‘दि लायन किंग’ बघून मला संपूर्ण नाटय़ानुभव मिळाला होता. मी परदेशात पाहिलेल्या सर्वोत्तम म्युझिकल्सपैकी हे एक आहे. हे लहान मुलांचं नाटक असल्यामुळे त्यातला प्रेक्षक सहभागही वेगळ्या प्रकारचा होता. नुसते हशे आणि टाळ्या नव्हते, तर त्यासोबत ‘आहा’, ‘ओह’ असे आवाज आणि मध्येच एखादं लहान मूल जागचं उठूनही प्रतिक्रिया देत होतं. प्राण्यांच्या अनुभवविश्वात नेण्यासाठी झगमगाट करणं, लार्जर दॅन लाइफ प्रतिमा उभ्या करणं ही या प्रयोगाची अपरिहार्य अशी गरज आहे. या नाटकात खूप झगमगाट असूनही चित्रापेक्षा चौकट मोठी होत नाही. नाटय़परिणामाला पूरक अशीच तांत्रिक अंगं आहेत.
माझ्या अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या अंकाची सुरुवात अतिशय मस्त झाली. रंगीबेरंगी पक्षी आणि पतंग रंगमंचावर स्वैर विहार करताना दिसले. नेत्रसुखद कोरिओग्राफी. बघता बघता पक्ष्यांची गिधाडं झाली. या बदलातून स्कारची राजवटी कशी होती याचं सूचन करण्यात आलं. हा प्रसंगही अंगावर येणारा, परिणामकारक. या प्रवेशामध्ये वातावरण निर्मितीचा फार मोठा सहभाग होता. तंत्रकौशल्य पदोपदी जाणवत होतं आणि ते नाटय़परिणामात भर टाकणारं होतं. स्कारच्या राज्यात घडत असलेले गोंधळ वाढायला लागले होते. त्याला कारण होतं त्याचं बेफिकीर आणि स्वार्थी वागणं. जंगलराज्यात दुष्काळ पडतो. स्कार झुझुला कैदेत टाकतो. हायनास आर्मी अन्न मिळत नाही म्हणून स्कारकडे तक्रार करायला जाते, पण तो लक्ष देत नाही. स्कारचं भीषण होत जाणारं रूप अतिशय उत्तम पद्धतीने अभिनीत केलं गेलं होतं.
एकूण प्राइड लँडवरचं बिघडत जाणारं वातावण विशेषत: प्रकाश योजनेतून सूचकपणे दाखवलं होतं. स्कारला मुफासा जिवंत असल्याचे होत असलेले भास आणि त्यामुळे त्याचं वेडय़ासारखं वागणं दर्शवणारं ‘दि मॅडनेस ऑफ किंग स्कार’ मला फारच आवडलं होतं. एकूण नाटकाचा प्रयोग माझ्या दृष्टीने अधिकाधिक परिणामकारक होत होता. एका लहान मुलांसाठी केलं गेलेलं म्युझिकल इतकं प्रभावित करेल असं अजिबात वाटत नव्हतं, पण प्रत्यक्षात घडत होतं वेगळंच. सिम्बाची मैत्रीण नाला स्कारला जाब विचारायला जाते, तर स्कार तिला लग्नाची मागणी घालतो. नाला चिडते आणि प्राइड लँड सोडून जायचं ठरवते. तिला राफ्की आशीर्वाद देते.
स्कार आणि नालाचे प्रवेश एखाद्या वास्तववादी नाटकासारखे सादर झाले. प्रवेशाच्या शेवटी गाणं होतं, पण त्या गाण्याला कोरिओग्राफी नव्हती. संगीत नाटकातल्या नाटय़पूर्ण प्रवेशासारखा तो सादर झाला.
त्यानंतरचा प्रवेश जंगलात सुरू झाला. सिम्बा आणि त्याचे मित्र टायमन आणि पुम्बा झोपायचा प्रयत्न करत असतात. सिम्बाला झोप येत नसते. तो तळमळत असतो. अचानक तो तिथून निघतो, तिरीमिरीत निघालेल्या सिम्बाचा टायमन आणि पुम्बा पाठलाग करतात. सिम्बा पळत पळत निघतो. मध्ये एक नदी येते. ती तो सहज पार करतो, पण त्याचा मित्र टायमन पाण्यात पडतो. सुरुवातीला सिम्बा त्याला मदत करायला कचरतो, पण नंतर धाडस करून टायमनला वाचवतो. हा प्रसंग थरारक होता. नेपथ्य आणि प्रकाश योजनेचा उत्तम वापर करून पाणी, दरी, झाडं ह्य़ा गोष्टी दाखवल्या होत्या. त्यात अडकलेला टायमन आणि त्याला सोडवणारा सिम्बा. प्रेक्षकांपैकी अनेकांना आपण जाऊन सिम्बाला मदत करावी असं वाटलं असणार. इतका तो प्रसंग हुबेहूब उभा केला होता. अंगावर काटा आला.
