भर दरबारात अपमानित व्हावं लागल्याने आणि त्या अपमानात माकड म्हणून संभावना झाल्यावर झालेल्या संतापात केस मोकळे सुटले, शेंडीची गाठ सुटली.. आणि ती गाठच प्रतिज्ञा ठरली! ‘आता या राजाचा नि:पात करून नवा राजा गादीवर बसवेन तेव्हाच शेंडीला गाठ मारेन,’ अशी ती ऐतिहासिक प्रतिज्ञा आपल्या सर्वाना शालेय अभ्यासक्रमापासून माहीत आहे. आणि तो इतिहासपुरुषही.. आर्य चाणक्य!
त्या काळात शेंडी ठेवणारे कोण होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. काळाच्या ओघात शेंडय़ा दृश्य स्वरूपात गेल्या; पण विचारांच्या पातळीवर चाणक्य मजबूत संघटन आणि अदृश्य शेंडीसह ती गाठ मनात ठेवून आजही वावरत आहेत. वेगळ्या अर्थाने त्यांना फार तर आतल्या गाठीचे म्हणता येतील.
१२ मेला सर्व मतदान संपले आणि सोळा मेपर्यंत संपूर्ण देशाने प्रथमच एक मोठा ‘प्रेग्नंट पॉझ’ अनुभवला. सर्व काही सुरळीत होतं, तरी अनाम शांतता होती. आणि अखेर सोळा मेला पॉझचं बटन काढलं आणि मतपेटीतून आजवरचा आणि मागच्या पंचवीस वर्षांचा इतिहास बदलणारं असं एक सुदृढ बाळ जन्माला आलं. पूर्ण गुटगुटीत. भरभक्कम वजन. जन्मत: ५६ इंची छाती. आणि सर्वाग भगवं असलेल्या या बाळाची सुकुमार नखेही भगवीच निघाली!
हा इतिहास घडवला नरेंद्र मोदी या पुरुषोत्तमाने! त्याने स्वपक्षाला सुस्पष्ट बहुमत तर मिळवून दिलेच; शिवाय मित्रपक्षांसह साडेतीनशेच्या आसपास जागा मिळवत भारतवर्षांत भगवी लाट आणली. ही लाट स्पष्ट होताच देशभरातल्या चाणक्यवृत्तींनी आपल्या अदृश्य शेंडय़ांना गाठी मारल्या! प्रतिज्ञा पूर्ण झाली!
इतिहासाचं हे असं वर्तमानाला जोडून घ्यायचं कारण- नरेंद्र मोदींचा विजय हा मोदी या व्यक्तीचा नाही, भारतीय जनता पार्टी या पक्षाचा नव्हे; तर तो विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा, त्यांच्या चाणक्यनीतीचा आहे! संघाच्या स्थापनेपासून ‘हिंदुराष्ट्र’ ही संकल्पना खरा राष्ट्रवाद म्हणून जोपासली गेली आहे. तशी या हिंदुराष्ट्रावर मुघल, पर्शियन, इंग्रज अशी अनेकांनी आक्रमणे केली. पण संघासाठी हिंदुराष्ट्राचा शत्रू नं. एक म्हणजे यवन- म्लेंछ- मुसलमान!
१९४७ साली भारताची धार्मिक फाळणी झाल्यावर तर संघविचाराला आपोआप एक ऐतिहासिक, भौगोलिक बळ मिळाले. परंतु स्वातंत्र्य चळवळीचा वारसा लाभलेल्या काँग्रेसने ‘हिंदुत्वा’पेक्षा बहुसांस्कृतिकतेचं धोरण स्वीकारून सलग तीस-चाळीस वर्षे सत्ता राखली. यादरम्यान झालेल्या गांधीहत्येचा डाग संघावर आजही आहे. त्यामुळे त्यावर बंदी आली आणि नंतर उठलीही. पण हा अपमान संघ विसरला नाही. त्याने ती गाठ बांधण्याची केलेली प्रतिज्ञा यंदाच्या सोळा मेला काही अंशी पूर्ण झाली. काही अंशी यासाठी, की पाकिस्तान-बांगलादेशसह अखंड हिंदुस्थान हे त्यांचे खरे स्वप्न आहे. अखंड हिंदुस्थान होईपर्यंत नथुराम गोडसेंच्या अस्थी विसर्जित केल्या जाणार नाहीत, अशी आणखी एक गाठ आहे!
