इतके दिवस मी लिहितोय. अगदी गुंग होऊन लिहितोय. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न धरून थेट जगण्यातले पुरावे धुंडाळत, प्रसंगी विक्षिप्त वाटावे असे लिहितोय. न थकता लिहितोय. सतत आणि सावकाश लिहितोय. लेखकाची आणि लेखकातील व्यक्तीची आत्महननाची प्रक्रिया कशी सुरू होते, कशी पुढे सरकत जाते, याविषयी अत्यंत जागृत राहून लिहितो आहे..’’ श्याम मनोहर यांचे हे विधान आजचे नाही; वीस वर्षांपूर्वी एक पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ते व्यक्त केले आहे. त्यातून त्यांची लेखनावरची निष्ठा प्रतीत होते. श्याम मनोहर हे सरधोपट लिहिणारे लेखक नाहीत. वास्तवाची हुबेहूब नक्कल साहित्यातून करणारे, जे जगलो, भोगले किंवा जे अनुभवले तेच लिहीत आहे, असे म्हणणारे ‘खूप लोक आहेत’; पण श्याम मनोहर त्यातले नाहीत. रूढ कथानकाचा साचा मोडून आणि पारंपरिक अशा एकरेषीय पद्धतीला फाटा देऊन ते लिहीत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर- ते ‘सतत आणि सावकाश’ लिहीत आहेत.

‘हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव’ (१९८३), ‘शीतयुद्ध सदानंद’ (१९८७),  ‘कळ’ (१९९६), ‘खूप लोक आहेत’ (२००२), ‘उत्सुकतेने मी झोपलो’ (२००६), ‘खेकसत म्हणणे, आय लव्ह यू’ (२०१०), ‘शंभर मी’ (२०१२) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘आणि बाकीचे सगळे’, ‘बिनमौजेच्या गोष्टी’ या दोन कथासंग्रहांमधून त्यांच्या कथेचा प्रवास सुरू झाला. कथेतून ते कादंबरी वाङ्मयाकडे स्थिरावले. त्यांची कथासुद्धा वेगळी आहे. मराठीतल्या आधुनिक, प्रयोगशील, नवकथा या सर्वाहून तिची वेगळी ओळख आहे. मराठी कथेच्या कोणत्याच परंपरेत या कथांना बसवता येत नाही. त्यांच्या कादंबऱ्यांचेही तसेच आहे. कथा, कादंबरी असे न म्हणता ‘कथात्म साहित्य’ म्हणत श्याम मनोहर ‘फिक्शन’संबंधी विचार करतात. त्यांच्या मते ‘फिक्शन’चेही दोन प्रकार आहेत. ज्ञात असलेले ज्ञात पद्धतीने सांगणे- एक प्रकार. अज्ञातातले काही शोधू पाहणे आणि आतापर्यंत वापरल्या गेलेल्या पद्धतींपेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिणे- हा दुसरा प्रकार. श्याम मनोहर अर्थातच ‘फिक्शन’च्या या दुसऱ्या प्रकारातले लेखक आहेत. त्यांची कुठलीही परंपरा नाही, आणि पुढे अनुकरणाच्या माध्यमातून ही परंपरा कुणाला चालवता येईल असेही नाही. त्या अर्थाने ते एकमेव आहेत. जुन्या पद्धतीने सांगायचे झाल्यास ‘यासम हा’ असाच हा लेखक आहे. श्रेष्ठ दर्जाच्या कथात्म साहित्यासाठी जगण्यासंबंधीचे सखोल