टोयोटा ही आज मोटारनिर्मितीच्या क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. तिच्या बाबतीत अगदी अलीकडे घडलेली ही घटना.. आपल्या मोटारीच्या दर्जाविषयी शंका वाटली म्हणून टोयोटाने ग्राहकांना विकलेल्या मोटारी परत मागवल्या. किती मोटारी? तब्बल  दीड  कोटी मोटारी! टोयोटाच्या स्पर्धकांनी टोयोटाच्या गाडय़ांच्या दर्जावरून या कंपनीविषयी आरडाओरडा केला. परंतु इतक्या मोठय़ा प्रमाणावर मोटारी परत मागविण्याचा प्रामाणिकपणा जगात किती कंपन्या दाखवू शकतील? टोयोटाची कार्यसंस्कृती पाहा- जेव्हा कंपनीला मोटारींच्या दर्जाविषयी शंका वाटली तेव्हा त्या मोटारी परत मागवण्याचा निर्णय एका क्षणात झाला. त्यावर दोन मिनिटेदेखील चर्चा झाली नाही. मात्र, अशा गोष्टींचे अनुकरण कुणीही करीत नाही, हे दुर्दैव.
मागील काही लेखांमधून जपानच्या आर्थिक विकासात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या दोन प्रमुख संकल्पनांचा- ‘कायझेन’ आणि ‘क्वालिटी सर्कल’ यांचा आपण परिचय करून घेतला. आज जपानच्या उद्योगजगताने जगाला दिलेल्या तिसऱ्या महत्त्वाच्या देणगीचा परिचय करून घेऊ या. आज जगात सर्वत्र प्रचलित असणाऱ्या या संकल्पनेचे नाव आहे- ‘जस्ट इन टाइम’!
काय आहे ही संकल्पना?
कोणत्याही कारखान्यात एखाद्या वस्तूचे उत्पादन करायचे तर कच्चा माल, सुटे भाग इ.ची गरज लागणारच. उत्पादनाच्या प्रमाणात कच्चा माल, सुटे भाग आगाऊच खरेदी करून ठेवावे लागतात. यात मोठय़ा प्रमाणावर भांडवल अडकून पडते. हा माल साठवायचा तर तेवढी जागा असावी लागते. कच्चा माल व सुटे भाग खराब होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागते. थोडक्यात- याकरता भांडवल, वेळ, मनुष्यबळ असे सर्व काही नियोजन करावे लागते. ‘जस्ट इन टाइम’ याचा साधा अर्थ- अशी कोणतीही, कशाचीही पूर्वखरेदी न करता अगदी निर्मितीच्या क्षणी (जस्ट इन टाइम) सर्व कच्चा माल व सुटे भाग उपलब्ध होतील याची दक्षता घ्यायची. आगाऊ तरतुदीसाठी लागणारे भांडवल, जागा इ.ची बचत यात शक्य होते.
खरे तर ‘जस्ट इन टाइम’ हे नावदेखील जपानी लोकांनी दिलेले नाही. ते अमेरिकनांनी दिलेले आहे आणि ते चुकीचे आहे असा जपानी तज्ज्ञांचा दावा आहे.
अमेरिकनांनी ज्याचे वर्णन ‘जस्ट इन टाइम’ असे केले ती संकल्पना ‘टोयोटा’ या जगप्रसिद्ध कंपनीची देणगी आहे. आता या संकल्पनेचा गाभा समजावून घेण्यापूर्वी तिची जन्मकथा सांगतो.