स्वातंत्र्योत्तर भारताने फाळणीने जखमी झालेला भारत नेहरू-गांधी यांच्या बहुसांस्कृतिक विचारधारेवर, विज्ञान- तंत्रज्ञान, उद्योग यांच्या पायाभरणीतून, बुद्ध, कबीर, महावीर, नानक यांसोबत ख्रिस्त, पैगंबर यांना एकत्रित ठेवून भारताचे सर्वधर्मसमभावाचे महावस्त्र विणले. परंतु वर्णवर्चस्ववादी, पुनरुज्जीवनवादी विचारसरणींना ‘हिंदू’ शब्दाचा होणारा संकोच डाचत होता. जातिनिर्मूलन, धर्मातर, स्त्रीशिक्षण, अनिष्ट रूढी- प्रथांना लगाम यातून खरं तर हिंदू जीवनशैली प्रागतिक, आधुनिक बनत होती, तिला मानवी चेहरा मिळत होता. हे बदल अनिवार्यही होत गेले. पण संघविचार खचला नाही. ‘लोहेसे लोहा काटता है’ या न्यायाने त्यांनी लोकशाही व्यवस्था वापरतच लोकशाही व्यवस्था उलथवायचं स्वप्न बघितलं. त्यातला पहिला धक्का त्यांनी ९२ साली रामजन्मभूमीचं आंदोलन छेडून दिला आणि लोकशाही व्यवस्थेमध्येच बाबरी मशीद भुईसपाट केली. त्याच उन्मादातून पुढे सत्ता मिळाली आणि चाणक्यांची भीड चेपली. त्यानंतर आखलेल्या आक्रमक रणनीतीचा १६ मे’ला ‘न भूतो न भविष्यती’ विजय झाला.
या उद्दिष्टासाठी नरेंद्र मोदींची केलेली निवड चाणाक्षपणे केली गेली. नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास केला, ही गोष्ट चाणक्यांसाठी फार महत्त्वाची नव्हती; तर समस्त जगाला जो दंगलीचा डाग वाटतो, ती त्यांची खरी अभिमानास्पद कामगिरी होती. कारण मोदींनी हातचे काही राखले नाही. लोकशाहीतली औपचारिक शोकनाटय़ं केली नाहीत. माफी तर सोडाच, दंगलपीडित छावणीला आजपर्यंत भेटही दिली नाही. हे त्यांचं पुरून उरणं आणि १२ र्वष त्याच गुर्मीत सत्तेत राहणं, ही त्यांची खरी पात्रता ठरली.
संघ नेहमीच ‘लिटमस टेस्ट’ घेत असतो. गुजरातमध्ये त्यांनी ती घेतली. आता संपूर्ण देशासाठी घ्यायची होती. त्यासाठी पुन्हा मोदींची निवड भाजपमधले विरोध मोडून काढून निवडणुकीआधीच जाहीर केली. त्यावर अपेक्षित उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. पण बाह्य स्तरावर काँग्रेसच्या दहा वर्षांच्या भ्रष्टाचारी कारभारावर जनता कंटाळलीय हे दिसत होतंच; पण आतल्या स्तरावर देशभरात खुल्या आर्थिक धोरणाने मध्यमवर्गातून नवश्रीमंत वर्गात शिरलेला उच्चवर्णीय, मध्यमजातीय यांना मोदींनी गुजरातेत मुसलमानांना दाखवलेली जागा गुदगुल्या करतेय हे चाणक्यांनी ओळखलं आणि मोदींना ‘हाच तो दुष्टांचं निर्दालन करू शकेल असा धीरोदात्त महापुरुष’ असं प्रोजेक्ट करायला सुरुवात केली.
