मराठीतलं स्त्रीविषयक संशोधनात्मक लेखन हे बऱ्याचदा सामाजिक अंगाने केलेलं दिसतं. रूढी, परंपरा या स्त्रियांकडून पुढच्या पिढय़ांपर्यंत कशा पोहोचवल्या जातात किंवा स्त्रियांचं समाजातलं स्थान कसं बदलत जात आहे अशा विषयांवर खूप लेखन झालेलं आहे आणि ते आवश्यकही आहे. मात्र, शास्त्रीय दृष्टीने स्त्रियांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक उत्क्रांती कशी होत गेली यावर मराठीत फारसं लेखन झालेलं दिसत नाही. निरंजन घाटे यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘‘ती’ची कहाणी’ या लेखसंग्रहाने मात्र ही उणीव बऱ्याच अंशी भरून काढली आहे.
‘स्त्री नावाच्या कोडय़ाचा शास्त्रीय उलगडा’ अशा यथार्थ उपशीर्षकाच्या या पुस्तकात सुरुवातीलाच लेखकाने आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं आहे, की ‘सोशो बायोलॉजी किंवा इव्होल्युशनरी सायकॉलॉजीसारख्या क्रांतिकारी विज्ञानशाखांनी स्त्री आणि पुरुषाच्या उत्क्रांतीचा खूप वेगळ्या अंगाने विचार केला आहे.’ या सर्वाविषयी वाचत असताना आपल्या संस्कृतीतल्या संदर्भाशी साहजिकच तुलना होते. म्हणूनच त्यांनी यावर लेखन केलं. त्या समर्थ विचारधारेचा प्रवाह आपल्यापर्यंत आणून आपल्या जाणिवांवर निश्चितच परिणाम करेल असं हे लेखन आहे.
शरीरविज्ञान, मानसिकता, मेंदूची रचना, उत्क्रांतीत माणसाच्या शरीररचनेत पडलेला फरक, प्रजनन, शारीरिक सुख यांच्या बरोबरीने बाळाचा जन्म आणि संगोपन, मातृत्व, संस्कृती, मिथकं, भटक्या जमातींच्या जीवनशैली, अशा अनेक अंगांनी स्त्रियांची वैशिष्टय़ं आणि स्त्री-पुरुषांमधल्या परस्परपूरकतेचा अर्थ या पुस्तकातून उलगडून दाखवला आहे.
या पुस्तकात एकंदर आठ लेख आहेत. त्यातला पहिला लेख ‘मातृसत्ता ते पित्तृसत्ता’ हा माहितीपूर्ण आणि रंजक आहे. आदिमानवाच्या काळात शिकार, नंतर पुढे पशुपालन आणि शेती यामधला स्त्रियांचा सहभाग कसा होता यावर घाटे तपशीलवार विवेचन करतात. ती मातृसत्ता होती का, कुटुंबात पुरुषाला प्राधान्य का आणि कधी आलं, यासारखे अनेक वादग्रस्त मुद्दे त्यांनी इथे लीलया हाताळलेले आहेत. त्यात पाश्चिमात्य संशोधनाच्या जोडीने वेद आणि संस्कृत साहित्यातले दाखले आल्याने एक प्रकारचा समतोल राखला गेला आहे. विशेषत: स्त्रीराज्य आणि निरनिराळ्या संस्कृतींतल्या स्त्रीदेवता यांचा अभ्यास वैशिष्टय़पूर्ण आहे. आदिम जमातींच्या मिथकांपासून ते अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे -सूर्य-चंद्र यांचा उल्लेख पुिल्लगी की स्त्रीिलगी आहे यांसारखी रंगतदार चर्चा त्यात आहे. ग्रीक, आर्य, ज्युईश आणि मध्यपूर्वेतील संस्कृतीतले अनेक संदर्भ आल्यामुळे हा लेख बहुस्पर्शी आणि परिपूर्ण झालेला आहे.
‘स्त्री- समज आणि गरसमज’ हा लेख स्त्रीच्या समाजातील स्थानाचा वेगवेगळ्या बाजूंनी शोध घेत जातो. स्त्रीची जनमानसातली प्रतिमा म्हणजे गरसमजांचं भांडारच आहे. एका लेखातून त्याचा परामर्श घेणे हे कठीणच आहे; पण ते आव्हान इथे  वस्तुनिष्ठतेने आणि शक्य तितकी परिमाणं वापरून पेललं आहे. ‘फेमिनिस्ट’ आणि ‘फीमेलिस्ट’ यांसारखे महत्त्वाचे शब्द खूप काळजीपूर्वक वापरत त्यांचा अर्थ वाचकापर्यंत पोहोचवण्यात घाटे सफल झालेले आहेत असं म्हणावं लागेल.
स्त्रीची शरीररचना आणि मानसिकता यांचा विचार केला तर तिच्या कमतरता ज्या म्हणून समजल्या जात होत्या, त्या खरं तर तिच्या फायद्याच्याच असतात, हे इथे खूप आग्रहपूर्वक आणि पूर्ण अभ्यासानिशी मांडलं आहे. त्यामुळे लेख एकांगी वा प्रचारकी न होता संतुलित झालेला आहे.
