रोजच्या रोज संडासला व्यवस्थित होणं, हे चांगल्या आरोग्याचं लक्षण मानलं जातं. पण सोपा, स्वच्छ, सुलभ संडास ही दुर्लभ गोष्ट आहे, निदान महाराष्ट्रात तरी. कुठेही जा, सार्वजनिक ठिकाणच्या संडासची दुरवस्था आपल्या एकंदर अनास्थेवर आणि बेजबाबदारपणावर शिक्कामोर्तब करते. पण तरीही कामानिमित्ताने सतत घराबाहेर असणाऱ्यांना सार्वजनिक संडासचा वापर करावाच लागतो. नाटकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरणाऱ्या एका आघाडीच्या दिग्दर्शकाला आलेला हा सार्वत्रिक अनुभव जळजळीत वास्तव समोर आणतो. जेवणा-झोपण्या इतक्याच मूलभूत व नैसर्गिक असणाऱ्या या गोष्टीकडे आपण ज्या बेपर्वाईने पाहतो, त्यातून आपल्या संडासात ‘संस्कृती’चा लवलेशही नाही, हे सत्य उघड होतं..
आ तापर्यंत आपण ‘वाचन संस्कृती’ नावाचे दोन शब्द ऐकले आहेत, पण ‘संडास संस्कृती’ नावाचे दोन शब्द काही आपल्या ऐकिवात नसतात. कारण उघड आहे की, अशी काही ‘संस्कृती’ नावाची गोष्ट ‘संडास’शी जोडली जाणे योग्य नाही. पण दुर्दैवाने आणि मोठय़ा कष्टाने मला हे दोन शब्द एकत्र सुचले. हा लेख आपली ‘संस्कृती’ कशी ‘संडास’ आहे, या विषयी नसून आपल्या संडासात कशी ‘संस्कृती’ नाही, हे सांगण्याकरिता आहे, हे ध्यानात घ्यावे, ही नम्र विनंती. संस्कृतीची व्याख्या ‘म्या बापुडय़ाने’ काय करावी? पण जी वाचली, ऐकली ती अशी – सभ्यता, सुसंस्कृतता, सौजन्य, सौहार्द, स्नेह, समजूतदारपणा, सहिष्णुता, सहकार्य, सामंजस्य, सहअनुभूती वगैरे म्हणजे संस्कृती. आता या ‘स’कारात संडास कशाला असेल? ‘वाचन संस्कृती’मध्ये ‘वाचनाने संस्कृती फुलते,’ असे अपेक्षित आहे. तसे संडासाचे कुठे आहे? ‘संडासाने संस्कृती सुधारते,’ असे कोण म्हणेल?
मी गेली अनेक र्वष ‘संडास’ या विषयावर आपोआप विचार करतो. कारण ती मला रोज लागते. आता या माझ्या शब्दांनी आपल्या पोटात चांगलेच ढवळले असणार. पण काय करू? जसा माझा विचार होतो तसा विचार तुमचा होतो की नाही, मला माहीत नाही. मी तसा ‘हिंडणारा’, ‘फिरणारा’ माणूस आहे. बरं, हे मी ‘टुरिस्ट’ म्हणून फिरत नाही तर कामानिमित्ताने फिरतो. मी आहे, नाटकवाला. त्यामुळे वर्षांनुवर्षे महाराष्ट्रातल्या जागोजागी मी नाटक घेऊन फिरतो. याबरोबरच माहितीपट करतो आणि कार्यशाळाही घेतो. तर या साऱ्या निमित्ताने मला महाराष्ट्रातील शहरा-गावांतील, विद्यापीठांतील, सर्व जाती-धर्मातील, संस्था-संघटनांमधील, लग्नाच्या हॉलपासून ते बंदिस्त रंगमंदिरातील हजारो संडास अनुभवायला आले. त्यातूनच माझा ‘थिसिस’ तयार झाला. ‘संडास संस्कृती थिसिस’ अर्थात अनुभवाचे बोल!