मोदींना पुढे करण्यात अधिकचे तीन-चार फायदे होते. भाजपची मूळ शेटजी-भटजीच्या प्रतिमेत शेटजीलाच पुढे केल्याने गुर्जर समाजासह आधुनिक उद्योगघराणी, कॉपरेरेट येऊन मिळतील. ‘विकास- विकास’ असं करत तळ्यात मळ्यात राहणारा वर्ग आकर्षित झाला. आपल्यावरच्या विपरीत परिस्थितीचे अनुकूलतेत रूपांतर करण्याची कला मोदी मूळ स्वयंसेवक असल्याने त्यांना अवगतच होती.
त्यामुळे गुजरातमध्ये तीन वेळा मुख्यमंत्री होताना त्यांनी न सांगितलेल्या गोष्टी यावेळी भारतभर सांगितल्या. पहिली : मी लहानपणी चहावाला पोऱ्या होतो. दुसरी : माझं लग्न झालंय, पण तो बालविवाह होता व देशकार्यासाठी मी संसार केला नाही, पण पत्नीला शिकू दिलं. आणि तिसरी : मी खालच्या नीच जातीतला आहे! बारा वर्षे विकासाच्या मेरिटची गुणपत्रिका घेऊन फिरणारे मोदी शेवटच्या टप्प्यात जातीच्या मेरिटवर उतरले! आज भाजपमधले, संघामधले चाणक्य, विचारवंत जेव्हा मोदींचा उल्लेख ‘उपेक्षित समाजाचा प्रतिनिधी आम्ही पंतप्रधानपदी बसवत आहोत’ असा करतात तेव्हा वाटतं, जणू काही नाना फडणवीस म्हणताहेत : जा! दिली तुला कोतवाली!  
काँग्रेस माहीत असलेल्या आणि माहीत नसलेल्या पिढय़ांना ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न दाखवत मोदींनी आक्रमक प्रचार केला. सर्व माध्यमांचे अनुकूल/ प्रतिकूल शेरे झेलत, नेहमीच्या निवडणूक शैलीचे सर्व नियम मोडत, एवढंच काय- आपल्या पक्षाला त्यातल्या सर्व स्तरांतल्या नेत्यांसह फरफटत नेत मोदींनी आक्रमक प्रचार केला.
संघ जाणतो की, भारतीय/ हिंदू मनाला पुरुषार्थ भावतो. त्याला मर्दानगीची भूल पडते. मर्दपणावर कोणी बोट ठेवलं तर तो पिसाटतो. मोदींची प्रतिमा ‘मर्द’ म्हणून बिंबवण्यात आली. भारतीय स्त्रियांनाही पुरुषार्थाचे आकर्षण असते. आवडता पुरुष मर्द असावा ही इच्छा असते. मोदींचे हे ‘माचो’ रूप खुबीने ठसवण्यात आलं. आणखी एक भारतीय पुरुषाची खासियत मोदींनी व्यवस्थित प्रदर्शित केली. ती म्हणजे बायकोला महत्त्व न देता आईला महत्त्व देणं! माँ-बेटे की सरकार हटानेवाले मोदी स्वत: आपणही वेगळ्या अर्थाने ‘ममाज बॉय’ किंवा मातृभक्त आहोत हे ठसवत होते. मात्र विभक्त राहणाऱ्या, पण घटस्फोट न घेतलेल्या जसोदाबेनला भेटावेसे त्यांना वाटले नाही!
थोडक्यात, नरेंद्र मोदींच्या रूपाने भाजपमार्फत आरएसएसने आपला अजेंडा आता उजळ माथ्याने पुढे आणलाय. या निवडणुकीतून त्यांनी उच्च जातींचा अहंकार सुखावत अल्पसंख्याकांचे सत्तेच्या गणितातले स्थान मोडीत काढले. त्यांनी नवी चातुर्वण्र्य व्यवस्था जन्माला घातलीय. राज्यशकट अशाच्या हाती- जो शेंडीला वंदन करेल, व्यापारउदिमांना संरक्षण देईल आणि उपेक्षितांना त्यांच्या कर्माप्रमाणे गुण देईल. गुजरातमध्ये हेच मॉडेल आहे. विकसितांचा विकास आणि इतरांना प्रक्रियेतूनच वगळणं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक आयोगाला पार्शलिटी करणारे म्हणत थयथयाट करणारे भाजप नेते या विजयानंतर निवडणूक आयोगाबद्दल ब्र काढायला तयार नाहीत! (कदाचित चतुरंगच्या वार्षिक स्नेह- संमेलनात निवडणूक आयुक्तांना सन्मानित करण्यात येईल!)
