एक चिनी लोककथा माझ्या वाचनात आली होती. ती वाचताच मला भर्तृहारीच्या नीतीशतकामधल्या एका सुभाषिताची आठवण झाली. प्रीतीच्या गडबडगुंत्यावर फार सुंदर भाष्य आहे ते. ‘या चिंतयामि सततं, मयि सा विरक्ता- साप्यन्यनिच्छति जनं स अनोन्यसक्त:’.. इ. थोडक्यात- या सुभाषिताचा गोषवारा असा की, ‘मी जिचं सतत चिंतन करतो, ती माझ्याबद्दल उदासीन असून दुसऱ्याच्या प्रेमात आहे. तो मात्र तिसरीवरच आसक्त आहे; जी चौथ्यावर लुब्ध आहे. चौथा वेगळ्याच व्यक्तीवर फिदा आहे; जिची आणिकच कुणावर तरी जान कुर्बान आहे.’ सुभाषिताचा शेवट आहे- ‘धिक्  तां च तं च मदनं च इमां च मां च.’ म्हणजे ‘त्याचा, तिचा, ह्य़ाचा, माझा आणि मदनाचा- सगळ्यांचा धिक्कार असो!’ प्रेमबिम सब झूट है! प्रेमाच्या उच्छृंखलपणाचे किती मार्मिक आणि मिश्कील वर्णन आहे हे! मी वाचलेली चिनी लोककथा याच प्रेमाच्या खो-खोवर बेतली होती. तर ती कथा, भर्तृहारीचा श्लोक आणि माझा आवडता नाटय़प्रकार तमाशा यांची युती होऊन एक लोकनाटय़ उगवले. आपले नाव घेऊनच ते जन्माला आले- ‘धिक् ताम्.’ एक नव्हे, तर दोन अर्थानी हे नाव नाटकाला अगदी चपखल बसले. एक तर ‘धिक् ताम्’ हे खुद्द श्लोकामधलेच परवलीचे दोन शब्द होते- (प्रेमाचा) ‘धिक्कार असो.’ आणि दुसरे म्हणजे लावणीच्या गिरकीला साथ करणारे तबल्याचे बोल.
माझ्या या लोकनाटय़ाच्या जन्माची कथा तशी मजेशीर आहे. १९८०-९० च्या दरम्यान दिल्लीला एक प्रसिद्ध नाटय़महोत्सव होत असे : ‘मंझर थिएटर फेस्टिव्हल.’ देशभरची गाजलेली नाटके या सोहळ्यासाठी आवर्जून येत असत. प्रगती मैदानाच्या भव्य आणि विस्तीर्ण परिसरात मुद्दाम बांधलेल्या नाटय़मंडपात ही नाटके सादर होत. ‘मंझर’ची खूप हवा झालेली होती. त्या फेस्टिव्हलमध्ये भाग घेणाऱ्या नाटकमंडळींची शान निश्चितच वाढत असे. बिंदू बात्रा ही माझी मैत्रीण या महोत्सवाची संचालिका होती. एका रात्री तिचा फोन आला, ‘या सोहळ्यासाठी मला तुझी दोन नाटकं हवी आहेत.’ त्यावेळी माझ्याकडे- म्हणजे आमच्या ‘कौतुक’ संस्थेकडे ‘पुन्हा शेजारी’ हे एकच नाटक होतं. ‘एकानं भागणार नाही,’ बिंदू म्हणाली, ‘दुसरं स्क्रिप्ट तयार आहे का?’ ‘छे गं. डोक्यात एक पुसटसा आराखडा आहे, बस्स.’ तिने फारच आग्रह केल्यावर मी फोनवरच तिला ‘धिक्  ताम्’ची संकल्पना सांगितली. ‘झकास आहे!’ बिंदू म्हणाली, ‘अजून दीड महिना आहे तब्बल. लिही पटापट आणि बसवून टाक..’ असं म्हणून तिने मला काही सबब सांगायला अवसर न देताच फोन बंद केला. एवढंच नव्हे, तर पठ्ठीने ‘कौतुक’च्या दोन नाटकांची प्रसिद्धीसुद्धा सुरू केली. मग मी पिसाटल्यासारखं काम सुरू केलं. बरोबर दीड महिन्यानंतर दिल्लीच्या प्रगती मैदानात ‘धिक्  ताम्’चा दणक्यात प्रयोग झाला.