टोयोटा कंपनीचा मोटारी बनवण्याचा कारखाना आहे आणि आपण कल्पना करू की, एका कारखान्यात प्रत्येक दिवशी ५००० मोटारी तयार होतात. (प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा आहे. आणि टोयोटाचे जगभरात असे अनेक कारखाने आहेत.) एका कारखान्यात ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या ७० मॉडेल्सची निर्मिती करते. इंजिनक्षमता, आकार, रंग, बाकी वैशिष्टय़े अशी विविधता असणारी ७० मॉडेल्स एकाच कारखान्यात तयार होतात. पण खरी गंमत पुढेच आहे. समजा, आज सकाळी नऊ वाजता तुम्ही या कारखान्यात फोन केलात आणि तुम्हाला नेमकी कशा प्रकारची मोटार हवी त्याचा तपशील दिलात (म्हणजे एकीचा आकार, दुसरीचे इंजिन, तिसऱ्या मॉडेलचा रंग, इ. इ.) तरी अवघ्या चार तासांत ही मोटार तयार होऊन तुमच्या ताब्यात दिली जाते. आणि ही मोटार बनवताना मूळ ५००० मोटारी तयार होतच असतात. त्यात कपात केली जात नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मोटारीकरता आवश्यक असणाऱ्या हजारो सुटय़ा भागांपैकी एकाचाही साठा टोयोटा कंपनीने आगाऊ केलेला नसतो.
हे कसे साध्य केले जाते? ही कल्पना सुचली कोणाला? कशी सुचली? याचा इतिहास मोठा रंजक आहे. जगातील सर्व उद्योगांत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या या संकल्पनेचा उगम अगदी साध्या घटनेतून झालेला आहे.
टोयोटा कंपनीचा संस्थापक साकीची टोयोडा याला कामावरून घरी परतायला रोज उशीर व्हायचा. घरी आला की तो थकलेला असायचा आणि जेवण थंडगार होऊन गेलेले असायचे. घरात त्याची आई होती. ती बिचारी वाट पाहून कंटाळून झोपी गेलेली असायची. हा घरी यायचा, टेबलवर झाकून ठेवलेल्या जेवणाचे चार घास कसेबसे पोटात ढकलायचा आणि झोपी जायचा. एक दिवस हा असाच उशिरा घरी आला, तर आई याची वाट पाहत जागी होती. हा काहीसा चक्रावला. हा घरात शिरताच तिने कोणत्याही प्रेमळ आईसारखी याला झापायला सुरुवात केली- ‘‘रोज उशिरा येतोस. धड जेवत नाहीस. प्रकृतीची हेळसांड. आणि इतक्या कष्टाने शिजवलेले महागडे अन्न वाया जाते. ते काही नाही, आता उद्यापासून तू घरी आल्यानंतरच मी स्वयंपाक करणार. तुला हवे तितकेच शिजवीन. अन्नाची नासाडी मी सहन करू शकत नाही.’’ आईचा राग शांत करण्याकरता साकीची टोयोडाने विषय हसण्यावारी नेला. तो म्हणाला- ‘‘फार लाडावून ठेवू नकोस मला. मी रोज नवनव्या पदार्थाच्या फर्माईशी करीन.’’ पण तीही आई होती. ती म्हणाली, ‘‘कर ना! रोज नव्या फर्माईशी कर. अध्र्या रात्रीसुद्धा काय मागशील ते करून घालीन. समजतोस काय तू आईला?’’
साकीची टोयोडा झोपायला गेला खरा; पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही. रात्रभर त्याच्या डोक्यात आईचे शब्द घुमत होते. पहाट होताच तो उठला. तडक कारखान्यात आला. आपल्या दोन सर्वात जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांना (ताईची ओहनो आणि शिएगो शेंगो) त्याने बोलावले आणि आईचा किस्सा सांगितला. ते दोघेही गोंधळले. साकीची टोयोडा हा उगा शिळोप्याच्या गप्पा मारणारा माणूस नाही. हा किस्सा सांगण्यामागे त्याचा काहीतरी हेतू असणार. पण तो हेतू त्यांच्या ध्यानात येत नव्हता. साकीची टोयोडा म्हणाला- ‘‘मी मागेन तो पदार्थ कोणतीही साठवणूक न करता, नासधूस, नासाडी न करता अध्र्या रात्री करून वाढण्याची माझ्या आईची तयारी आहे. तिला कोणत्याही पूर्वसूचनेची गरज नाही. आई जे स्वयंपाकाबाबतीत करू शकते, ते मला मोटारनिर्मितीत करून दाखवायचे आहे. ग्राहकाने पूर्वसूचना देण्याची गरज नाही. कोणत्याही सुटय़ा भागांचा साठा ठेवायचा नाही. नासधूस, नासाडी शून्य. आणि चार तासांत हवी ती मोटार ग्राहकाच्या हातात देता आली पाहिजे.’’