चाणक्यांनी गाठ मारलीय. पण आता भारतीय जनतेची गाठ या चाणक्यांशी आहे. त्यांना या लोकशाही व्यवस्थेतील अनेक संस्था बदलायच्या आहेत. काही व्याख्या नव्याने करायच्या आहेत. मोदींनी वाराणसीत आभाराच्या सभेत पुन्हा निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. बाबरीच्या वेळेसच ‘ये तो सिर्फ झांकी है, काशी-मथुरा बाकी है’ असं म्हणत होते, ते आता काशीतच विजयी झालेत. आणि अमित शहा आहेतच ‘बदला घ्या’ सांगायला!
भाजप-सेनेने अंधश्रद्धाविरोधी कायद्याला केलेला विरोध, घेतलेले आक्षेप आता हा कायदा अधिक पातळ करायला सरसावतील. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन प्रभात, श्रीराम सेना यांना नैतिक आणि सत्तेचं बळ मिळेल. या संघटनांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्याला, कृतीला भाजपने कधी पाठिंबा दिला नाही; पण त्याचवेळी ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
आता अशा स्वाभाविक प्रक्रियेतून हिंदू वस्त्यांतून मुस्लिमांनी जावे, शाकाहारी वस्तीत मांसाहारी नको, मुलींना स्वातंत्र्य हवे, पण मर्यादाही हवी, अ‍ॅट्रॉसिटीची गरज काय?, संविधानात काळानुरूप बदल करावेच लागतील. शेवटी हे राष्ट्र हिंदूंचं आहे. त्यामुळे बांगलादेशी हिंदू चालतील, मुस्लीम नकोत. अशा अनेक गोष्टी हळूहळू वेगळे मुखवटे घालून पुढे येताना दिसतील. त्यामुळे बहुसांस्कृतिकता विरुद्ध एकसंस्कृती ही लढाई पुन्हा ऐरणीवर येणार. या नव्या राजकीय व्यवस्थेत नव्या सांस्कृतिक संघर्षांची बीजे रोवलेली आहेत. त्यामुळे सांविधानिक कर्तव्यं पार पाडून सांविधानिक विजय साजरा करतानाच सांविधानिक ढाच्याच्या रक्षणासाठी नव्या चाणक्यांशी प्रसंगी लढावं लागेल- संवेदनशील, सजग नागरिकांना!
शेवटची सरळ रेघ- ‘बोरीबंदरची म्हातारी’ असं ज्या संस्थेचं वर्णन केलं जातं ती मुंबईतील आणि देशातील जुनी संस्था आणि सर्वाधिक खपाचं मुंबईतील इंग्रजी वर्तमानपत्र प्रसिद्ध करणारा समूह यांनी गेली काही वर्षे ‘पेज थ्री’ नावाची नवी संस्कृती जन्माला घातलीय. परवा लोकसभा निकाल लागल्यावर या प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्राने प्रत्येक पानाच्या वरच्या भागात महत्त्वाच्या विजयी व पराभूत उमेदवारांचे फोटो छापलेत. त्यात नगमा, राखी सावंत, मूनमून सेन यांचे जवळपास बिकिनीतले, तर हेमामालिनी यांची जुन्या चित्रपटातील नाचतानाची मुद्रा छापली आहे.
या अभिनेत्री अधिकृत पक्षांच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्यातल्या काही विजयी झाल्या. स्त्री-लोकप्रतिनिधींकडे पाहण्याची ही वृत्ती निषेधार्ह असून महिला संघटना  व महिला आयोग व संबंधित पक्षांनीही याचा निषेध करायला हवा.

pregnant, sister, Nagpur,
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप