कसल्यातरी घंटेचा आवाज.. मी दचकून जागी झाले. ‘फोन वाजतोय की गजर?’ सवयीनंच माझा हात घडय़ाळाच्या बटणावर गेला. गेले दोन-तीन आठवडे मी भल्या पहाटेचे गजर लावत होते. कारण नवरा मध्यपूर्वेत ऑफिसच्या कामासाठी गेला होता. तिथं इंटरनेटची काहीतरी भानगड झाली होती. त्यामुळे भल्या lr13पहाटे आम्ही फोनवर बोलत होतो. माझी नोकरी होती कारखानदार कंपनीच्या ‘आय. टी.’ म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी भागात! तिथं इमर्जन्सी रूमसारखी पळापळ असे. त्यामुळे दिवसभर घरचा विचार करायलाही वेळ नसे. तरी सतत नवऱ्याच्या सुखरूपतेची काळजी मनात ठिबकत असेच. त्यामुळे खरं तर मी त्याच्या फोनची खूप वाटत पाहत असे. फोनवरचं आमचं संभाषण संपूच नयेसं वाटे.
फोन खाली ठेवला की वाटायचं, कशाला हे दौरे? कधी चीन, तर कधी इस्रायलसारखे धगधगते देश! सुखानं कॅलिफोर्नियातल्या उबदार घरात मजेत राहायचं सोडून नोकरीपायी हे असे जीवघेण्या देशांतले दौरे कशाला करायचे? आधी साधा विमानप्रवास म्हणजे कोण यातायात झाली आहे! विमान पळवून अमेरिकन पासपोर्टवाल्यांना ओलीस धरणं हे तर सर्रास झालेलं! तशात विमानच गजबजलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळवण्याचा प्रकार म्हणजे कहरच! त्या धक्क्यातून सावरणं या जन्मी तरी शक्य नाही. असं वाटतं की, नको तो प्रवास.. नको ते दौरे! महत्त्वाकांक्षेच्या शिडय़ा चढणारं नको ते करिअर! प्रत्येकानं आपल्या जिवाभावाच्या माणसांबरोबर शांतपणे जगावं.
..घंटेचा आवाज सुरूच होता. आता मात्र मी पूर्ण जागी झाले. अरे, आत्ता यावेळी कोणाचा फोन? नवरा तर दोन दिवसांपूर्वीच घरी आलाय. म्हणून तर मी एवढी निर्धास्तपणे गाढ झोपेत होते! मी फोन उचलला.
ऑफिसच्या हेल्प डेस्क ऑपरेटरचा फोन होता. आमच्या ग्रुपनं लिहिलेल्या एका प्रोग्रॅमची काहीतरी गडबड होऊन तिकडे धोक्याच्या सूचना मिळाल्याचं ऑपरेटरनं सांगितलं. झोपेचा विचका झाल्यानं मी जराशी वैतागलेच होते. घरातला कॉम्प्युटर चालू केला. तिथून ऑफिसमधल्या कॉम्प्युटरची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकरण जरा गंभीर दिसलं तेव्हा लगेचच मी हाताखालच्या दोन-तीनजणांना कळवलं आणि सर्वानी त्वरित ऑफिसमध्ये जमण्याचा निर्णय घेतला. एकीकडे शॉवर सोडून मी टूथब्रश हाती घेतला. शॉवरचं पाणी थेंब थेंब येत होतं. ‘याला आणि काय झालं?’ म्हणेपर्यंत बागेतल्या स्प्रिंकलरचा आवाज झाला. स्प्रिंकलरनं तिकडे पाण्याचा झोत टाकला की शॉवरमध्ये पाण्याचा दुष्काळ. आणि स्प्रिंकलर थांबला की तेवढे क्षण शॉवरमधून उकळत्या पाण्याची अतिवृष्टी! त्यानं एक मात्र झालं- माझी झोप पूर्णपणे उडाली. कसंबसं आवरून गाढ झोपेत असलेल्या नवऱ्याला चिठ्ठी खरडली आणि गाडी सुरू केली.
