श्रमसाफल्य, स्वप्नपूर्ती किंवा अमुकतमुक स्मृती ही घरांची किंवा बंगल्यांची नावे असतात. आयुष्यभर नोकरीधंदा करून आयुष्याच्या संध्याकाळी आयुष्यभर कमावलेल्या पैशातून एक घर बांधायचे हा मराठी माणसाचा एक आवडता छंद होता. खोटे वाटत असेल तर डोंबिवली-कल्याण भागात किंवा पुण्याच्या काही भागात असे अनेक लहान बंगले अजून दिसून येतात, ते एकदा बघून घ्या. थोडे लवकर जा, नाहीतर पुनर्विकासाच्या वरवंटय़ाखाली जे थोडेफार उरले आहेत तेदेखील दिसेनासे होतील. जागांचे भाव बघता आता जी पिढी तरुण आहे, ती पिढी असले बंगले बांधेल यावर माझा विश्वास नाही.
अलीकडच्या काळात तरुणांच्या व निवृत्त होणाऱ्या मंडळींच्या मनात एकच विचार येतो- चारचाकी वाहन खरेदीचा. निवृत्तीनंतर एकत्र मिळालेल्या पैशातून कार खरेदी करणारी मंडळी दिसून येतात. स्वत:ची गाडी असण्याची स्वप्नपूर्ती करण्याचा प्रयत्न पूर्णत: चुकीचा आहे, असे नाही. पण नोकरीत असताना गृहकर्ज चालू असताना, वाहनकर्ज घेऊन गाडी खरेदी करणाऱ्या तरुणांचा गाडी खरेदीचा निर्णय बऱ्याचदा पचनी पडत नाही.
अनेकदा गाडी खरेदी करावी की भाडय़ाने घ्यावी, यावर लेख लिहिले जातात. सदर लेखाचा हा उद्देश नाही. गाडी खरेदी हा एक आर्थिक निर्णय असला तरी गाडी कुणी घ्यावी, याला दोन महत्त्वाचे निकष आहेत आणि ते आर्थिक असतीलच, असे नाही. ‘गरज’ किंवा ‘हौस’ या दोन कारणांस्तव गाडी घेतली जाते. ‘स्वत:ची गाडी असावी अशी हिची इच्छा आहे.’ ‘मित्राने घेतली तर मीसुद्धा घेतलीच पाहिजे’ ही व अशी कारणे हौस या सदरात मोडतात. एकदा हौस म्हणून गाडी घेतली की त्यामागील अर्थकारणाला गाडी विकत घेताना फारसा अर्थ राहत नाही. पण खरेच तसे असते का? आधी दुसरी बाजू बघू.
गरज म्हणून गाडी घेताना अनेक अंगांनी अर्थकारणाचा विचार करावा लागतो. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसेल तर स्वत:चे वाहन विकत घ्यावे लागणे ही एक गरज आहे. गाडी भाडय़ाने देण्याचा व्यवसाय करणे ही आणखी एक गरज आहे. त्या बाबतीत रोजचा वापर लक्षात घेता पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारे अनुरूप वाहन घेता येते. त्याबाबतीत पुरेशी माहिती जालावर उपलब्ध आहे.
आता हौस म्हणून गाडी घेणाऱ्यांकडे वळू. हौस म्हणून गाडी खरेदी करणे आणि हौस म्हणून सोन्याचा दागिना बनवणे यात फार फरक आहे. सोन्याचा दागिना सांभाळून ठेवण्याकरिता येणारा खर्च फारसा नाही. पण गाडीचे मात्र तसे नाही. पार्किंग, इंधन, विमा, चालक, डागडुजी इत्यादी बाबींवर गाडीच्या आयुष्यात, गाडीच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात, हे हौसेखातर गाडी खरेदी करणाऱ्या मंडळींच्या गावीही नसते. अपघात, त्यातून उद्भवणारे खर्च, कोर्ट-कचेऱ्या अशा संभाव्य उपद्रवांची जाणीव असणे आवश्यक असते.
सुरुवातीला चार-सहा महिने या गाडय़ा वापरल्या जातात. पण नंतर मात्र दर रविवारी गाडी सुरू करून पाच मिनिटे पार्किंगमध्येच थोडेफार मागे पुढे करण्याचे आन्हिक उरकले जाते. हे काम कोण करणार यावरून कौटुंबिक कलह होतात, ते वेगळेच. काही वेळा सेकंड हँड कार मार्केटमध्ये अशाच तीन वर्षांत फक्त पाच हजार किलोमीटर चाललेल्या गाडय़ा बघायला मिळतात. मालकाची चौकशी केल्यास कुणीतरी जोशीकाका समोर येतात तेव्हा यांनी गाडी का घेतली, असा प्रश्न पडतो. पाच लाखांत घेतलेली गाडी दोन लाखांत विकतानादेखील नाकी नऊ  येतात. हौस म्हणून गाडी घेणाऱ्या मंडळींनी हा भाग निश्चितच लक्षात ठेवावा. स्वत:ला गाडी चालवायची आवड असेल तर आणि तरच गाडी विकत घेण्याची हौस करावी, अन्यथा पैसाही जातो व मानसिक स्वास्थ्यही जाते. फिरायचे असेल तर टाटा इंडिकापासून मर्सिडीजपर्यंत सर्व गाडय़ा भाडय़ाने मिळतात. शेजाऱ्याने घेतली म्हणून मीदेखील गाडी घेतली या विचारसरणीने स्वत:च्या गळ्यात पांढरा हत्ती बांधून घेण्यात काहीच शहाणपणा नाही. हौसेला ‘मोल’ असते हे कायम लक्षात ठेवावे.