या माझ्या लोकनाटय़ाचा धागा एका राजमहालात गुंतत जातो. राजे षण्मुखानंद हे राजनर्तकी कस्तुरीच्या प्रेमात असतात. पण तिचे मन लुच्च्या प्रधानावर- छबिलदासवर जडलेले असते. त्याचा डोळा मात्र खुद्द राजकुमारी पिंपळपल्लवीवर (पिंपल) असतो. पिंपल उमद्या परदेशी मुशाफिरावर- मफलरसिंगवर फिदा असते. मफलरचा रोख जरा वेगळा असतो. त्याला दामू हा राणीसाहेबांचा राजबिंडा सेवक आवडतो. पण दामूचा जीव आहे राणी प्राजक्तावर. (‘रातकिडय़ानं चंद्रकोरीवर प्रीत करू ने असं कुटं लिवलंय का?’) राणीची पतिभक्ती मात्र अढळ आहे. (‘महाराज माझे पंचप्राण आहेत. माझी मेलीची फारा दिवसांची एक हौस आहे.. आपलं पातिव्रत्य जगाला दाखवून देण्यासाठी सती जायची माझी खूप इच्छा आहे.’)
– तर अशी ही पात्रे! त्यांची तऱ्हेवाईक कथा नानगरीत उलगडते. प्रारंभीच सोंगाडय़ा आणि साथीदार लाल्या यांच्या प्रवेशात नाटकाच्या मथळ्याचा थोडा ऊहापोह केला जातो.
लाल्या : राव, तुमच्या वगाला काही नाव-गाव आहे की नाही?
सोंगाडय़ा : आहे तर! चांगलं भक्कम नाव आहे. ऐक! धिक्  तां च तं च मदनं च- (लाल्या जाऊ लागतो.) अरे, कुठं चालला?
लाल्या : चुकून भलतीकडे आलो म्हणून चाललो होतो. गडय़ा, मी हिते फक्कड मराठी तमाशा बगायला आलो होतो. लुप्तनाटय़.
सोंगाडय़ा : लुप्तनाटय़ नाही मूर्खा, लोकनाटय़. मित्रा, हिते मराठी तमाशाच होणार आहे.
लाल्या : आन त्ये कस्काय? आता तुम्ही आगिनगाडीवाणी बोलला नव्हं, ‘धिक्  धागेना तिनक धिन्- इमां हमां चं त्डांग धा!’ मला वाटलं, मी चुकून डान्स क्लासला आलो.
सोंगाडय़ा : मित्रा, तू योग्य ठिकाणी आला आहेस. हिथे अस्सल मऱ्हाटी तमाशाच होणार आहे. धिक्  ताम्.
लाल्या : आर्तिच्या! फुन्हा त्येच. ही जर मऱ्हाटी भाषा, तर मग आपून कानडी.
सोंगाडय़ा : वेडय़ा, ही संस्कृत भाषा. मायबोली मऱ्हाटीची ही आजी समज.
लाल्या : आन् तमाशामंदी आजीबायांचं काय काम?
सोंगाडय़ा : हीच! हीच वृत्ती आपल्याला रसातळाला घेऊन चालली आहे बरं. अरे, संस्कृतीचा काही अभिमान बाळगाल? आपले खापर-ढोपर पणजोबा ज्या संस्कृत भाषेमध्ये बोबडे बोल बोलले, ती भाषा तुम्हाला परकी झाली? दूर दूर देशांहून ही भाषा शिकायला मंडळी येतात. रशियन पंडित, जर्मल शास्त्री, अमेरिकन ऋषीमुनी.. आन् तुमी? धिक्कार! थू तुमच्या जिनगानीवर-
लाल्या : लेका, तू  शिवाजी मंदिरात तमाशा करतो, का शिवाजी पार्कात भाषण ठोकतो?