चिंतन असावे लागते आणि विलक्षण अशी कल्पनाशक्तीही असावी लागते. श्याम मनोहर हे दोन्ही बाबतीत सरस आहेत. त्यातही त्यांचे जगण्यासंबंधीचे चिंतन हे असंख्य प्रश्नांच्या अंगाने येते. हे प्रश्न रोजच्या जगण्यातले आहेत, बारीकसारीक घटनांमधून उपजलेले आहेत, तरीही ते सोपेपणाच्या पायऱ्या ओलांडून चिकित्सेचा मार्ग धुंडाळतात. हे प्रश्न धर्मासंबंधीचे आहेत, अध्यात्मासंबंधीचे आहेत, विकारांसंबंधीचे आहेत. व्यक्ती, कुटुंबसंस्था, समाज या त्रिस्तरीय रचनेतल्या अशा अनेक जागा असंख्य प्रश्नांनी घेरलेल्या आहेत. त्या जागा हा कादंबरीकार नेमक्या शोधतो. मत्सर घालवायचा कसा? लोभ घालवायचा कसा? किती प्रमाणातला मत्सर समाजात संमत आहे? विकारांचे मी काय करतो? विकार माझे काय करतात? आपल्या समाजात धर्माची गरज वाटणारे किती लोक असतील? ज्यांना धर्माची आवश्यकताच वाटत नाही अशांनी मेळावे घ्यायचे ठरवले तर धर्माची गरज वाटणारा जो समाजातला वर्ग आहे त्याची प्रतिक्रिया काय असेल?.. प्रश्नांची ही यादी आणखी खूप वाढवता येईल. श्याम मनोहरांच्या सगळ्याच कादंबऱ्या अशा जिज्ञासेतून आलेल्या आहेत.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

‘हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव’ ही त्यांची पहिलीच कादंबरी. ती काही प्रमाणात वास्तववादाच्या जवळ जाणारी आहे. घटना व प्रसंगांची गुंफणही सरळ पद्धतीची आहे. ईश्वरराव आणि पुरुषोत्तमराव या दोन मित्रांची ही गोष्ट. कनिष्ठ मध्यमवर्गाच्या खुरटय़ा आकांक्षा व आपल्या जगण्याच्या मर्यादित वर्तुळातील चाचपडणे या कादंबरीत आहे. बियाणांच्या कोठारात ईश्वरराव पुरुषोत्तमरावांच्या थोबाडीत देतात. या घटनेचा परिणाम संबंधित कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवर, हाताखालच्या सहकाऱ्यांवर होतो. कादंबरीचे कथानक येथे  सांगायचे नाहीए, पण या कादंबरीतला सुखदेव म्हणतो, ‘‘एक माणूस दुसऱ्या माणसावर का खवळून उठतो त्याची एक यादी तयार केली पायज्ये. किती कारणं लागू पडली की माणूस थोबाडीत देतो ते कळंल.’’ आणखीही पुढे या कादंबरीत अनेक प्रश्न येतात. ‘साक्षात्कारी पुरुष ओळखायचा तर तो कसा ओळखायचा?’ ‘गरीबांनी श्रीमंताशी कसं वागावं आणि गरीबांनी गरीबांशी कसं वागावं?’.. फक्त याच कादंबरीत असे प्रश्न येतात असे नाही. श्याम मनोहरांच्या प्रत्येकच कादंबरीत असे काही ना काही प्रश्न येतात. जगण्याची ‘थिअरी’ त्यातून सापडतेय का, या गोष्टीचाच जणू शोध यानिमित्ताने घेतला जात असतो. हा शोध श्याम मनोहर पुन: पुन्हा घेत आहेत.