त्या तिघांनी हे आव्हान स्वीकारले. सर्व व्यवस्था, यंत्रणा, कार्यपद्धती मूळापासून तपासल्या, बदलल्या आणि अखेर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. किती वर्षे लागली या तिघांना याकरता? तब्बल ३० वर्षे! तीस वर्षे अविश्रांत मेहनत घेऊन त्यांनी हे स्वप्न साकार केले.
इतरांनी नंतर फक्त याची नक्कल करायचा प्रयत्न केला. ‘झीरो स्टॉक प्रॉडक्शन’ असे नामकरण केले तेही इतरांनीच. वास्तविक ‘झीरो स्टॉक’ (शून्य साठा) हा या पद्धतीचा परिणाम आहे. प्रत्यक्षात पद्धत वेगळीच आहे. या पद्धतीचे विश्लेषण करणारी, मर्म उलगडून दाखविणारी शेकडो पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. गंमत पाहा- यातील एकही पुस्तक जपानी माणसाने लिहिलेले नाही. सर्व पुस्तके अमेरिकन तज्ज्ञांची (?) आहेत.
पण खरेच आपल्या घरातील स्त्रियांकडून किती काय काय शिकण्यासारखे आहे! कोणत्या पदार्थाचा किती साठा करायचा, नासाडी कशी टाळायची, दर्जात सातत्य कसे टिकवायचे.. शेकडो गोष्टी त्यांच्यापासून शिकण्यासारख्या आहेत.
डॉ. एडवर्ड डेमिंग आपल्या भाषणात, लिखाणात अशी उदाहरणे नेहमी द्यायचा. तो सांगायचा- ‘‘एका क्षेत्रातील  काही चांगले असेल तर त्याचा वापर दुसऱ्या क्षेत्रात जरूर करा. पण असे अनुकरण करताना त्याचे नेमके मर्म समजावून घ्या. मर्म समजावून घेऊन जर अनुकरण कराल, तर अस्सलपेक्षा ही उत्तम नक्कल साधू शकाल.’’
दुर्दैवाने आज सर्व क्षेत्रांत आपण एखाद्या बाबीचं मर्म समजावून न घेता केवळ अंधानुकरण करतो आहोत. टोयोटाने मात्र असे केले नाही. म्हणूनच आज ती जगातील अग्रगण्य कंपनी आहे. अगदी अलीकडे घडलेली घटना.. आपल्या मोटारीच्या दर्जाविषयी शंका वाटली म्हणून टोयोटाने ग्राहकांना विकलेल्या मोटारी परत मागवल्या. किती मोटारी? तब्बल  दीड  कोटी मोटारी! टोयोटाच्या स्पर्धकांनी त्यांच्या गाडय़ांच्या दर्जावरून कंपनीविषयी आरडाओरडा केला. पण इतक्या मोठय़ा प्रमाणावर मोटारी परत मागविण्याचा प्रामाणिकपणा जगात किती कंपन्या दाखवतील?
टोयोटाची कार्यसंस्कृती पाहा- जेव्हा कंपनीला मोटारींच्या दर्जाविषयी शंका वाटली तेव्हा त्या मोटारी परत मागवण्याचा निर्णय एका क्षणात झाला. त्यावर दोन मिनिटेदेखील चर्चा झाली नाही.
अशा उदाहरणांचे अंधानुकरणदेखील कोणी करत नाही! माल विकून पैसे हातात येईपर्यंत ग्राहक देव! त्यानंतर कुत्ता जाने- चमडा जाने!
मर्म समजावून घेऊन अनुकरण करायला आधी मूळात कशाचे अनुकरण करायचे, हे तर नीट समजायला हवे!