तमाशामध्ये संस्कृतीची भलावण हे कदाचित विसंगत वाटेल; पण माझ्या प्रिय भाषेचा ‘पी. आर.’ करायची संधी मी कधीच वाया जाऊ देत नाही.
नाटकासाठी मी चार-पाच गाणी लिहिली होती. दुर्दैवाने जी जुनी संहिता माझ्या संग्रही आहे, तिच्यात नेमकी गाणी नाहीत. आठवतात ती अशी- गवळण (नकोस अडवू वाट), एक दिवाणखान्यातली लावणी, साधूबाबासाठी एक स्तुतीगीत आणि अर्थातच शीर्षकगीत- जे सगळे जोषात म्हणत.
धिक्  तां च तं च मदनं च..
माझी प्रीती तिजवरती, पण तिने मानिला अन्य पति-
तो दुसरीच्या मागे लागे, जी तिसऱ्यावर फिदा अती,
तिसरा चौथीचा दीवाना, चौथी लट्टू मजवरती
मदनाच्या या लीला पाहून, भल्याभल्यांची गुंग मती
मदनाच्या तावडीत आले, वाटोळं त्या सर्वाचं-
धिक् ताम्
धिक्  तां च तं च मदनं च..
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी संगीतासाठी  यशवंत देव यांच्याकडे धाव घेतली. त्यांनीही एकापेक्षा एक सरस अशा चाली बसवल्या. संगीताची बाजू भक्कम झाली. पण एक मोठी उणीव राहिली. दुर्दैवाने, तमाशाचे अतिशय महत्त्वाचे- अगदी ‘अहं’ असे अंग लावणीनृत्य त्याकडे मी म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. दिल्लीला आम्ही केलेल्या ‘एक तमाशा अच्छा खासा’मध्ये चंपक जैनने आपल्या नृत्यनैपुण्याच्या जोरावर लावणीचा भार आपल्या नाजूक खांद्यांवर पेलला होता. या खेपेला मात्र नन्नाचा पाढा होता. खरं तर धंदेवाईक तमाशा कलावंतांची मदत घेऊन आमच्या ‘फडा’त एक-दोन अस्सल नृत्यांगनांचा समावेश करून घ्यायला हवा होता. पण गाणी आणि वग यांची बाजू भक्कम असली की फारसा फरक पडणार नाही अशी आम्ही सोयीस्कर समजूत करून घेतली. चूक! सपशेल चूक! जेव्हा  तुम्ही ‘तमाशा’ सादर करणार अशी घोषणा करता तेव्हा आपली समस्त लेणी घेऊन तमाशा हजर होणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. लावणीच्या घुंगरांच्या ठसक्यानं मंच दणाणला पाहिजे, प्रेक्षागृह उसळलं पाहिजे असा साधा हिशेब असतो. दुर्दैवाने आमचा खजिना तोकडा पडला.
जाहिरातयुग अद्याप सुरू झालं नव्हतं. ऊठसूट प्रायोजकाकडे धाव घ्यायची पद्धत रुजली नव्हती. तेव्हा होत्यावरच (खरं तर नव्हत्यावर!) भागवायची नाटय़निर्मात्यावर पाळी येत असे. तर थोडक्यात, आम्ही गाणी, नाटय़, संवाद यांवरच भर दिला.