आता खरं तर नाटकाकरिता सुसज्ज थिएटर्स हवीत वगैरे मागणी वर्षांनुवर्षे आहे. ‘सुसज्ज’ याचा अर्थ जो तो आपापल्या कुवतीनुसार लावतो. जसा काहींचा विकासाचा अर्थ चारपदरी रस्ते आणि चकचकीत मॉल यापर्यंतच मर्यादित असतो तर ‘सुसज्ज’ थिएटर म्हणजे काय? तर गुबगुबीत जांभळ्या खुच्र्या आणि घसरणाऱ्या टाइल्स! जिथे नाटक सादर करायचे ते रंगमंच आणि ज्या रंगमंचावर नाटक करायचे, त्याला अनुकूल अशी व्यवस्था कुठेच नसते. ही अवस्था पुण्या-मुंबईचीसुद्धा आहे. मोठे थिएटर, पण रंगमंचावर ‘एन्ट्री’ घ्यायला विंगेत जागाच नाही. एखादी गोष्ट अंधारात न्यायची असेल तर थेट मागच्या काळ्या पडद्याला उचलून न्यावी लागते. ‘सुसज्ज’ करायचे म्हणून एका थिएटरमध्ये थेट रंगमंचावर खालून कुलर लावलेत. आमच्या नटमंडळींची धोतरं उडायची. शिवाय गार हवा सतत शरीरात गेल्याने लघवी लागते, ती गोष्ट ‘अ‍ॅडिशनल’. मी या रंग‘मंदिरा’त या गोष्टीचा शोध घेतला आणि व्यवस्थापकाला विचारले, ‘हे कोणत्या वास्तुशिल्पकाराने सुचवले आहे?’ तर त्याच्या चेहऱ्यावर ‘वास्तुशिल्पकार’ ही काय भानगड असते, असे भाव उमटले. एका थिएटरमध्ये विंगेत पाऊल ठेवले की संडास होता. आम्ही त्या संडासातूनच ‘एन्ट्री’ घ्यायचो. ‘वेटिंग फॉर गोदो’ नाटकातली ‘अ‍ॅब्सर्डिटी’ फिकी पडेल, असे सारे मनोविश्व आमचे होऊन गेले होते. ‘गोदो’मध्ये खरोखर असा सीन आहे की, त्यातले एक पात्र लघवीला विंगेत जाते. दुसरे हसत राहते. त्या दिवशी तो सीन करताना आम्हाला जे हसू आले ते ‘लांच्छनास्पद’ या कोटीतले होते. तसे परत कधीच हसता आले नाही.
तर आपला मुद्दा चालला होता ‘सुसज्ज’ थिएटरचा.
सुसज्ज थिएटर बांधणारा वास्तुशिल्पकार म्हणजे ‘आर्किटेक्ट’ हा नाटय़प्रेमी असतो का? त्याला त्या कलेविषयी आस्था असते? त्याला कंत्राट देणाऱ्या नगर किंवा महानगरपालिकेतील अधिकारी नाटकाची गरज ओळखून असतात? आपल्या साऱ्या समाजाला नाटक नावाची गोष्ट ‘संस्कृती’ म्हणून जोपासावी वाटते का? छे! नकोत असले प्रश्न. माय-बापहो, उदार अंत:करणाने क्षमा करा. नाटकाचे थिएटर म्हणजे मंदिर. हे मंदिर म्हणजे काय तर ‘चौथरा असलेला एक मोठा हॉल’. त्यावर लग्न, डोहाळेजेवणे, केळवणी, मुंजी, विविध पक्षांची चिंतन शिबिरे, लावण्या, नृत्याचे कार्यक्रम, गॅदरिंग, चिनी ‘अ‍ॅक्युप्रेशर’ गाद्या विकणाऱ्या एजंटांच्या कॉन्फरन्सेस आणि नाटक असा एकत्र ‘ऑल इन वन’ चिवडा म्हणजे आपले सुसज्ज थिएटर. वधू-वरांच्या खोल्या काय आणि नट-नटय़ांच्या मेकअप रूम्स काय? सारे एकच!