मराठी कादंबरीच्या रूढ तंत्राला श्याम मनोहर यांनी अनेकदा धक्के दिले आहेत. कादंबरीसंबंधीच्या आपल्या कल्पना, पूर्वग्रह आणि गृहितकांना ते आजवर मोडीत काढत आले आहेत. यातले सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या या एकनायकी नाहीत. कादंबरी म्हटले की परिसर, निसर्गचित्रण, कादंबरीकाराने कल्पिलेला नायक असा जो पारंपरिक साचा आहे तो श्याम मनोहर यांनी मोडला आहे. शिवाय जे अनेक नायक ते उभे करतात त्या नायकांमध्ये त्यांचा लेखक म्हणून जीव गुंतलेला नसतो. आपण निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांबद्दल ते कधीही फारसा लळा दाखवताना दिसत नाहीत. कोणाचीच बाजू घ्यायची नाही, किंवा एखाद्या व्यक्तिरेखेच्या पाठीशी आपली लेखकीय ताकद लावायची नाही, ही बाब ते आजवर कसोशीने कादंबऱ्यांमध्ये पाळत आलेले आहेत. ‘कथात्म साहित्य’ याबद्दलची त्यांची संकल्पना स्पष्ट आहे. म्हणूनच या कादंबऱ्या कथानकप्रधान नसून कथनप्रधान आहेत. कादंबरीत रूढ अर्थाने केली जाणारी घटना- प्रसंगांची गुंफण आणि त्यातून पुढे सरकत जाणारे कथानक हा प्रकार त्यांच्या कादंबऱ्यांतूून सहसा आढळत नाही.

आशय, विषय, मांडणी, रूपबंध अशा अनेक बाबतीत हे सर्वच घटक एकमेकांना परस्परपूरक असतात. त्यातून कादंबरीचा नेमका परिणाम साधला जातो. जगणे हे गुंतागुंतीचे आहे. पण ही गुंतागुंत श्याम मनोहर नेहमीच्या पद्धतीने मांडत नाहीत. त्यामुळे कादंबरीत प्रश्नांची चर्चा होते, तरीही या कादंबऱ्या रूढ अर्थाने ‘समस्याप्रधान’ नाहीत. माणसाच्या मनात विकार आहेत. पण विकार घालवायचे कसे, या विकारांवर विजय मिळवायचा कसा, याची कोणतीच ठोस पद्धती नाही, हे सांगणारी ‘हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव’ असो अथवा दहशतीची भावना कुठल्यातरी क्रौर्यातून येते, हे सांगणारी ‘शीतयुद्ध सदानंद’ असो; किंवा धर्म आणि धर्मातून येणारी िहसा, धर्माच्या रूढीकरणातून माणसात येणारी िहसक वृत्ती यांचा आडवा छेद घेणारी ‘खूप लोक आहेत’ असो अथवा सभ्यता आणि संस्कृतीच्या नव्या  व्याख्या सांगू पाहणारी ‘खेकसत म्हणणे- आय लव्ह यू’ असो; श्याम मनोहर सिद्धान्ताच्या पातळीवर काही सांगू पाहतात. ‘फिक्शन’ म्हणजे केवळ ‘कल्पनेचा पिसारा’ किंवा ‘वास्तवाचा पट’ एवढय़ापुरतेच मर्यादित नाही. त्यांचे ‘फिक्शन’ हे सिद्धान्ताच्या एकेक पायऱ्या उतरत मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते.