‘अब दिल्ली दूर नहीं’ची सतत जाणीव असल्यामुळे मी घाईघाईने कलाकार जमवले. नटांची निवड मी नेहमी चोखंदळपणाने करते. नटवृंद तल्लख असेल तर निम्मी लढाई मोहिमेच्या आधीच सर झाल्यासारखी असते. या खेपेला फारसा वेळ नव्हता; पण तरीही बळकट पात्रयोजना करण्यात आम्हाला यश मिळाले. राजघराण्यात राजा, राणी आणि राजकुमारी म्हणून मंगेश कदम, सविता प्रवीण आणि विनी दाखल झाले. प्रधानासाठी प्रकाश बुद्धिसागर ठरला. प्रकाश स्वत: एक समर्थ दिग्दर्शक होता आणि हुशार होता. पण त्याचे माझे सूर जुळले नाहीत. आमच्या विनोदाची जात खूप वेगळी होती. तो संवादात पदरची वाक्यं घालून ‘पंचलाइन’ची ऐसी की तैसी करीत असे. त्याचं म्हणणं की, तमाशात उत्स्फूर्तपणा पाहिजे. नटांना संवादात जखडून ठेवता कामा नये. त्याचे म्हणणे चूक नव्हते. पण दिल्या स्वातंत्र्याचा परिणाम झालाच नाही तर काय उपयोग? विनोदी वाक्यालासुद्धा सम गाठावी लागते. भाराभर भुस्सा घातला तर प्रवेश बापडा त्रिशंकूसारखा लटकतो. प्रकाशच्या एका जोडलेल्या विटेची मात्र वाखाणणी करायला हवी. गवळणीच्या प्रवेशात कृष्ण आणि लाल्या मथुराबाजाराला निघालेल्या तिघा बायांची वाट अडवतात. त्यांची छेडछाड करतात.
कृष्ण : बरं बायांनो, तुमाला काय नावबीव असंलच की-
१ : हाये की. सासरचं, माहेरचं- दोन्हीबी नावं हैत.
२ : बापाचं सांगू का दादल्याचं?
लाल्या : आता त्यानला कशापायी मधी ओढायचं?
कृष्ण : आपलं सोताचं नाव सांगा. पाळण्यातलं.. तुमी?
१ : इर्लाबाई.
२ : पार्लाबाई.
३ : कुर्लाबाई.. आन् तुमी?
कृष्ण : आमी बिर्ला!
लाल्या : आन् आपून उरला सुरला.
तर ‘उरला सुरला’ ही प्रकाशची देण होती. तिला खूप दाद मिळत असे. दामूच्या भूमिकेसाठी शशांक तेरे या गुणी नटाची निवड झाली. त्याचा चेहरा अतिशय बोलका आणि बुद्धी तल्लख होती. त्याने पुढे माझ्या ‘दिशा’ सिनेमात छोटंसं काम केलं. पण पुढे मात्र त्यानं अभिनयाला पार सोडचिठ्ठी दिली. आज तो हिंदी सिनेसृष्टीत एक अव्वल कलानिर्देशक म्हणून प्रसिद्ध आहे. राजनर्तकी कस्तुरीसाठी सीमा सावंत रुजू झाली. तिच्याएवढी मादक अभिनेत्री मी मराठी रंगभूमीवर पाहिली नाही. मी स्वत: स्त्री असल्यामुळे माझ्या या अभिप्रायाला रास्त महत्त्व दिलं जावं. सीमा मादक तशीच बिनधास्त होती. तिची अदाकारी लाजवाब असे. नाच हा मात्र तिचा प्रांत नसल्यामुळे लावणीचे प्रवेश एकदम फिके पडत. राजबिंडय़ा मुशाफिराचे- मफलरसिंगचे काम करायला एका नव्या उमद्या नटाने डौलात प्रवेश केला. सचिन खेडेकर. कोणत्याही दिग्दर्शकाला आवडावा असा नट. उत्साही, प्रतिभावान, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ. मफलरचे काम त्याने उत्तम केले. त्याचं प्रेमदैवत असतं दामू. प्रेमाच्या शंृखलेमधल्या या तिरपागडय़ा कडीबद्दल काही प्रतिकूल पडसाद उमटतात की काय, अशी मनात थोडी बागबूग होती. पण ‘धिक्  ताम्’च्या एकूण विक्षिप्त प्रेमचक्रामध्ये ते सामावून गेले. कुणी ब्रसुद्धा काढला नाही. किशोर नांदलस्करांनी भंपक साधूचे- ‘अतिशय परमेश्वर पवनपुत्र महाराज’ यांचे काम केले. केवळ अप्रतिम. त्यांच्या प्रवेशाला प्रेक्षकांचं हसू आवरेपर्यंत नटांना घडी घडी थांबावं लागे. एका प्रसंगी त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी समस्त प्रेमीजन जमले आहेत. काहीतरी योग्य भेटवस्तू मिळाली तरच बाबा बातचीत करतील अशी अट असते. त्यांचा आणि कस्तुरीचा प्रवेश :
पवन : हां बाई, काय देणार तुम्ही आम्हाला? बरंच काही उकळलं आहे तुम्ही महाराजांकडून.
