आपल्या प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवावे असे अनेक प्रसंग घडत असतात. यापैकी काही कायमचे स्मरणात राहतात, तर काही स्मरणात राहू नये असेही असतात. हे प्रसंग कडू-गोड आठवणींचे असतात. ते काही नवीन  शिकवून जातात. मेघना वसंत वाहोकार यांनी ‘तिच्याही मनातले ऋतू’ या पुस्तकात असेच अनुभव मांडले आहेत.
हे पुस्तक ललित निबंध प्रकारातील आहे. वाहोकार यांनी वाचकांच्या मनातले प्रश्न, समस्या आणि त्यांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित विषय या पुस्तकातून हळुवारपणे मोजक्या, नेमक्या आणि हलक्याफुलक्या शब्दांत सादर केले आहेत. वाचकांनाही ते आपलेसे वाटतील.
समाजामध्ये उघडय़ा डोळ्यांनी आणि संवेदनशील मन घेऊन जगताना वाहोकार यांनी दुसऱ्यांची सुखं-दु:खं शब्दांत मांडली, तर कधी नुकत्याच घडलेल्या सामाजिक, राजकीय विषयांवरही भाष्य केले आहे. वाहोकार यांना विविध वयोगटांतील आणि व्यवसायांतील माणसांशी संवाद साधण्याची आवड असल्याने माणसांना सहजपणे समजून घेता आलं. ‘खरे म्हणजे हे सगळे करताना लिहिण्याचा साधा विचारही मनात नसतो, पण कधी तरी, कुठल्या तरी प्रसंगाने मनाच्या तळाशी साठलेले अलगद वर तरंगते आणि ते कागदावर उतरते व त्याचा लेख होतो. या संग्रहातील बरेचसे लेख असेच आहेत..’ या शब्दांत लेखिकेने आपले मनोगत व्यक्त केले आहे.
‘ऑल द बेस्ट माय चाइल्ड’ या लेखात मुंबई सोडून दिल्लीला राहायला गेलेली आपली मुलगी आणि जावई, त्यामुळे एका आईच्या मनाची झालेली घालमेल, मुलीच्या आठवणी आणि ती या नव्या शहरातही आपले स्वत:चे विश्व निर्माण करेल, असा या आईला वाटणारा विश्वास व्यक्त झाला आहे. ‘असे दिवस’ या लेखात भीक मागण्याचे विविध प्रकार, विविध भिकारी, त्यांना भीक घातल्यानंतर आपण दिलेल्या दानाचे काय होते, याचा बसलेला धक्का याचा अनुभव आहे. ‘भूमिका’ या लेखात नोकरी करायची असेल तर मुलांची सोय करून करा, आमच्या भरवशावर काही करू नका, आता पुन्हा यात अडकायचे नाही, असे आपल्या सुनांना सांगणारी ‘रश्मी’ आणि सासू-सासऱ्यांबरोबर मतभेद असल्याने वेगळी राहणारी, पण त्याच वेळी आपल्या मुलांना आजी-आजोबांचे प्रेम मिळाले पाहिजे म्हणून नोकरीवर जाताना मुलाला आजीजवळ सोडणारी आणि कामावरून घरी परतताना मुलाला घरी घेऊन येणारी ‘अमृता’ भेटते. ‘घर चौघांचंच हवं बाई’ या लेखात  ‘कुटुंबसंस्था बळकट व्हावी, घरात परस्परांचा सन्मान व्हावा, आपल्यासह इतरांच्याही भावना जपल्या जाव्यात, एकमेकांच्या सोबत राहता यावे,’ असं सांगत घरातील सगळ्यांनी आपलं घर, आपली जबाबदारी समजून घेणं आणि विश्वास संपादन करणं महत्त्वाचं असल्याचंही लेखिका नमूद करते. मोटार सायकल मिळाल्याशिवाय बोहल्यावर उभा राहणार नाही, असं लग्नाच्या दिवशी सांगणाऱ्या आपल्या भावी पतीसोबतचं लग्न मोडणारी आणि ‘याच मंडपात माझ्याशी लग्न करण्यास कोणी तयार असेल तर माझी त्याच्याशी लग्न करण्याची तयारी असल्याचं’ सांगणारी धाडसी तरुणी ‘एक होती सुनंदा’ या लेखात भेटते.
‘प्लॅटफॉर्म नंबर १’, ‘तिचे कॅलेंडर आता नाही’, ‘तोच समुद्र पुन्हा नवा’, ‘सॅल्यूट हो पोलीसदादा’, ‘तिच्याही मनातले ऋतू’, ‘तुम्ही वाहा देवांना फुले’, ‘ज्या वेदना वांझ नसतात’, ‘दिवसेंदिवस’, ‘देव सारे पाहात असतो’ असे एकंदर २७ लेख या पुस्तकात आहेत. हे लेख वाचताना त्यातील व्यक्ती, प्रसंग हे आपल्या आजूबाजूला घडणारे किंवा घडून गेलेले आहेत, असे जाणवू शकते आणि प्रत्येकाला ते ‘आपले’ वाटू शकतात. हेच लेखिकेचे आणि या पुस्तकाचे यश आहे.   
‘तिच्याही मनातले ऋतू’ – मेघना वसंत वाहोकार, विजय प्रकाशन, नागपूर, पृष्ठे- १५२, मूल्य- २०० रुपये.