‘कळ’ ही त्यांची अतिशय वेगळी कादंबरी. ‘साहित्यासंबंधीचे साहित्य’ या सदरात मोडणारी. या कादंबरीतल्या मोटार गॅरेजवाल्याची आशा डॉक्टरांनी सोडून दिल्यानंतर सगळेजण गोळा होतात. मोटार गॅरेजवाला शेवटचे क्षण मोजतोय म्हटल्यानंतर त्याची बहीण, भाऊ, मामा, काका, लांबचे नातेवाईक, तुटलेले मित्र असे सगळेच गोळा होतात. मोटार गॅरेजवाल्याचा आता प्राण जाईल, मग प्राण जाईल असे करत सगळेच जण वाट पाहतात. रात्र जाते, दिवस जातो. आठवडा जातो. एक-एक जण मोटार गॅरेजवाल्याच्या कानाशी तोंड लावून म्हणतो, ‘‘तू काळजी करू नकोस. तुझे उर्वरित आम्ही नीट करू.’’ तरीही गॅरेजवाल्याचे मरण पूर्ण होत नाही. ‘‘तुझी इच्छा कशात अडकलीय सांग, आम्ही पूर्ण करू..’’ असे जमलेले सगळेजण म्हणतात. ‘‘मला गोष्ट सांगा.. मग मी कायमचा झोपी जातो,’’ असे गॅरेजवाला म्हणतो. कुणी भ्रष्टाचारावर भडाभडा बोलतो, कुणी जातीयतेवर फडाफडा बोलतो. कुणी दहशतवादावर, कुणी आíथक धोरणांवर बोलतो. तरीही मोटार गॅरेजवाल्याचे मरण पूर्ण होत नाही. कशानेच मोटार गॅरेजवाल्याचे मरण पूर्ण होत नाही. मग मोटार गॅरेजवाला एका इमारतीच्या िभतीला पाठ टेकवून बसतो. अगदी वाईट रडण्याचा आवाज येतो. तो उठतो. रडण्याच्या आवाजाच्या दिशेने जात बाळ जन्माला आले त्या एका खोलीत पोहोचतो. मोटार गॅरेजवाला बाळाच्या कानात म्हणाला, ‘‘माझ्या बाळा, तू जन्माला आलायस, पण या समाजात गोष्ट नाही, नुसते विचार आहेत.’’ आणि मोटार गॅरेजवाला एकदम घाबरला- की गोष्ट नाही म्हटल्यावर बाळाला धक्का बसेल आणि ते मरणे सुरू करील. पण तसे घडत नाही. बाळ िहस्रपणे वाढू लागले.. ‘कळ’ कादंबरीतील ‘गोष्ट नाही’ नावाची ही लहान कथा आहे. कथा सांगणे ही गोष्ट संस्कृतीत महत्त्वाची असते असे सांगणारी.

बहुतेक साहित्य केवळ माहिती देते, पण श्याम मनोहर विचार करायला लावतात. सगळ्याच गोष्टी उकलून कादंबरीतल्या अनेक जागा वाचक वाचता वाचताच भरायला लागतो. आपापल्या वकुबाप्रमाणे अन्वय लावू पाहतो. जगण्यातले प्रश्न त्याला आकळायला लागतात. या प्रश्नांचे एरवी लक्षातही न येणारे पलू प्रकाशमान व्हायला लागतात. त्यांची ‘शंभर मी’ ही कादंबरीसुद्धा ‘मी कोण?’ या आदिम प्रश्नाचा नव्याने वेध घेऊ पाहते. ‘कोहम्’ हा तत्त्वज्ञानातला पारंपरिक प्रश्न. ‘मी कोण आहे?’ यापेक्षा ‘मी काय काय आहे?’ असा प्रश्न श्याम मनोहर या कादंबरीत उपस्थित करतात. अनेक प्रकारचे ‘मी’ या कादंबरीतून येतात. आशयाच्या बाबतीत विविधता राखणारा हा लेखक भाषेबाबतही विलक्षण प्रयोगशील आहे. त्यांच्या कादंबऱ्यांत अनेकदा कविता दिसू लागतात. गद्यलेखकानेही भाषेच्या बाबतीत किती जागरूक असावे याचे असंख्य पुरावे त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आढळतात. या भाषेत शब्दांचा फुलोरा नाही, उसनवारीने आणलेली काव्यात्मकता नाही आणि वर्णनांचा सोसही नाही. तरीही भाषा आशयाशी एकदम घट्ट बिलगलेली. या भाषेमुळेच जगण्यातले छोटे छोटे प्रसंगही अर्थवत्ता धारण करतात.

कादंबऱ्यांप्रमाणेच त्यांची नाटकेही मराठीत प्रयोगशील आणि रूढ नाटकांची चौकट मोडणारी मानली जातात. आपल्याकडे नाटक संघर्षांवर उभे असते. फार पूर्वी सुष्ट-दुष्ट अशा संघर्षांतून नाटक उभे राहत असे. पुढे या संघर्षांच्या रीती बदलल्या, पण द्वंद्व कायम राहिले. संघर्ष आला की भावनाशीलता आली. संघर्षांची पाश्र्वभूमीच मुळी भावनिक. असे रूढ तंत्र श्याम मनोहर यांच्या नाटकात दिसत नाही. भावनारहितता वगळून बौद्धिकतेकडे ही नाटके झेपावतात. ‘प्रेमाची गोष्ट?’, ‘दर्शन’, ‘सन्मानहौस’ ही नाटके याची साक्ष आहेत. ‘सन्मानहौस’मध्ये दिनू म्हणतो, ‘‘येत्या काही वर्षांत आपल्या हयातीत भारत आíथक महासत्ता होणाराय. आशडे (आशा), आपणही आíथक महासत्ता व्हायचं! पसा आल्यावर, आपण आíथक महासत्ता झाल्यावर तू मला बाहेरही चारचौघांत शंभरजणांत दिनू म्हण.. कोण काही नावे तर ठेवणार नाहीच; उलट मान देतील मान! आपण लोकांना मान देणार ना, तर लोक आपल्याकडून मान घेताना आपल्यालाही मान देणार. उद्धटपणे कुणी मान घेत नाही. नम्रपणे मान घेणार. म्हणजे आपल्याला मान देणार, शिवाय धन देणार. पसाही मिळणार आपल्याला आणि मानही मिळणार. आपण मान मिळण्यासाठी पगार देऊन नोकर ठेवायचे म्हणत होतो. आता उलट पसे घ्यायचे न् मान मिळवायचा. वा! सन्मानहौस भागणार आपली..’’ या संवादात काय नाही? माणसाची सन्मानाची हौस, मध्यमवर्गीय आकांक्षा, व्यक्ती आणि समाज यांच्यातली असंबद्धता असे कितीतरी आयाम यात आहेत.

अलीकडे श्याम मनोहरांच्या चिंतनातून सभ्यता आणि संस्कृती या बाबी वारंवार येतात. नुकतेच पॉप्युलर प्रकाशनाने ‘श्याम मनोहर- मौखिक आणि लिखित’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात श्याम मनोहर यांची भाषणे आहेत आणि काही लिखित नोंदी. पुस्तकाच्या मुख्यपृष्ठावरच ‘सभ्यता संस्कृती धर्म अध्यात्म ज्ञात अज्ञात शोध घेणे पुनशरेध ज्ञान म्हणजे काय? अभ्यास पद्धती फिक्शनचे गुणधर्म जगणे आणि जीवन जीवनाचा अर्थ विवेकवाद आणि अंत:करणवाद धननिर्देश आणि ऋणनिर्देश वाचनसंस्कृती वर्तमान समाजाची स्थिती आणि बदल’ हे सारे शब्द कुठल्याही विरामाशिवाय सलग दिलेले आहेत. श्याम मनोहरांच्या सर्वच पुस्तकांत काही शब्द आणि संकल्पना वारंवार येत राहतात. ते त्या विकसित करू पाहतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हे सर्व शब्द आणि संकल्पना पुन्हा अधोरेखित करण्यात आल्या आहेत. माणसाचा भौतिक स्तर उंचावणे, तो उन्नत होणे ही सभ्यता आहे आणि शोध घेणे ही संस्कृती आहे. मानवी जीवनातील अज्ञाताचा शोध घेत असताना जगण्याचा अर्थ काय? त्यातही ‘मी कोण आहे’ याचा धर्माने सांगितलेला अर्थ आणि ‘फिक्शन’ने सांगितलेला अर्थ काय आहे? या शोधाची अभ्यास पद्धती काय? हे सगळे जाणून घ्यायचे तर वाचकालाही विचार करावा लागतो. एका अर्थाने श्याम  मनोहर सर्वच कादंबऱ्यांमध्ये वाचकालाही उन्नत होण्याची संधी देतात. तत्त्वज्ञानातल्या गूढ-गहन सिद्धान्तांना थेट मानवी जगण्याशी संबंधित जगण्यातून आलेल्या प्रश्नांशी भिडवतात. मराठीत हे अपूर्व आणि अपवादात्मक आहे.
aasaramlomte@gmail.com