कस्तुरी : अवो, कसलं काय गोसावीबाबा! मला दिलेले समदे डागडागिने खोटे निगाले बगा. धंदा बसलेल्या नाटकवाल्यांनी लिलावात काडलेले. ह्य़ो कसला राजा? शेत राखणारं बुजगावणं बरं त्याच्यापरीस.
पवन : तू मला काहीही देणार नाहीस तर?
कस्तुरी : आन् असं म्हटलं का बरं मी?.. आज रातीला या हवेलीवर. मंग बगू म्हनं..
पवन : बाई! हे काय भलतंसलतं बोलताहात? मी साधू आहे!
कस्तुरी : आन् मी काय भलतं बोलले बाई? अवो, तुमी माज्या हवेलीवर आलात तर चा नाहीतर काफी देनारच की मी. काय तशीच जाऊ देनार का?.. तुमी काय समजलात बरं? तुमच्या मनात काही वाईट-वंगाळ आलं काय?.. म्हंजी म्या ऐकलं हुतं की समदे साधू लुच्चे असतात, ते खरं तर..
तमाशाच्या फडामधून वर्तमान राजकीय आणि सामाजिक घडामोडींची नेहमीच दखल घेतली जाते. जत्रेमध्ये व्यंगप्रतिबिंब दर्शवणारे आरसे असतात, तेच काम तमाशा चतुरपणे करू शकतो. विनोदाच्या पांघरुणाखाली दडून तो समाजकंटकांवर आणि हानिकारक रूढींवर जबरदस्त हल्ला चढवू शकतो. राष्ट्रसेवा दलाच्या लोकनाटय़ांनी अतिशय समजूतदारपणे हे काम केले आहे. दादा कोंडक्यांनीही आपल्या लोकप्रियतेच्या वलयाचा फायदा घेऊन आपल्या वगांमधून असंख्य भोंदूंना चिमटे काढले आहेत. ‘धिक्  ताम्’मधला एक प्रवेश.. राणी प्राजक्ताच्या महाली षण्मुखानंद राजे प्रवेश करतात.
राणी : पंचप्राण! माझ्या डोळ्यांच्या तेवत्या निरांजनांनी मला आपली आरती उतारू दे.
राजा : च्! वैताग साला. यांच्या पतिभक्तीनं आम्हाला गुदमरायला होतं.
राणी : आपली डावी भुवई वाकडी का बरं? दासीचं काही चुकलं का?
राजा : राणीसाहेब, तुमच्या माहेरच्या लोकांना आमची कदर नाही.
राणी : हे काय बोलणं? नुकताच बाबांनी खास ‘रिपब्लिक डे’साठी एक सजवलेला हत्ती धाडला होता भेट म्हणून.
राजा : हत्ती धाडला- स्वत:ला तो पोसायची ऐपत नाही म्हणून. कहर साला. खायला काळ, भुईला भार!
राणी : बरं, आपल्या वाढदिवसाला धाडलेला शुभ्र अबलख घोडा?
राजा : मुद्दाम हिणवायला धाडला सासरेबुवांनी. आम्हाला घोडय़ावर बसायला येत नाही, हे ठाऊक आहे त्यांना.
राणी : मग पंचप्राण, आपल्याला हवंय तरी काय?
राजा : तीनपदरी टपोरा मोत्यांचा हार!
राणी : महाराज, हे मात्र टू मच् झालं. नुकताच बाबांना शेअरबाजारात फटका बसलाय, हे ठाऊक आहे आपल्याला. मी मुळीच माहेरून हार मागवायची नाही.
राजा : अस्सं? कोण आहे रे तिकडे? (चांदीची गुलाबदाणी घेऊन सेवक येतो. राजा राणीवर शिंतोडे उडवतो. ती खुद्कन हसते.)
राणी : राहू दे, राहू दे.. या असल्या खुशामतीनं मी नाही फसायची. माझ्या अंगावर कितीही गुलाबपाणी शिंपडा. अगंबाई, कसला हा वास? ईऽऽ घासलेट.