शेवटी नाटक म्हणजे काय तर अनुभवाची प्रत्यक्ष देवाणघेवाण. सिम्बा, पुम्बा आणि सायमन हे तीन मित्र झोपायचा प्रयत्न करायला लागतात. सिम्बा आकाशाकडे बघून ताऱ्यांमध्ये मुफासाला शोधायला लागतो. त्याच्याशी संवाद साधायला लागतो. टायमन आणि पुम्बा त्याची चेष्टा करतात. सिम्बा मुफासाला साद घालण्यासाठी गाणं म्हणतो. जे वाऱ्यावरून राफ्कीपर्यंत पोहोचतं. तिला सिम्बा जिवंत असल्याचं जाणवतं आणि ती अतिशय खूश होते. ते गाणं पण छान होतं. हळूवार होतं. माझ्या लक्षात येत होतं की, तांत्रिक अंगाचा उत्कृष्ट वापर करून आवश्यक ती वातावरण निर्मिती केली होती. लहान मुलांचं नाटक असल्यामुळे समोर दिसणारी दृश्यं म्हणजे रंगीबेरंगी चित्रंच वाटत होती. लहान मुलांचं अनुभवविश्व दाखवण्यासाठी या पोताचा खूप उपयोग झाला होता.
जंगलात पुम्बाला एक सिंहीण त्रास देत असते. घाबरवत असते. सिम्बा त्या सिंहिणीच्या समोर उभा ठाकतो आणि पुम्बाला वाचवतो. तेवढय़ात त्याच्या लक्षात येत की, ती सिंहीण म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली मैत्रीण नाला आहे. ती सिम्बाला जिवंत पाहून आश्चर्यचकित होते. ती सिम्बाला तो जंगलाचा राजा आहे हे पटवून देते. सिम्बा टायमन आणि पुम्बाला, त्याला आणि नालाला एकटं सोडायला सांगतो. नाला सिम्बाला प्राइड लँडची अवस्था काय आहे ते सांगते आणि त्याला परत येण्याची विनंती करते. पण तो तयार होत नाही. कारण आपल्या वडिलांच्या मृत्यूला आपणच कारणीभूत असल्याची सल त्याला असते.
हा भावनिक भाग खूप छान वठला होता. दोन्ही अभिनेते सक्षम होते. नाला पुम्बाला घाबरवते आणि त्यानंतर सिम्बा त्याला सोडवतो हा प्रसंग द्रुत लयीत झाला आणि त्यानंतरचा सिम्बा आणि नालाचा प्रवेश ठाय लयीत झाला. या दोन्ही प्रवेशांची लय दिग्दर्शिकेने इतकी उत्तम जपली होती की, त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला गेला.
त्यानंतरचा हृदयप्रसंग म्हणजे राफ्की आणि सिम्बाची भेट. राफ्की सिम्बाला पटवून देते की, मुफासा जिवंत आहे. मुफासा आकाशात दिसायला लागतो. मुफासाचा मृतात्मा आणि सिम्बा यांचा संवाद होतो. मुफासा सिम्बाला तोच खरा राजा असल्याची जाणीव करून देतो. सिम्बाला पटतं. तो स्कारच्या विरोधात उभं ठाकण्याची तयारी करतो. त्यासाठी प्राइड लँडवर जाणं भाग असतं. टायमन आणि पुम्बा त्याला मदत करायचं ठरवतात. हायनास आर्मी हा सगळ्यात मोठा अडथळा असतो, तो पार कसा करणार? आता कसलं व्हिज्युअल दाखवणार? कारण आधीच्या प्रवेशात मुसाफा आकाशात दिसतो हे श्ॉडो पपेटच्या साहाय्यानं दाखवून झालं होतं. हायनास आर्मीसमोर टायमन आणि पुम्बा ‘चार्ल्सटन’ नावाचं एक अमेरिकन नृत्य सादर करतात. हायनास ते बघण्यात गुंग होतात. हा प्रवेश मस्त कोरिओग्राफ केलाय. सिम्बा आणि नाला हायनास आर्मीला चकवून प्राइड लँडमधे शिरतात. सिम्बा आणि स्कार समोरासमोर येतात. सिम्बा स्कारला टेकडीच्या टोकावर नेतो. स्कार दयेची याचना करतो. सिम्बा त्याला सोडून देतो. स्कार परत त्याच्यावर हल्ला करतो. मग मात्र सिम्बा त्याला टेकडीवरून खाली ढकलतो. भूकेले हायनास त्याचा फडशा पाडतात. सिम्बा राजा होतो आणि सगळीकडे आलबेल होते.
