक्षित माय-बापांना पचत नाही. या विद्यार्थ्यांला तर आर्थिक अडचण होतीच. कारण त्याची बायको स्वत: मजुरी करून घर चालवायची. पण नेमकं काय कारण घडलं, ते काही कळेना. न राहवून शेवटी त्याच्या जुन्या कॉलेजातल्या माझ्या ओळखीच्या प्राध्यापक मित्राशी संपर्क केला. हे प्राध्यापक त्याला बी. ए.ला शिकवायला होते. शिवाय त्याच्या होतकरूपणाचं त्यांनाही कौतुक होतं. तालुक्याचं छोटं गाव. प्राध्यापक मित्राने विद्यार्थ्यांना घरी पाठवून आमच्या बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली. मिळालेली माहिती धक्कादायक होती.
हा आमचा कथाकार विद्यार्थी कुणालाही न सांगता एक दिवस विद्यापीठ सोडून गावाकडे निघून गेला होता. कारण नवऱ्याच्या शिक्षणासाठी स्वत: मजुरी करणारी त्याची बायको गरोदर होती. नवऱ्यानं शिक्षण सुरू ठेवावं म्हणून सासू-सासऱ्याशी भांडण घेणारी त्याची बायको एकटी राहायची. गरोदर असतानाही सहा महिने ती मजुरीवर कामाला गेली. पण आता दोन जीवाच्या त्या पोरीला काम शक्य होईना. घरी कोणी मदतीला नाही. माहेरीही गरिबी. सगळे मोलमजुरी करणारे. नाइलाजाने नवऱ्याला निरोप पाठवला आणि हा लेखक विद्यार्थी बोऱ्याबिस्तारा गुंडाळून गावाकडे निघून गेला होता. जाण्याशिवाय त्याला पर्यायही नव्हता. काहीतरी व्यक्त करू पाहणारा एक विद्यार्थी हजेरीपटावरून कमी झाला.
त्यानंतर पाचेक वर्षांनंतर हा विद्यार्थी भेटायला आलेला होता. एकूण रागरंगावरून त्याचं सगळं व्यवस्थित सुरू आहे असं दिसत होतं. राजकारणी लोकांसारखे स्टार्च केलेले पांढरे कपडे. खिशात वाजणारा मोबाइल. (दहा-पंधरा मिनिटांत दोनदा केबिनबाहेर जाऊन आलेले कॉल त्याने घेतले होते.) सोबत कपाळावर भलामोठा टिळा लावलेला एकजण होता. तो मोकळं बोलत होता, पण मध्येच शून्यात जाऊन बघण्याची त्याची सवय आता राहिलेली नव्हती. मीच कथालेखनाची आठवण काढली. त्याने थेट उत्तर दिलं, ‘‘सर, ते लई अवघड काम झालंया आता.’’ मी कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यानं एका वाक्यात नेमकं उत्तर दिलं, ‘‘सर, गोष्टी लिव्हायच्या म्हणजे तळ निर्मळ पाहिजे. आपलं पाणी आता लई गढूळ झालंया.’’ मी काय समजायचं ते समजलो. त्याच्या बोलण्यावरून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्याच होत्या. बिकट परिस्थितीत याला पैशाची गरज होती. स्थानिक राजकीय नेत्यानं याला मदत केली. वर उचलण्यासाठी याचा हात धरला आणि त्याच्या पायाखालचा रस्ताच गायब केला. सगळेच संदर्भ बदलून गेले. त्याचं आडवंतिडवं वाढलेलं शरीर आणि डोळ्यांतली हरवलेली निरागसता लक्षात येत होती. त्याच्या घडय़ाळाचा सोनेरी पट्टा अधिकच चमकत होता. त्याच्या गोष्टी जन्माला येण्याआधीच तूर्त तरी मरून गेलेल्या होत्या.
 दासू वैद्य