या ‘सुसज्ज’ रंगमंचावर प्रयोग करताना हिंडणे म्हणजे अलौकिक अनुभव. स्टेजवरच्या फळ्या तुटलेल्या असतात किंवा स्टेजवर ठिकठिकाणी खड्डे असतात. त्यावर अजून एक फळी ठोकलेली असते किंवा चक्क फरशा ठेवलेल्या असतात. चालताना काही ठिकाणचे खिळे  वर आलेले असतात. मरा. ठेचकळा. काही थिएटर्समध्ये एसी अथवा कुलर विंगेत असतात. ती धबडगी डबडी विंगेत चालू असतात. सतत ‘कर्र्र्र’ आवाज तरी करीत असतात किंवा आवाज न करता गंजून मरून पडलेली असतात. स्टेजवर एसी, फॅन्सचे गरगरणे नसेल तर थेट रस्त्यावरचे आवाज येतात. एका रंगमंदिराशेजारी लग्नाचे कार्यालय होते. त्यामुळे जेवणावळीची वाजंत्री ऐकू येत होती, गोड-तिखट वास येत होते. फोडणी नाकात घुसत होती आणि वरात तर जवळजवळ प्रेक्षागृहातूनच गेली, अशी अवस्था. शांतता नावाची गोष्ट अनुभवायलाच येत नाही. (आता या ठिकाणी आपण मोबाइलविषयी बोलणार नाही आहोत. तो विषयच ‘सायलेन्ट’वर ठेवणे गरजेचे.) सुसज्ज थिएटरमध्ये शांततेचा अभाव हा मुद्दा चालला आहे. ही शांतता जशी महत्त्वाची, तसाच अंधारही महत्त्वाचा. तर तेही कठीणच. काही रंगमंदिरांत वटवाघुळे इतस्तत: फिरत असतात, पारवे घुमत असतात आणि प्रसंगी उंदीर-मांजरे-घुशी बागडत असतात. (बुडणाऱ्या जहाजाचा उंदरांना प्रथम अंदाज येतो, म्हणतात!)
तर अनेक थिएटर्समध्ये विंगाच नसतात किंवा असल्या तर जागच्या हलत नाही, अशा घट्ट निबर व्यवस्थेसारख्या रुतून बसलेल्या असतात. मागचा काळा पडदा असंख्य गोष्टींनी व्यापलेला असतो. त्याला काही कागद अथवा थर्माकोल चिकटलेले असते, त्यावर लाखो टाचण्या असतात किंवा तो जागोजागी उसवलेला आणि रंग हरवलेला असतो. झालरी तशाच. त्यावर झटका मारला तर धुळीचा ढग खाली येतो. झालरी उचलायला जायचा मार्ग भयाण अंधारी असतो. तिथे सर्व व्यवस्था कमालीच्या कुबट असतात. अशा अवस्थेत भिंतीवर आपल्या पूर्वसुरींच्या अवाढव्य विविध आकारांच्या चित्रफ्रेम्स असतात. हे सारेच लोक विविध दिशेला बघत असतात. काही वेळ आपण टक लावून त्यांच्याकडे पाहिले तर सारेच व्यथित आणि व्याकुळ आहेत, असे वाटते. एका थिएटरमध्ये बालगंधर्वाची फेमस पोझ (‘खडा मारायचा झाला तर..’ वगैरे अशी, म्हणजे दोन्ही हातांनी ‘नको नको’ म्हणणारी) थेट लेडीज टॉयलेटच्या जवळच होती.
‘सुसज्ज थिएटर’मध्ये प्रकाशयोजनेकरिता लाइट टांगायला नीट दांडय़ाच नसतात. लाइट कनेक्शन्स तुटलेली अथवा बंद. लाइट रूम नावाची गोष्ट स्टेजच्या समोर असेलच याची खात्री नाही. विंगेतून अथवा स्टेज अर्धेच दिसताना संपूर्ण नाटकाची प्रकाशयोजना करायची. तिथे जुने डीमर्स. तुटके किंवा बंद पडलेले दिवे. असंख्य वायरी एकमेकांत गुंतलेल्या. ‘कॉम्प्लिकेटेड’ अवस्थेमुळे आपली ‘कॉम्प्लेक्स’ अवस्था. तिथल्या व्यवस्थापनातील ‘लाइटवाला’ नावाचा इसम कायम गायब. तो उगवलाच तर त्याच्याकडे ‘करंट’ तपासण्याकरिता ‘टेस्टर’ नावाची गोष्ट अशक्य. एका थिएटरला आमच्या प्रकाशयोजना करणाऱ्या मुलाने त्या थिएटरच्या माणसाला ‘टेस्टर’ने वीजप्रवाह चालू आहे की नाही, ते तपासू या, असे म्हणताच असा ‘टेस्टर’ कुठे मिळतो, असे थिएटरच्या माणसाने विचारले. तेव्हा आमच्या प्रकाशयोजनाकाराने चिडून ‘थ्री पिन लावण्याच्या भोकात,’ असे उत्तर दिले. ‘टेस्टर’ हा कुठल्याही इलेक्ट्रिकच्या दुकानात मिळतो, ही साधी माहिती त्या थिएटरच्या माणसाला नव्हती आणि आपण प्रकाशयोजना करतो तर आपल्या खिशात ‘टेस्टर’ हवा, याची जाणीव आमच्या प्रकाशयोजनाकाराला नव्हती. तेव्हा ही ‘टर’ कोणी कोणाची उडवली, असे आमचे चेहरे झाले होते. तर या एकुणात ‘सुसज्ज’ यंत्रणेबद्दल आपण बोलत होतो.