असा या सूडकथेचा शेवट होतो. अगदी शेवटच्या भागात स्कार आणि सिम्बा लढत लढत टेकडीवर जातात, त्या प्रसंगात नेपथ्यामध्ये स्पायरल जिन्यासारखा एक भाग स्टेजमधून वर आला आणि गोल फिरत वर साधारणपणे दहा फूटावर जाऊन थांबला. त्याने ते दृश्य अधिक प्रभावशाली झाले.
‘दि लायन किंग’मध्ये सूडकथा परिणामकारक करण्यासाठी तंत्राचा वापर भरपूर केला होता. या म्युझिकलला तो अत्यावश्यक होता. ज्यूली टायमोर या दिग्दर्शिकेचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. एका गाजलेल्या अॅनिमेशन फिल्मचा नाटय़प्रयोग करणं आणि तो इतका परिणामकारक करणं खरंच अवघड होतं. पण हे शिवधनुष्य तिने आणि तिच्या तंत्रज्ञांनी लीलया पेललं होतं. तसेच तिचे सक्षम अॅॅक्टर्स. शारीर अभिनयाची कमाल. शरीरं किती बोलकी असू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे लायन किंग. ज्यूली टायमोर या दिग्दर्शिकेला वेगवेगळ्या कळाप्रकाराचं उत्तम ज्ञान असावं. तसंच तिचा इंटरनॅशनल थिएटरचा अभ्यास दांडगा असावा असं  वाटतं. शिवाय तिची धाडसी वृत्ती. एक अशक्यप्राय गोष्ट तिने करून दाखवली होती. तिचे साथीदारही फार महत्त्वाचे आहेत. रिचर्ड हडसन हा नेपथ्यकार. प्राइड रॉक आणि हत्तीचं स्मशान ही दोन लोकेशन्स दाखवायची होती. एक जोशपूर्ण, आनंदी तर दुसरं मृत्यू आणि भयाशी संबंधित. म्हणजे प्राइड रॉकवर मातीच्या रंगाचा गोल फिरून वर जाणारा जिना होता. अर्धगोलाकार. हत्तीच्या स्मशानात तसाच जिना होता, पण तो हाडांच्या सापळ्यांचा बनवलेला वाटत होता. नाटकाच्या सुरुवातीला प्राईड लँडवर मुसाफा उभा. नंतरच्या प्रवेशात हत्तीच्या स्मशानभूमीतल्या उंचवटय़ावर स्कार उभा. नेपथ्यातून हा विरोधाभास खूपच छान पद्धतीने अधोरेखित केला होता.
या म्युझिकलमधला सर्वात थरारक भाग मुसाफाचा मृत्यू. तेव्हाचं दृश्य अचंबित करणारं होतं. मुसाफा मरत असताना सिम्बावर होणारा प्राण्यांचा हल्ला. हा हल्ला आपल्यावर होतोय असं जवळ बसलेल्या प्रेक्षकांना वाट होतं. मी विचार करत होतो. रंगमंचावर हे कसं काय साध्य केलं असेल. माझ्या जे लक्षात आलं ते असं की, स्टेजच्या पुढच्या भागात माश्यांचे मुखवटे घातलेले अॅक्टर्स नृत्यसदृश हालचाली करीत होते आणि मागच्या भागात कॅनव्हासचे तागे सोडले होते. ज्यावर प्राण्यांची चित्रं होती. पुढच्या चित्रांपेक्षा मागची चित्रं थोडी मोठी असावीत, ज्याने अंतराचा फिल येत होता. प्रेक्षकांच्या अंगावर ते चालून येताहेत असं वाटत होतं आणि सिम्बा त्यातून मार्ग काढत होता. प्रकाश योजनेमध्ये अंबर, निळा आणि हिरवा लाइट वापरला होता, जो विंग्जसमधून आणि स्टेजच्या अगदी मागच्या भागातून येत होता.
