पीटर हा एका शांत उपनगरात लहानाचा मोठा झालेला मुलगा. जंगलात राहण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्याच्यात यथातथाच होते. गाडी कशी चालवतात अथवा दुरुस्त करतात, हेही ठाऊक नसलेला पीटर अ‍ॅलिसन सहा महिने आफ्रिकेत भटकल्यानंतर आणि जवळचे सगळे पसे संपल्यावर थोडे पसे गाठीला जमा करावेत म्हणून तिथल्याच एका कॅम्पवर राहून काम करू लागला आणि कसा तिथलाच झाला, याची ही रोचक कहाणी आहे. lr15कालांतराने गाइड, कॅम्प मॅनेजर आणि मग होतकरू गाइडचा प्रशिक्षक झालेल्या पीटरचे आफ्रिकेतल्या जंगलसफारीचे अविस्मरणीय अनुभव या पुस्तकात मांडले आहेत.
आफ्रिकेतले वन्यजीवन, बोट्स्वाना देशातील दुर्गम ठिकाणच्या जंगलात पर्यटकांचा गाइड बनलेल्या पीटरचे तिथल्या वन्यजीवनाचे आणि तिथल्या लोकजीवनाचे शेकडो संदर्भ या अनुभवांतून डोकावत राहतात.
 जंगलात एखादा रानटी प्राणी समोर उभा ठाकला, की ‘काहीही कर, पण पळू नकोस’ हा मंत्र कसा उपयोगी पडतो, हे सांगण्यासाठी कथन केलेले काही प्रसंग वाचताना आपल्याही जिवाचा थरकाप उडतो. कधी त्याच्यापासून हातभराच्या अंतरावर दोन सिंह असतात, कधी त्याच्यासमोर लढाईत अजिंक्य ठरणारा हनी बॅजर हा चिवट प्राणी उभा ठाकलेला असतो, तर कधी पीटर काही टनाच्या हत्तीपासून केवळ वीतभर अंतरावर असतो. एका फटक्यात जीव जाईल अशी आफत ओढवलेल्या कित्येक प्रसंगांतून बाहेर पडलेल्या पीटरचं चित्तथरारक प्रसंगांनी आटोकाट भरलेलं जगणं पुस्तकातल्या जवळपास प्रत्येक प्रकरणात आपल्यासमोर उभं राहतं.
या प्रसंगांत स्वत:च्या शौर्याची शेखी तो मिरवत नाही, तर बेसावध क्षणी समोर उभ्या ठाकलेल्या शिकारी प्राण्यांना सामोरं कसं जायचं याच्या कित्येक क्लृप्त्या तो कळत-नकळत सांगून जातो. आफ्रिकेतल्या समृद्ध वन्यजीवनासोबत, त्याच्या खडतर जगण्याचे अनेक पलू आपल्याला समजतात. पायाखालून पळणारे हजारो उंदीर, असंख्य चावे घेऊन बेजार करणारे डास, मर्कटलीलांनी त्याच्या झोपेचे होणारे खोबरे, मूलभूत गरजा भागवताना त्याची होणारी दमछाक.. या सगळ्या गरसोयी झेलतही हसतमुखानं साऱ्या पर्यटकांना सामोरा जाणाऱ्या पीटरचं जंगलावर आणि तिथल्या वन्यजीवनावर किती कमालीचं प्रेम आहे, हे आपल्याला पुस्तक वाचताना उमजत होतं. हे कष्टप्रद जीवन जगताना त्याच्या बोलण्यात तसूभरही तक्रारीचा सूर नाही, तर या समस्या त्याने विनोदी शैलीत मांडल्या आहेत.
पर्यटकांना घेऊन जंगलसफारीवर जाताना प्राण्यांचा माग काढण्याच्या पद्धती, त्यासाठी अमुक एका प्राण्याच्या ठाऊक असाव्या लागणाऱ्या सवयी, शक्य तितक्या जवळून प्राणी बघता यावा, म्हणून शोधावा लागणारा सुरक्षित आसरा या सगळ्याची पीटर अ‍ॅलिसनने नमूद केलेली उदाहरणे आपल्याला चकित करतात.
 त्यांच्या कॅम्पवरची उदमांजर, अंगावर झेप घेत कॅम्पवरच्या पर्यटकांना जेरीस आणणारी खार, हनी बॅजर या पाळीव प्राण्यांची ओळख करून देणारे प्रकरण वाचनीय आहे. पीटरच्या वाढत गेलेल्या पक्षीवेडाची चुणूकही काही प्रकरणांत दिसते. जंगलसफारीवर येणाऱ्या पर्यटकांचे तऱ्हेवाईक नमुनेही काही प्रकरणांत अनुभवायला मिळतात.
   काही विलक्षण योगायोगाचे, काही कमालीचे भीतीदायक, काही प्रसंगावधानाचे, तर काही केवळ नशिबाने साथ दिली म्हणून वाचलो.. असे प्रसंग आपल्याला जंगलाबद्दलही बरंच काही शिकवून जातात. एखादी घोडचूक, जरासा गाफीलपणा आपल्या जिवावर कसा बेतू शकतो, याचेही दाखले काही प्रसंगांतून मिळतात.
 सिंहांना आकर्षति करण्यासाठी त्याच्या मित्राने हरणाचा, डुकराचा आवाज काढल्यानंतर अंधारात दोन फुटांवर उभी ठाकलेली सिंहीण, सातशे किलोचे चिडलेल्या रेडय़ाचे धूड आपल्या दिशेने धावत येत असल्याचे पाहून त्याला चुकवण्यासाठी पीटरने लढवलेली शक्कल, सिंहांचा पाठलाग करण्याच्या नादात एकदा पाण्यात बंद पडलेली लॅण्डरोव्हर आणि मग हातभरच्या अंतरावर असलेल्या पाणघोडय़ांपासून पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी पीटरने केलेला जिवाचा आटापिटा, सिंहाच्या दोन कळपांतील युद्ध जवळून बघताना जिवावर बेतलेला प्रसंग, भरकटत राहिलेली बोट स्वगृही आणण्याच्या प्रयत्नात वाट चुकलेला पीटर आणि त्यांच्या मित्रांची सागरीसफर ही सारीच प्रकरणे केवळ अफलातून! पीटरची अगदी जवळून हत्तींच्या कळपाशी झालेली गाठभेट पाहताना आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात. गाडी बिघडून आफ्रिकेच्या वाळवंटात मकाडीकाडी येथे त्याला व्यतीत कराव्या लागलेल्या रात्रीचा अनुभव आपल्यालाही बरंच काही शिकवून जातो! फोटो काढण्यासाठी चित्त्याच्या अगदी शेजारी जाऊन हसत उभा राहणारा पीटर आपल्याही आठवणींमध्ये बंदिस्त होतो. यातील काही प्रसंगांची छायाचित्रं पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. ती बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. पुस्तक वाचून संपलं तरी हे विलक्षण अनुभवकथन मनात रेंगाळत राहतं.
 
 सफारी आफ्रिकेतली! – पीटर अ‍ॅलिसन, अनुवाद- मंदार गोडबोले. मेहता पब्लििशग हाऊस, पृष्ठे- २२०. मूल्य- २४०.