अशा थिएटर्सच्या मेकअप-रूम वगैरे तर काय वर्णाव्या? आरसे पार गेलेले. बसायला जागा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पुरेसे दिवे वगैरे तर दूरच. नाटकाला रंगमंचासमोर बसून संगीत द्यायचे असेल तर जी स्टेजला लागून केलेली व्यवस्था असते, ती केवळ ‘अद्भुत’ कॅटेगरीतली असते. अनेक ठिकाणी तर लोकांना ती सार्वजनिक थुंकदाणीच वाटते. आम्ही एकदा त्या जागेवरून मोजून तीन पोती घाण काढली. त्यात एक पाण्याची प्लास्टिकची बाटली आढळली. त्यात रंगीत काही होते. सुरुवातीला तेल वगैरे असेल असे वाटते, तर त्यात पान खाऊन थुंकलेल्या लाल गुळण्या होत्या. ते पाणी आमच्या संगीतकाराच्या हातावर ओघळले. तो पेटी वाजवणारा होता. त्याने सुमारे अर्धा तास हात धुतले. गुटख्याचा वास अंत:करणात भरून घेऊन आम्ही नाटकातील ओव्या, पोवाडे आणि भजने म्हणत होतो. तर अशी सुसज्ज यंत्रणा! त्यात राहिला संडास. व्वा! आलो आपण आपल्या मूळ विषयाला. आता मजा.
मी गेल्या अनेक वर्षांत असा एकही संडास अनुभवला नाही की जिथे किमान आनंद होईल. वस्तुत: जेवणा-झोपण्याइतकीच ही मानवाची मूलभूत गरज आहे. संडास नीट झाला तर दिवस नीट जातो, वगैरे आपल्याला तोंडपाठ असते. पण सार्वजनिक ठिकाणी संडास अस्वच्छच असला पाहिजे, ही आपली समजूत पक्की आहे. संडास नावाची गोष्ट गलिच्छ आहे आणि ती लागणे हे पाप आहे, हे आपले  मूळ सूत्र आहे. आता मी काही संडासांचे वर्णन करायचा प्रयत्न करतो.
संडासात मुख्य गायब असणारी गोष्ट म्हणजे टमरेल. तिथे असलीच तर पाण्याची बाटली असते. ती बाटली अचानक फिस्करणाऱ्या पाण्याच्या स्रोतात धरायची. हे दिव्य म्हणजे जलदिव्यच! मी टमरेलचा पाठपुरावा केला तर व्यवस्थापकाने उत्तर दिले की, लोक टमरेल पळवतात. आता ज्या देशात लोक फालतू टमरेल पळवतात तो देश आणि समाज हा अतीव गरजू लोकांचाच म्हटला पाहिजे.
बहुतेक संडासांच्या कडय़ा तुटलेल्या किंवा गायब असतात. का कोण जाणे, तिथे सुतळीने ‘ळ’ अक्षरांचा गुंता असतो. मी व्यवस्थापकाला विचारले की, कडय़ाही लोक पळवतात का? तर त्याने उत्तर दिले की, ‘त्या मुद्दाम तोडतात’. आता प्रत्येकाला आत्यंतिक आवश्यक असणाऱ्या फालतू कडय़ा तोडणारे आपले देशबांधव हे क्रांतिकारच म्हटले पाहिजेत.
आता एखाद्या संडासात टमरेल असेल तर त्याला धरायला कानच नसतो. बरं कान असला तर नळ कुठल्या दिशेने कसा सुरू होईल हे अनाकलनीय असते. त्यामुळे ‘तोतऱ्या नळाची धार’ कधी थेट पॅन्टीवर तर कधी बुटावर. तो नळ लवकर बंद होणारा असेल तर ठीक, नाहीतर आपण संडास आणि आंघोळ करून बाहेर पडतो. ‘टू इन वन’.