राजा : होय. घासलेट. केरोसिन! माहेरून मोत्यांचा हार नाही मागवला, तर- (काडी पेटवल्याचा आविर्भाव.)
सेवक : नाही तरी राणीसाहेबांना अग्निपरीक्षा देण्याची हौस आहे. सती जायचं म्हणत व्हत्या-
राणी : खोटं! बायकोनं माहेरून नजराणा आणला नाही म्हणून तिला उभी जाळणार? असं कधी होतं का?
आणि मग दोन्ही विंगेमधून लोकसत्ता, टाइम्स इ. वर्तमानपत्रे घेऊन सेवक येतात आणि हुंडाबळीच्या खऱ्या खऱ्या बातम्या तारखांसकट वाचून दाखवतात. इतका वेळ खदखदून हसणारा प्रेक्षक गप्प होतो.
दिल्लीला मंझर महोत्सवात ‘धिक्  ताम्’चे छान स्वागत झाले. बहुतेक प्रेक्षक अ-मराठी होता. त्यांना हा वेगळाच प्रकार खूप मजेशीर वाटला. पुन्हा परतल्यावर आम्ही मुंबई-पुण्याला प्रयोग लावले.
कोणत्याही कलाकृतीला वृत्तपरीक्षणं वाईट आली, की आम्हाला ‘मिक्स्ड रिव्ह्य़ूज्’ मिळाले, असं म्हणायचा प्रघात आहे. पण ‘धिक्  ताम्’ला खरोखरच सरमिसळ प्रतिसाद मिळाला.
* नाटय़ाची एकूण मांडणी सपक झाल्यामुळे फारसा प्रभाव पाडू शकलं नाही.
* सई परांजपेने तमाशा ‘शाकाहारी’ केला आहे. मिर्चीच्या बिया काढून साल तेवढी शिल्लक ठेवली आहे.. – लोकप्रभा.
* सर्व असूनही तमाशाला साजेसे तिखट चतुराईचे नाटय़ पाहिल्याचे समाधान मिळाले नाही.   – महाराष्ट्र टाइम्स.
हे झाले काही नाक मुरडणारे अभिप्राय. पाठीवर शाबासकीची थाप देणारे अभिप्रायही आहेत.
* संहिता वाचतानाच ‘सई टच्’ जागोजाग जाणवत होता. तमाशाला अनुरूप असा मोकळेपणा संहितेत होता.              – अंजली कीर्तने (म. टा.)
* Play fickles continuously with it’s dialogues, unexpected situations and satirical references. Sai extracts superb performances. Winnie is delightful as the convent educated Princess Pimple.  – Times of India.
* चुरचुरीत आणि मिश्कील लोकनाटय़  – प्रसन्नकुमार अकलूजकर (केसरी)
* अतिशय वेधकतेनं, कल्पकतेनं आणि रोचकतेनं मांडलेला खेळ. सत्यवान देशमुख यांची ढोलकीसाथ मोलाचा हातभार लावते.
– सुरेशचंद्र पाध्ये (सकाळ)
* Sai achieves feat with cheekiness and fun. – Dnyaneshwar Nadkarni, Afternoon.
परीक्षक काही का म्हणेनात, नेहमीप्रमाणे जनताजनार्दनाने दाद दिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी ‘अस्सल’ तमाशा केला नाही, असा एक सूर होता. पण मी जातिवंत गावरान तमाशा करणं कसं शक्य आहे? त्या सुंदर लोकनाटय़प्रकाराने प्रभावित होऊन मी त्याला माझ्या ‘कल्प’मतीने सजवला.. फुलवला. फ्रेंच रिव्ह्य़ू आणि मराठी तमाशा यांत मला नेहमीच खूप साम्य वाटतं. तोच बेबंदपणा, तोच जगण्याचा आनंद, तीच बेहोशी! जणू जन्मत:च ताटातूट झालेली आणि वेगवेगळ्या संस्कारांखाली वाढलेली जुळी भावंडं. या दोन्ही माध्यमांमधून मला काम करायला मिळालं, हे माझं अहोभाग्य.