विषयांचा आगळेपणा हे या संग्रहाचं खास वैशिष्टय़ म्हणावं लागेल. ढोबळ अंगाने जाण्याचा सोपा मार्ग टाळून घाटे नवनव्या पलूंमधून स्त्रीत्व आपल्यासमोर वेधकपणे मांडत जातात. ‘मानवी जन्माची जटिल गोष्ट’ या लेखात केंद्रस्थानी आहे जन्माची प्रक्रिया. चार पायांच्या प्राण्यांपेक्षा दोन पायांच्या माणसासाठी ही नसíगक गोष्ट कशी बदलत गेली आणि कठीण होत गेली हे चांगल्या प्रकारे विशद केलं आहे. बाळंतपणात स्त्रीला इतरांची खूप मदत लागते- त्याविषयी एक नवा दृष्टिकोन हा लेख देऊन जातो.
तीच गोष्ट आहे ‘मातृत्वाचे विज्ञानसिद्ध फायदे’ या लेखाची. विषय तर वेगळा आहेच, शिवाय त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला आढावा अत्यंत वाचनीय झाला आहे. यशस्वी माता बनवण्यासाठी गर्भारपण-बाळंतपण-संगोपन या टप्प्यांमध्ये निसर्ग स्त्रीच्या शरीरात आणि मेंदूत जे जे बदल घडवत जातो ते समजून घेणं खूपच रोचक आहे.
हार्वर्ड विद्यापीठाच्या लॅरी समर्स यांनी २००५ मध्ये एक वादग्रस्त विधान केलं होतं- ‘‘विज्ञानात उच्च प्रतीचं संशोधन करण्याची क्षमता पुरुषात जास्त असते.’’ एकंदरीत, संशोधनात स्त्रियांचा सहभाग कमी का, यावरच्या अशा मतामुळे त्यांची हकालपट्टी झाली होती. या खळबळजनक प्रसंगावरून ‘मागोवा स्त्रीच्या वैशिष्टय़ांचा’ या लेखाची सुरुवात होते. पुढे मेंदूची रचना, श्रवणशक्ती, रोगप्रतिकारक प्रणाली अशा अनेक शास्त्रीय मुद्दय़ावर पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद रंजकपणे पुढे येतो. त्याच जोडीने उंदीर वा रीसस माकडांवर केलेल्या संशोधनाचा आधार घेत हा भेद का, कशासाठी आणि अलीकडे तो कमी होत आहे का यावरची चर्चा लेखात खूप छान तऱ्हेने अधोरेखित होते. स्त्रियांच्या उपजत आणि उत्क्रांत होत गेलेल्या वैशिष्टय़ांबद्दल माहिती देता देता आपल्याला विचार करायला लावण्याची, अधिक खोलात जाऊन आणखी माहिती शोधून काढण्याची प्रेरणा या प्रकारच्या पुस्तकातून मिळत जाते हे नक्की.
तुलनेने बाकीच्या तीन लेखांमधली स्त्रीच्या शरीराविषयीची वा तिच्या प्रजननचक्राविषयीची माहिती फारशी नवी नाही आणि ते लेखन बरंचसं शास्त्रीय पातळीवरच राहतं. सामाजिक-सांस्कृतिक आशय आणि संदर्भ इथे तितक्या ठळकपणे येत नाहीत आणि आपल्या माहितीत व जाणिवांमध्ये जास्त भर पडत नाही. इतर लेखांमध्ये घाटे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचं जे कसब दिसतं ते इथे थोडं कमी पडतं.
अतिशय वेगळा विषय आणि त्याची प्रगल्भ हाताळणी यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. अशा थोडय़ाशा जड विषयाला चपखल मराठी शब्दांच्या वापरानं आणि ओघवत्या भाषाशैलीनं एक सुरेख बाज आलेला आहे. जागोजागीची अवतरणं आणि शेवटची संदर्भसूची यामुळे यातल्या लेखांना खास संग्राह्यमूल्य आहे. संशोधनाच्या संदर्भासह एखाद्या मुद्दय़ाचं विश्लेषण करत असताना घाटे लेखनातला सहजपणा आणि वाचनीयता तितक्याच ताकदीने धरून ठेवतात हे महत्त्वाचं. त्यामुळे अभ्यासपूर्ण लेखनाला लालित्याची उत्कृष्ट जोड या पुस्तकात मिळाली आहे. त्याला तितकंच समर्पक असं गिरीश सहस्रबुद्धे यांनी केलेलं मुखपृष्ठ लाभलं आहे.
    
‘‘ती’ची कहाणी’- निरंजन घाटे, समकालीन प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १२०, मूल्य – १२५ रुपये.

 

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…