ऑफिस गाठलं. तिथला माझा संगणक सुरू केला. एकेक क्षण महत्त्वाचा होता. सकाळची आठची शिफ्ट सुरू होण्याच्या आत काही गोष्टी ठाकठीक करणं महत्त्वाचं होतं. एव्हाना माझ्या ग्रुपमधले माझे सहकारीही आले होते. अपेक्षेप्रमाणेच एका प्रोगॅ्रममध्ये गडबड झाली होती. त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले होते. तीन-चार महत्त्वाच्या डाटा फाइल्समध्ये गोंधळ दिसत होता. एका बडय़ा गिऱ्हाईकाला चुकीची बिले रवाना झाली होती. म्हणजे या गोष्टीचा भरपूर गवगवा होणार! अकौंटिंग, ग्राहकसेवा, प्रसिद्धी अशा सगळ्या विभागांत याचे पडसाद उमटणार! चीफ फायनान्स ऑफिसर आमच्या चीफ इन्फर्मेशन ऑफिसरला उलटा टांगणार! मग तो आमच्या संचालकाला. आणि संचालक मॅनेजरला.. म्हणजे मला! बापरे! मी खचलेच! पण खचून चालणार नव्हतं. घोटाळा कुठे झाला, कसा झाला, आणि का झाला, ते शोधून काढणं.. आणि मग त्याची दुरुस्ती करून काम व्यवस्थित सुरू करणे, हा पुढचा भाग! शिवाय डेटा फाइल्समधला डेटा दुरूस्त करून, शुद्ध करून, दुरूस्त बिले रवाना करणे, हे तिसरे कर्तव्यही पार पाडायचे होते. हे सगळं करण्यासाठी अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवावे लागणार होते आणि अनेक आघाडय़ांवर मोर्चेबंदी करावी लागणार होती. म्हणजे मामला अंदाजापेक्षा फारच गंभीर होता. मी ताबडतोब आमच्या आय. टी. विभागाच्या संचालकाला हे सर्व कळवलं आणि कामाला सुरुवात केली.
लवकरच लक्षात आलं की- बंब सोमेश्वरी होता, पण आग रामेश्वरला होती! म्हणजे आमच्या ग्रुपमधला प्रोगॅ्रम आदळला होता खरा; पण तो आमच्या चुकीमुळे नव्हे, तर दुसऱ्या ग्रुपमधल्या एका प्रोग्रॅमच्या चुकीमुळे! त्या प्रोग्रॅमने डाटा फाइल्स करप्ट केल्या होत्या. तो चुकीचा डाटा आमच्या प्रोग्रॅमने कचरा पकडावा तसा पकडला होता. आणि धोक्याची सूचना म्हणून काम करायचं थांबवलं होतं! म्हणजे आता दुसऱ्या ग्रुपच्या प्रोजेक्ट मॅनेजरला बोलवा आणि तांत्रिक कामाबरोबरच राजकारण, टोलवाटोलवी, बोलाचाली आणि मीटिंगा यांना आमंत्रण धाडा! लगेचच या सर्वच आघाडय़ांवर आमचं काम सुरू झालं. अगदी महायुद्धच पेटलं होतं.
दुपारचे बारा वाजले. त्या ठोक्याला बरोबरचं अमेरिकन पब्लिक टण्णकन् हातातली कामं टाकून टुणकन् उठलं आणि जेवायला चालतं झालं. माझं काम मात्र सुरूच होतं. पोटात कावळे आणि डोक्यात भुंगे. एका तांत्रिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालू असतानाच फोन वाजला.
हं.. नवरोबा! ‘‘काय रे?’’ – मी. ‘‘अं.. काही नाही. बँकेतून बाहेर पडतो आहे..’’ तो थोडासा घुटमळला. ‘‘अरे, काय ते लवकर सांग ना!’’ मी खेकसले. ‘‘नको, तू कामात दिसते आहेस. मी.. मी नंतर फोन करतो..’’ ‘‘ठीकय्..’’ असं तुटकपणे म्हणत मी फोन आदळला.
पुन्हा काम, हाणामाऱ्या, राजकारणी मीटिंगा.. सगळ्यांचे डोंबारी खेळ सुरू झाले. सगळी साफसफाई होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. अ लाँग.. इव्हेंटफुल डे! सगळ्या गुंतागुंती सोडवल्याचं ठिपक्याइतकं समाधान सोडलं तर बाकी भयंकर थकवा, राग, असहायता या सर्वाचं बोचकं बांधून मी गाडीच्या अ‍ॅक्सिलरेटरवर पाय ठेवला. ती कर्कश्श किंचाळली. ‘सगळा राग हिच्यावर काढलेला बरा. आणि उरलेला मग नवऱ्यावर!’ असं पुटपुटत मी हायवेवर गाडी पळवू लागले.
गाडी घरासमोर लावली. धाडकन् दरवाजा उघडला.
घरात नेहमीसारखा टीव्ही आणि मराठी गाण्यांचा एकत्रित जल्लोश नव्हता. चक्क शांतता! दिवाणखान्यातला टेबल-लॅम्प लावलेला होता. नवरा शांतपणे पुस्तक वाचत बसला होता. मला क्षणभर विचित्रच वाटलं. ‘‘हाय!’’ मी संवादाचा तुकडा मोडून फेकला! ‘‘हाऽय!’’ एक खोल उसासा घेऊन माझ्याकडे पाहत नवरा खालच्या आवाजात म्हणाला. पुन्हा दोन क्षण शांतता! मग तो म्हणाला, ‘‘कसा गेला तुझा दिवस?’’ ‘‘वैतागवाडी!’’ मी उत्तर दिलं. मग टाकायचा म्हणून प्रतिप्रश्न टाकला- ‘‘हाऊ अबाऊट यू!’’
