माझ्यासमोर एक साठ वर्षांचे गृहस्थ बसले होते. त्यांच्या मुलीची समस्या घेऊन ते आले होते. त्यांची मुलगी गेली चार वर्षे  विचित्र वागत होती किंवा त्यांच्या ते लक्षात आलं होतं. कदाचित त्याच्याही आधीपासून त्याची सुरुवात झाली होती. ती स्वत:शीच पुटपुटत बसे, हसत असे. स्वत:ची नियमित काळजी (दात घासणे, आंघोळ, जेवण वगरे.) सुद्धा सांगितल्यावरच करत असे किंवा काही वेळा करतसुद्धा नसे. काम तर काहीच करत नव्हती. सव्वीस वर्षांची त्यांची ही मुलगी स्वत:च्याच तंद्रीत बसून राही. घरातल्यापासून बाहेरच्या सर्वावर संशय घेई. मध्येमध्ये हिंसक होत असे. तिची झोपही कमी झाली होती. रात्रभर फेऱ्या, बडबडणं चालू असे.
ते गृहस्थ मला सांगत होते, ‘‘डॉक्टर, तिला बरे करा. माझ्याच्याने बघवत नाही तिची अवस्था.’’ मी त्यांना विचारलं की, ‘‘इतकी वष्रे काही उपचार केले का तिच्यावर?’’ तर त्यांनी सांगितलं की, ‘‘तिचं असं वागणं सुरू झाल्यावर आम्हाला काही कळेना ती असं का वागते आहे? माझ्या पत्नीनं, मुलानं मग निष्कर्ष काढला की हे काहीतरी ‘बाहेर’चं आहे. आजूबाजूचे लोकही हेच सांगू लागले. मला पटत नव्हतं, पण माझं कोणी ऐकलं नाही. मग गेली चार र्वष हेच चालू आहे, बाबा, बापू, भगत! ही पूजा, ती शांत, तो नारायण नागबळी वगरे! सर्व केलं पण फरक काही नाही. चार वर्षांत या सर्वावर सहा लाख रुपये खर्च झालाय. पण आता ठरवलं आहे की नाही, डॉक्टरी उपचारच करायचे. म्हणून तुमच्याकडे आलो आहे. आता तिला लवकर बरे करा.’’
मी त्यांना म्हटलं, ‘‘अहो, या सर्व दैवी, अघोरी उपचारात चारपाच वर्ष जुना झाला आहे तिचा आजार. तो जुनाट झाल्याने उपचारांनी शंभर टक्के बरा करणं शक्य नाही. पण व्यवस्थित उपचार केले तर आहे त्यापेक्षा बऱ्याचअंशी फरक पडू शकेल. फक्त तिला आयुष्यभर उपचार घ्यावे लागू शकतात हे नक्की.’’
आणखी एक प्रसंग. एकदा एक बाई व त्यांचे पती आमच्याकडे आले होते. ते सांगत होते की, ‘‘माझी पत्नी पहिल्यापासूनच खूप धार्मिक आहे, परंतु आता जरा जास्तच धार्मिक झाली आहे. आता मुलं मोठी झाल्यामुळे मोकळा वेळ मिळाला आहे तर तासन् तास पूजा, पोथी चालू असते. अगदी कर्मठपणाच करते. सोवळं नेसणं, शिवाशिव पाळणं वगरे प्रकारही करते. पोथी एवढा वेळ वाचते, पण त्यात काय सांगितलं आहे, असं विचारलं तर मात्र काही सांगता येत नाही. आमचा मुलगा खूप अभ्यास करूनही इंजिनीअिरगच्या पहिल्या वर्षी नापास झाला. त्याच सुमारास आमचं थोडं आíथक नुकसान झालं. तेव्हा तिला कोणीतरी सांगितलं की, तुम्ही देवाचं करत नाही म्हणून असं झालं. तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला व वाढतच चालला आहे. त्यामुळे तिला अ‍ॅसिडीटी झाली आहे. कारण तासन्तास पोट रिकामं राहतं. झोप येत नाही. भूक लागत नाही. अगदी बघवत नाही मला तिच्याकडे. अगदी बाबापुता करत आणलं आहे तिला. जरा समजवा तिला डॉक्टर.’’