या तीन रंगांच्या वापरामुळे गूढ वातावरण निर्मिती झाली होती. ज्याने प्रेक्षकांसमोर खूप प्राणी आणि किडे फिरत असल्याचा अभास निर्माण करता  आला असावा. हे दृश्य केवळ अप्रतिम होतं. हे आणि अशी अनेक दृश्यं या म्युझिकलमध्ये पाहायला मिळाली. नेपथ्याला प्रकाश योजनेची उत्तम साथ होती. प्रकाश योजना करणाऱ्याला प्राण्यांचं जग निर्माण करायचं होतं. डोनाल्ड होल्डर या प्रकाश योजनाकाराने ते उत्तमरीत्या साकारलं होतं. सर्वात कठीण होतं, ते म्हणजे नैसर्गिक प्रकाश आणि आभासाचं जग याचा समन्वय. आवश्यक त्या ठिकाणी जादूमय वातावरण तर कधी दिवसासारखा दिवस आणि रात्रीसारखी रात्र. पण त्याला जादूई स्वरूप आणण्यासाठी दिलेला सूर्याचा आणि चांदण्यांचा इफेक्ट. प्रेक्षागृहाच्या दुसऱ्या बाल्कनीतून समोर टाकलेला पांढरा स्वच्छ प्रकाश आणि इफेक्ट म्हणून जमिनीतून अचानक येणारं पाणी दाखवण्यासाठी त्या पांढऱ्या रंगात मिसळलेला थोडासा निळा रंग. मस्त इफेक्ट. कधीकधी अॅक्टर्सच्या शरीराचे आकार दाखवणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी विंगेतून येणारे लाइट्स फार महत्त्वाचे होते. स्कार आणि हायनाससारखे प्राणी दाखवण्यासाठी फूट लाइट्सचा वापर केला होता. एकूण नेपथ्य आणि प्रकाश योजना नाटय़परिणामाला पूरक.
आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे वेशभूषा. प्राणी तर दाखवायचे होते, पण ते सगळे माणसांच्या भावना व्यक्त करतील असे. प्रयोगात अगदी तसंच वाटत राहिलं. सिंपली ग्रेट. प्राणी दाखवण्यासाठी मुखवटे वापरले होते, पण त्याखालचा माणूस दडवला नव्हता, तोही सतत दिसत होता. काहीच लपवलेलं नव्हतं. आफ्रिकन पद्धतीच्या मुखवटय़ांचा वापर केला होता. हे मुखवटे अॅक्टर्सच्या डोक्यावर अडकवले होते. अॅक्टर्स थोडे वाकून मुखवटे प्रेक्षकांसमोर आणून, मग मागे जाऊन स्वत:चा चेहरा दाखवत होते. याने आपण म्युझिकलच्या गोष्टीत आणि गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत एकाच वेळी गुंतत होतो. शिवाय मायकेल करी या मोठय़ा पपेटिअरला बरोबर घेऊन काही पायांसाठी पपेट्सचा वापर केला होता.
वेशभूषेमध्ये दिग्दर्शिकेने त्या त्या प्राण्यांच्या जवळपास जाणारे रंग वापरले होते. पण त्याची रचना अशी होती की, त्यामुळे मानवी शरीराचे आकार बदलले होते. बहुतेक सर्व कॉस्च्यूम्समध्ये उभ्या पट्टय़ांचा वापर केला होता. विशेषत: मुसाफा, सिम्बा आणि स्कार या प्रमुख व्यक्तिरेखांच्या बाबतीत. मुखवटय़ांच्या बाबतीत आणखीन अवघड गोष्ट म्हणजे ते कुठली तरी एकच भावना व्यक्त करू शकतात किंवा ते न्यूट्रल असतात. त्यामुळेच माणसांचे चेहरे दिसणं अत्यावश्यक होऊन बसतं. विशेषत: थिएटरमध्ये. पपेट्स वेगवेगळ्या प्रकारे वापरली होती. स्टिंग पपेट्स, रॉड पपेट्स, श्ॉडो पपेट्स. पात्रांबरहुकूम पपेट्सचे प्रकार बदलत होते. शिवाय मेकअपमध्ये टॅटूजचा वापर केला होता. काही पायांचे चेहरे हातातलं पपेट उठून दिसण्यासाठी काळे किंवा पांढरे केले होते. पपेट चालवणारी माणसं प्रेक्षकांना पूर्ण दिसत होती. त्यात लपवाछपवी नव्हती. एका अॅनिमेशन फिल्मला रंगमंचावर आणताना टायमोटने सर्व कलाप्रकारांचा वापर करून एक जादूई रंगमंचीय आविष्कार सादर केला.