त्यावर पुन्हा एक दीर्घ उसासा घेऊन तो म्हणाला, ‘हं! जरा विशेषच गेला म्हणायचा!’ मग किंचित हसून म्हणाला, ‘‘ते ट्रॅव्हलर्स चेक होते ना उरलेले- ते बँकेत भरायला म्हणून गेलो होतो बँकेत. लंचच्या सुट्टीत!’’ ‘‘मग?’’ मी ‘त्यात काय विशेष?’ अशा अर्थी प्रश्न केला आणि किल्ल्या अडकवून टपाल चाळायला सुरुवात केली. माझी बेफिकिरी नवऱ्याच्या लक्षात आली नाही. तो आपल्याच तंद्रीत आढय़ाकडे पाहत बोलत होता.. ‘‘मी रांगेत उभा होतो. माझा नंबर आला. ट्रॅव्हलर्स चेक्स काढून काऊंटरवर ठेवले. तेवढय़ात एकदम डावीकडच्या बाजूनं ते दोघे आले. काळा बुरखा घातलेले. त्यांनी सर्वाना पालथं पडायला सांगितलं. खिडकीवरची मुलगी घाबरून किंचाळली आणि काही कळायच्या आत गोळीचा आवाज झाला! मी गोंधळलो होतो; पण काय बुद्धी झाली- पटकन् जमिनीवर पालथा पडलो आणि दुसरी गोळी सण्णकन् कानाजवळून गेली! ती गोळी समोरच्या काचेत घुसलीसं वाटलं. ते लोक काऊंटरवरून उडय़ा मारून आत गेले आणि क्षणार्धात गल्ला घेऊन धूम पळाले! बँकेच्या मॅनेजरनं पॅनिक बटण दाबलं असावं. कारण दोनच मिनिटांत पोलीस हजर झाले. त्यांनी मला धरून उभं केलं. सगळा म्हणशील ना तर तीन-चार मिनिटांचाच खेळ! नंतर पंचनामे, साक्षी होईपर्यंत पाऊणएक तास गेला. मी काय बोललो नि कसं बोललो, कुणास ठाऊक! पण सगळं संपवून बाहेर पडलो ना, तेव्हा मात्र पाय लटपटत होते! कसाबसा गाडीत जाऊन बसलो. सुन्न झालो होतो. तेव्हा.. तेव्हा तुझ्याशी बोलावंसं वाटलं.. म्हणून.. म्हणून फोन केला होता!’’ नवऱ्याचा आवाज कातर झाला होता. इतका वेळ त्यानं चढवलेला हसरा मुखवटा केविलवाणा होऊन गळून पडला होता.
नवऱ्याचं ते बोलणं कानावर आदळत होतं आणि सण्णकन् गोळी लागावी तसा तो प्रसंग माझ्या डोळ्यांत घुसला! माझ्या इवल्याशा जगातला वैतागाचा फुगा फाट्दिशी फुटला आणि हातातलं टपाल गळून पडलं. ‘‘काय?’’ असं म्हणत मी मटकन् खालीच बसले.
मनात आलं, अरे, दिवसातून चारदा फोन येतो याचा. दुपारनंतर एकदाही फोन नाही आला. माझ्या कसं नाही लक्षात आलं? एवढी भयंकर गोष्ट घडली, तेव्हा लटपटणाऱ्या नवऱ्यानं मदतीसाठी फोन केला मला. त्याचा आवाज नेहमीसारखा नव्हता. तो फोनवर घुटमळला होता. ते मला कळलं कसं नाही? त्याचं ऐकायला मला दोन मिनिटंही नव्हती. अनेक प्रश्न माझ्या मनात दाटून आले. मीही सुन्न झाले. ‘‘आर यू ओके?’’ असं म्हणायचा मी प्रयत्न केला; पण काय घडलं असतं, या कल्पनेनंच माझ्या घशाला कोरड पडली. मी त्याच्याकडे नुसतं पाहिलं. आमचे दोघांचेही डोळे डबडबले होते. सुरक्षिततेची जाणीव पुसट होत होती.
..खरं सांगायचं तर हा दिवस आठवू नये असं वाटतं. पण कुठेतरी असं काही घडतं आणि टीव्हीवर दिसतं..
लॉस एन्जेलिसमधली बँक..
एखाद्या कंपनीचा पार्किंग लॉट..
कोलोराडोतली शाळा..
फ्लॉरिडातलं सिनेमागृह..
मुंबईचं ताज हॉटेल..
पुण्यातली जर्मन बेकरी..
विस्कॉन्सिनचं गुरुद्वार..
हैद्राबादेतली बाजारपेठ..
कनेक्टिकटमधली प्राथमिक शाळा..
..आणि आठवणीची खपली निघते. जखम भळभळू लागते.                                                         
-विद्या हर्डीकर-सप्रे, कॅलिफोर्निया