काय सांगतात ही दोन उदाहरणं? पहिल्या केसमध्ये तर एकविसाव्या शतकातसुद्धा, जिथे स्मार्ट फोन, इंटरनेट, सोशल नेटवìकग साईट वगरे अत्याधुनिक वैज्ञानिक साहित्य वापरणारा भाऊ आपल्या बहिणीचं विचित्र वागणं पाहून तिला बाबा-भगतांकडे नेतो. त्यात चार र्वष वाया जातात, पसा जातो. सर्व करून सवरून थकला जीव शेवटी डॉक्टरांकडे येतो! पण तोवर पसा अपुरा पडतो, आजार बळावत जातो. अशी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अवस्था होते. शिवाय आजार जुनाट झाल्यावर बरे होण्याची शक्यता कमीच होत जाते. त्यामुळे रुग्णाबरोबर घरातल्या सर्व नातलगांचे मनस्वास्थ्यही बिघडते ते वेगळेच.
हे सर्व कशामुळे तर अंधश्रद्धेच्या अनुसरणामुळे! धर्माच्या, आध्यात्मिकतेच्या बुरख्याखाली फक्त आíथक शोषणच होतं. वेळ वाया जातो व समस्या बळावते. घरात काही आíथक नुकसान झाले वा मुलगा नापास झाला, अशा छोटय़ा समस्यांसाठी धर्माधपणा करणं, कर्मठ आचारविचारांच्या पगडय़ाखाली येणं, त्यावर अतिविश्वास/अंध:विश्वास ठेवून स्वत:च्या प्रकृतीचे नुकसान करणं हे हानिकारकच ठरतं. त्यातून मूळ समस्या जातेच असं नाही. उलट बरोबर राहणाऱ्यांनाही मनस्ताप होतो.
कुठली समस्या उभी ठाकली तर ती का उभी ठाकली, आपण कुठे कमी पडलो, पुन्हा असं होऊ नये म्हणून काय करणं आवश्यक आहे हे बघणं आणि ते आपल्याला समजत नसेल तर संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घेणं ही सकारात्मक समायोजन शैली आहे; तर याउलट देवीचा कोप, भूतबाधा आहे, कोणाचा तरी जादूटोणा आहे वगरे समजुती करून अतिकर्मकांड, देव देव करणं वा बाबा, बापू, भगतांच्या मागे लागणं ही नकारात्मक समायोजन शैली! कारण त्यातून समस्येचं निराकरण होण्याऐवजी ती वाढीस लागते. याउलट तज्ज्ञांच्या सल्ल्यातून उपचार/मार्गदर्शन मिळतं व समस्या कमी होण्यास, सुटण्यास मदत मिळते.
उपचार घेतानासुद्धा काही ‘अंधश्रद्ध’ सल्ले ‘हितचिंतकांकडून’ मिळतात. अमूक पॅथीचे उपचार म्हणजे दुष्परिणामच जास्त, अमुक पॅथीच योग्य, कारण दुष्परिणामच नाहीत वगरे. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे परिणाम व दुष्परिणाम हे एकत्र असू शकतात. परिणाम प्रभावी असतील तर काही दुष्परिणाम होऊ शकतात. ते कमीतकमी असतात वा क्वचितच असतात. म्हणूनच त्या औषधास परवानगी मिळालेली असते. दुष्परिणाम नसलेल्या औषधाचा परिणामही कमी प्रभावी असू शकतो. त्यामुळे उपचारांची पूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे योग्य उपचार घेणे, एकत्रित उपचार घेणे हाच विवेकी सल्ला असू शकतो. अशा प्रकारे माहिती घेऊन श्रद्धेने उपचार घेणे हा विवेक आहे.
धर्म ही आचारांना शिस्त लागावी म्हणून निर्माण केलेली विचारप्रणाली आहे. त्या त्या भौगोलिक स्थितीनुसार, संस्कृती व रीतिरिवाज निर्माण झाले, पण ते काळानुरूप बदलत गेले. धर्माबरोबरच ‘देव’ ही संकल्पना आली. या विश्वाच्या निर्मितीमागे काही निर्गुण निराकार शक्ती आहे, जी या विश्वाचं चक्र सुरू ठेवण्यासही मदत करते, तिच्यावर श्रद्धा ठेवली तर आपल्याला एक आधार मिळतो, एवढाच त्याचा
अर्थ आहे. परंतु त्या देवाची कर्मकांडं, विटाळ त्याबरोबर भूत, प्रेत वगरे भीतीच्या संकल्पना, देवीच्या कोपाची भीती अशा कर्मकांडात, भयगंडात ही धार्मिकता ‘अंध’ होऊ लागली, अविवेकी होऊ लागली.
विश्वाचं रहस्य उलगडण्यास मदत करणाऱ्या ‘विशेष ज्ञान अर्था विज्ञाना’ची भौतिक जीवनासाठी मदत चालू शकते. पण मानसिकतेचा, मानसिक समस्येचा भाग आला की, प्रथम ‘अंध धार्मिकते’चीच मदत घेतली जाते. हा दुर्दैवी अविवेक मनस्वास्थ्य बिघडवून टाकतो. बाबा, बापू, महाराज यांचे गंडेदोरे ‘आध्यात्मिक’ वाटतात. पण त्याच भोंदूपणावर खऱ्या संतांनी ओढलेले ताशेरे समाज विसरतो. समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटले आहे,
मुळी द्रष्टा देव तो येक। त्याचे जाहले अनेक।
समजोन पाहता विवेक। उमजो लागे।
किंवा त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे,
चेटुक विद्य्ोचा अभ्यास। शस्त्रविद्येचा अभ्यास।
मललविद्य्ोचा व्हावी ज्यास। तो तमोगुण।
केले गळाचे नवस। राडीबेडीचे सायास।
काष्ठयंत्र छंदी जिव्हेस। तो तमोगुण॥
म्हणजेच मुळात एकच निर्गुण निराकार असलेल्या देवाचे नाहक तेहतीस कोटी देव केले, ते चुकीचे आहे हा योग्य विचार करता कळते. त्यामुळेच कर्मकांड वाढले. त्याचबरोबर ते असंही म्हणतात, चेटूक विद्या, नवस करणं वगरे तामसी गुण आहेत. ज्या संतांचे विचार हे विवेकाची कास धरणारे होते, त्यांच्या पालख्या, पादुकांचेच कर्मकांड त्यांचे शिष्यगण करतात, हा आणखी दुर्दैवाचा भाग!
सुरुवातीची दोन्ही उदाहरणं प्रातिनिधिक आहेत. अशी कितीतरी कुटुंबं या अंधश्रद्धेच्या अविवेकापायी उद्ध्वस्त झाली आहेत. कारण आíथक शोषणांमुळे उपचारांसाठी पसे उरत नाहीत किंवा नाइलाज म्हणून उपचार केले जात असतील तर त्यांचा खर्च ‘डोईजड’ वाटू लागतो.
परंतु, अशीही कितीतरी कुटुंबं आहेत, जी समाजप्रबोधनामुळे विज्ञानाची ‘विवेकी’ कास धरून मनोवैज्ञानिक अर्थात औषधोपचार, मानसोपचार वेळीच करण्यास पुढे येत आहेत. त्यांचं प्रमाण नक्कीच वाढतंय, ही सुखावह बाब आहे. चला, आपणही विज्ञानाची ‘विवेकी’ कास कुठल्याही मानसिक, शारीरिक समस्यांसाठी धरून ‘श्रद्धे’ने उपचार घेऊन आपलं स्वास्थ्य ‘आरोग्यदायी’ करूया!
(प्रस्तुत लेख लिहितानाच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या व्हावी हा दुर्दैवी योगायोग. हा लेख जणू
डॉ. दाभोलकरांना आदरांजली!)