अभिनयाच्या बाबतीतसुद्धा हे नाटक सादर करणं खूप अवघड होतं. उदाहरणार्थ जिराफाचं काम करणाऱ्या माणसांना काठय़ांवर चालता येणं आवश्यक होतं. तसंच टायमन आणि पुम्बाचं काम करणारे अभिनेते उत्तम रॉड पपेटिअर्स असणं आवश्यक होतं. बऱ्याच म्युझिकल्समध्ये अभिनय, गाणं आणि नृत्य येणं आवश्यक होतं. शिवाय प्रत्येक प्राण्याचा चालण्याचा वेग वेगळा, शरीर वापरण्याची पद्धत वेगळी, या सर्वांचं भान नटाला असणंही गरजेचं होतं. सर्व नटमंडळी एकाच वेळी प्राणी आणि माणसं होणारी होती. एकूण अभिनय, गाणं आणि नृत्य ‘अ’ दर्जाचं होतं. यातलं संगीत श्रवणीय होतं. इल्टन जॉन आणि टिम राइस यांनी चर्मवाद्यांचा उपयोग उत्तम पद्धतीने केला होता. सर्वसाधारणपणे वाद्यवृंद स्टेजच्या समोरच्या भागात असतो, पण इथे तो स्टेजच्या दोन्ही बाजूला वरच्या भागात होता. मोठमोठाली चर्मवाद्यं वाजवणारे वादक दिसत होते. नाटक संपल्यावर प्रेक्षक बाहेर पडेपर्यंत ही चर्मवाद्यं वाजत होती.
‘दि लायन किंग’ बघून मला संपूर्ण नाटय़ानुभव मिळाला होता. मी परदेशात पाहिलेल्या सर्वोत्तम म्युझिकल्सपैकी हे एक आहे. हे लहान मुलांचं नाटक असल्यामुळे त्यातला प्रेक्षक सहभागही वेगळ्या प्रकारचा होता. नुसते हशे आणि टाळ्या नव्हते. तर त्या सोबत ‘आहा’, ‘ओह’ असे आवाज आणि मध्येच एखादं लहान मूल जागचं उठून प्रतिक्रियाही देत होतं. ज्यूली टायमोर या दिग्दर्शिकेने कमाल केली आहे.
हे टुरिस्ट लोकांचं नाटक आहे, ही नुसतीच दृश्यांची रेलचेल आहे, आशय-विषय महत्त्वाचा असणाऱ्या रंगभूमीला हे मारक आहे असे आरोप होतात. पण ‘दि लायन किंग’ करायचं ठरवल्यानंतर प्राण्यांच्या अनुभवविश्वात नेण्यासाठी झगमगाट करणं, लार्जर दॅन लाइफ प्रतिमा उभ्या करणं ही या प्रयोगाची अपरिहार्य अशी गरज आहे. या नाटकात खूप झगमगाट असूनही चित्रापेक्षा चौकट मोठी होत नाही. नाटय़परिणामाला पूरक अशीच तांत्रिक अंगं आहेत. हे नाटक सिंहाच्या गर्जनने सुरू होतं. त्या गर्जनेचा आवाज माणसं, मुखवटे, पपेट्स, ग्रेसफूल नृत्य, श्रवणीय संगीत, अचंबित करणारं नेपथ्य आणि प्रकाश योजना, बॉडी पेंटिंगसारखा मेकअप, उत्कृष्ट कोरिओग्राफी, उत्तम अभिनय आणि या सर्वाना एकत्रित आणणारं ‘इनोव्हेटिव्ह’ दिग्दर्शन, या माध्यमांमार्फत प्रयोग संपेपर्यंत आणि संपल्यावर सुद्धा घुमत राहतं. (उत्तरार्ध)