एका संडासात चक्क नळाला बागेत पाणी घालायला लावतात तशी नळीच होती. आता तिचे सुरुवातीचे टोक शोधून काढून संडासला बसायचे ‘जंतरमंतर’ टाइप कोडे संडासकर्त्यांला सोडवायचे होते. नळ सोडल्यावर तो पाइप चार ठिकाणी ‘लिक’ झाला होता. त्यामुळे आजूबाजूला कारंजी उडत होती. ‘झनक झनक पायल बाजे’मधली वृंदावन गार्डनच जणू!
काही ठिकाणी संडास असतात, पण बहुसंख्य ठिकाणी पाणीच नव्हते. बिसलेरीच्या बॉटल भरून आणावी लागे. एका बाटलीत जी काही होईल ती स्वच्छता! संडासला केंद्रस्थानी मानून ही ‘रंगमंदिरे’ का उभारीत नाहीत? नाही त्या मंदिरांना गल्लोगल्ली लाखो, कोटी रुपये शासन आणि भक्त देतात. रंगमंदिर हा शब्दच चुकीचा आहे का? ‘कुणी संडास देता का संडास?’ असे खरे तर ‘डायलॉग’ हवे होते का?
काही संडास ‘सुसज्ज’ असतात. म्हणजे ते ‘वेस्टर्न’ असतात. संडासला बसताना ती वरची प्लेट टाकून बसणे आणि धुण्याअगोदर ती वर करणे हे शिक्षणच नसल्याने त्यावर ओली घाण असते. आमचा एक नट त्यावर दोन्ही पाय घेऊन बसला तर पाय निसटून त्याचा गुडघा फुटला.
‘वेस्टर्न’ संडासात फ्लश असतो (म्हणजे असायला हवा) तर तिथे पाणी तरी नसते किंवा फ्लशची यंत्रणा मोडलेली असते. अशा वेळी डोळे गच्च मिटून श्वास रोखून उलटीची भावना दाबून धरावी लागते. अशा अवस्थेतच अचानक आपल्या डोक्यावर काही ओले लागते. आपण मान वर करतो तर वरच्या मजल्याचा संडास ठिबकत असतो.
या ‘सुसज्ज’ संडासात असाच एक नट बसला तर त्याने ऐटीत डाव्या बाजूची साखळी ओढली तर त्याच्या खांद्यावर पाण्याची टाकी पडली. (नशीब त्याच्या खांद्यावर आमचे नाटक नव्हते.) तसेच नाटकही राजकीय-सामाजिक होते, म्हणून बचावले. तो खांदे पाडून चालू शकला. नाटक ऐतिहासिक असते आणि डोक्यावर जिरेटोप वगैरे ठेवायची वेळ आली असती तर त्याला जिरेटोप आपल्या पाठीला ढालीसारखाच बांधावा लागला असता. ती ऐतिहासिक नामुश्की मात्र टळली.
पैसे वाचविण्याकरिता दोन संडासांच्या मधल्या भिंतीत एक भोक असते. त्यात एक शून्यचा दिवा असतो. त्या प्रकाशात संडासला जाणे हे केव्हाही भीतीदायकच.
आजूबाजूला प्रशस्त जागा असताना संडासची जागा आखूड का असते? म्हणजे दार आत उघडले की आपण सप्तपदी घालून पल्याड जायचे. मग आपण ‘भाकरीपाणी’ खेळात सात आणि आठ चौकोनांत उलटी उडी मारतो, तशी उडी मारायची. मग परत उरलेली त्रिपदी. मग दार लावायचे. परत निघते वेळी शंकराला अर्धी फेरी मारतात तशी परत हीच क्रिया उलट दिशेने. ‘धन्य तो सोहळा अनुपम’ म्हणजे काय ते अशा वेळी कळते.
काही संडासांची दारे आपणच हाताने धरून ठेवायची असतात. अशा वेळी नळ सुरू ठेवणे, संडास करणाऱ्याने गाणे गुणगुणने किंवा शीळ वाजवणे असे उप-कार्यक्रम सुरू ठेवावे लागतात. समोरच्या दारावर अश्लील चित्रे आणि मोबाइल फोन खरडलेले असतात. आपल्याला डोळे असतात. डोळ्यांना समोरचे दिसते आणि दिसलेले आपल्याला वाचता-पाहता येते, हा आपलाच दोष!
काही ‘इंडियन’ संडासात पावलंच नसतात किंवा असली तर तुटलेली. आपली पावलं त्या पावलांवर जुळत नाहीत. मग अशा वेळी पोटरीतून जे पेटके येतात त्याने ‘नको तो संडास’ अशी अवस्था होते. आता अशा पावलं नसलेल्या संडासात अचानक दाराखालून पाणी येते. हे ‘धरण’ कुठून फुटले अशा शोधात बाहेरचा नट बेसिनवर तोंड धूत, नाक शिंकरत आणि घसा खरडवत असताना आपल्याला आढळतो. तोपर्यंत आपले चपला-बूट पच्च ओले!
मी एका इंडियन संडासात पावलं उलटी असलेली पाहिली. तेव्हा परत व्यवस्थापकाकडे गेलो. त्याला ती पावलं दाखवली. त्यालाही गोंधळायला झाले. त्याने तिथे त्याची पावले ठेवून तपासली. काही वेळाने आम्हा दोघांची दिशा हरवली. म्हणजे संडासचे दार नेमके कुठल्या दिशेला हेच कळेनासे झाले. त्यात संडासचे भांडेच चुकले आहे, असेही वाटले. शेवटी मी त्याला हा संडास महानगरपालिकेने भूतांकरिता बांधला असेल, अशी शक्यता सांगितली.
 ‘पुरुषी संडास’ असे तर ‘स्त्री संडास’ कसे, या शोधात मी एकदा आमच्या अभिनेत्रीला विचारले तर ती म्हणाली, ‘आमच्या ‘ग्रीन रूम’मध्ये संडासच नाही.’ हे फारच छान. म्हणजे स्त्रियांना संडास-मोरीची आवश्यकताच नसते, हे आपले ठाम मत आहे. मग मी जिथे जाईन तिथे स्त्रियांचे संडास शोधू लागलो. ते अभावानेच दिसले. एका ग्रीन रूममध्ये अंधाऱ्या जागेत फक्त वाळू पसरलेली होती. समोर तडा गेलेली भिंत होती आणि भोक. त्यातून पलीकडचे दिसत होते. काही विचित्र झाडे आणि त्यावर लटकलेल्या रंग उडालेल्या असंख्य प्लास्टिकच्या पिशव्या!
संडासात भयाण घाण होती, डास होते, जीवघेणा उग्र दुर्बट (कुबटच्या पल्याडचा म्हणून हा शब्द- दुर्बट!) वास होता. म्हणून उघडय़ावर गेलो. कुल्याला गवताचे तुरे लागत होते आणि चमकदार निळ्या-जांभळ्या माशा घोंगावत आल्या.
तुम्ही कुठल्यातरी संडासात मोबाइल, जाड पाकीट, पेन किंवा वस्तू ठेवायला कोनाडा बघितला आहे? मग अशा वेळी हात धुवायला साबण वगैरे किती स्वप्नविलास आहे, हे तुम्ही मान्य कराल. संडास हा ‘सुररिअ‍ॅलिझम’ (अतिवास्तववादी) नसून ‘सुपररिअ‍ॅलिझम’ (अतिकल्पनावादी?) आहे. जिथे शाळा, रुग्णालये, रस्ते, घरे, पाणीव्यवस्था अशा मूलभूत सोयी अपवादात्मक आहेत, तिथे थिएटर आणि संडास याविषयी बोलणे हे ‘सुपररिअ‍ॅलिझम’ नाही तर काय? एकदा मी संडासाचे दार उघडले तर ते माझ्या अंगावर चौकटीसकट कोसळले. याला कुठला ‘इझम’ म्हणावं? (‘इझम’ न मम?)
मी एकदा कार्यशाळेनिमित्ताने ‘अ‍ॅनिमिया’ म्हणजे शरीरातील रक्ताची कमतरता या विषयावर बोलत होतो, तर पाणी भरपूर पिणे, या मुद्दय़ाबाबत बोलताना एक बाई (पश्चिम महाराष्ट्रातील!) उठली आणि म्हणाली की, ती सायंकाळनंतर पाणीच पीत नाही. कारण विचारले तर ती म्हणाली की, घरात संडास नाही. रात्री-अपरात्री लघवीला लागली तर कुठे जा बाहेर अंधारात- काटय़ाकुटय़ात अन् पावसाबिवसात. म्हणून पाणीच प्यायला नको! सोपा, स्वच्छ, सुलभ संडास ही दुर्लभ गोष्ट आहे? प्रश्न  संडासचा की संस्कृतीचा? आता थांबतो. लेखात पुढे थोडी मोकळी जागा मुद्दामून सोडतो, मोकळा श्वास घेण्याकरिता.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप