मी तुतिंगला जाऊन आले! पण खरं सांगायचं तर तुतिंगला जाऊन आले हे सांगणं वाटतं तितकं साधं आणि सरळ नाहीए. कारण संदर्भाविना तुतिंग हे नेमके कुठे आहे, हे कुणाला कळणारच नाही. भारताच्या नकाशात  लहानशा टिंबाएवढं दिसणारं अरुणाचल प्रदेशमधील हे अत्यंत दुर्गम ठिकाण आहे. तिबेट आणि भारत यांच्या सीमारेषेवरील अगदी शेवटचं गाव. अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेली तशी भारत-चीन सीमारेषेवर आणखीनही बरीच गावं आहेत. पण तुतिंग माझ्या दृष्टीनं खास होतं. सियँग नदीच्या काठावर वसलेलं. अगदी चिटुकलं. घनदाट जंगलांनी वेढलेलं गाव. फक्त भारतीय लष्करी मंडळींनाच माहीत असलेलं. या गावाची वेस ओलांडूनच तिबेटमधून दोन हजार कि.मी.चा प्रदीर्घ प्रवास करून येणारी यारलुंग त्सँगपो ही नदी अरुणाचल प्रदेशच्या भूमीत भारतीय हद्दीत प्रवेश करते. माझ्यासाठी ही गोष्टच तिथवर धडपडत जाण्यासाठी पुरेशी होती. अर्थातच तुतिंग गावापासून ‘यारलुंग त्सँगपो’ भारतीय भूमीवर प्रवेश करते ती वेस साधारण १६-१७ कि. मी. दूर आहे. पण आपल्याला तिथवर जाता येत नाही. कारण तो भाग अत्यंत दुर्गम तर आहेच; पण ‘नो मॅन्स लँड’ही असल्याने तिथे जायला परवानगीही मिळत नाही. जायचेच झाले तर चालत जावे लागते.

यारलुंग त्सँगपो नदी या ठिकाणी ज्या भागातून वाहते तो भाग अतिशय दुर्गम आहे. घनदाट पर्जन्यवनाने व्याप्त असणाऱ्या हिमालयाच्या महाकाय पर्वतरांगा.. आणि खोल दरीतून वाहणारी सियँग.. पाचूच्या रंगाचं हिरवट निळं पाणी असणारी! सियॅंग म्हणजेच यारलुंग त्सँगपो! तुतिंगच्या पुढे भारतात वाहणारी ही नदी ‘सियँग’ नदी होते.

मला हिमालयाची प्रचंड ओढ वाटते. त्यातही हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या.. त्या जिथून उगम पावतात ते ग्लेशियर.. पाणथळी.. त्यांच्या उगमाबद्दलच्या वदंता.. या सगळ्याबद्दल अपार उत्कंठा असल्याने सदैव मी या माहितीच्या शोधात असते. आजकाल तर गुगलवर एका क्लिकवर सर्व माहिती क्षणार्धात उपलब्ध होत असल्यामुळे हवी ती माहिती मिळवता येते. कैलास-मानस यात्रा करून आल्यानंतर कैलास पर्वताच्या चारही बाजूंनी उगम पावणाऱ्या सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि करनाली (शारदा किंवा घांगरा) या नद्यांबद्दलची माहिती मी नेहमीच शोधत राहते. ब्रह्मपुत्रा नदीबद्दलची माहिती शोधत असताना मला तुतिंगबद्दल कळले. मग मनाशी ठरवलं- जेव्हा जमेल तेव्हा इथं जायचंच. दोन वर्षांपूर्वी एकटीनेच सप्त भगिनींना भेट देत मनसोक्त भटकून आले होते. पण नामदफा अभयारण्य आणि सियँग नदीच्या आजूबाजूचा प्रदेश पाहायचा राहिला होता. म्हणून ह्य़ांच्यासह या भागात जाण्याचा योग लवकरात लवकर आणवला. तुतिंगबद्दल हे अनभिज्ञच होते. पण यायला तयार झाले. आमची ट्रिप नेहमीच्या ओळखीच्या वाटेने नसते हे त्यांना माहीत असते.

यारलुंग त्सँगपो म्हणजेच आपल्या देशातील ब्रह्मपुत्रा नदी (खरं म्हणजे ‘नद’!) जगातील अनेकांना वेड लावून आहे. अनेक वेडे तिच्याबद्दलच्या शोधमोहिमांतून गुंतलेले असतात. गेल्या शतकात अनेकांनी ब्रह्मपुत्रेची माहिती जमवण्याकरता मोहिमा राबविल्या. अनेकांनी त्यांत आपले जीव गमावले. मात्र, तिच्यासंबंधीची संपूर्ण माहिती मिळवणे अद्यापि शक्य झालेले नाही. पृथ्वीवर जिथे माणसाचे पाऊल पडले नाही असा दुर्गम भाग बहुधा यारलुंग त्सँगपोच्या खोऱ्यातच आहे. १९२४ सालापर्यंत तिबेटमध्ये वाहणारी यारलुंग त्सँगपो म्हणजेच भारतातील ब्रह्मपुत्र नदी आहे, हेही लोकांना माहीत नव्हते. तिबेटमधील कैलास पर्वतशिखराच्या जवळील एका ग्लेशियरमधून उगम पावणारी यारलुंग त्सँगपो तिबेटच्या पठारावरून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जवळजवळ सतराशे कि.मी.चा प्रवास करते. मात्र, तिबेटच्या उत्तर-पूर्व टोकास आल्यानंतर ती अचानक दक्षिण दिशेला वळते. ट्रान्स हिमालयातील ‘नामचा बारवा’ (७७८२ मीटर्स) आणि ग्याला पेरी (७२३४ मीटर्स) या दोन बर्फाच्छादित शिखरांमधून वाट काढत, नामचा बारवा शिखराला पूर्ण वेढा घालून ही नदी हिमालयाच्या उत्तर-पूर्व रांगांमधून वाट काढत भारताच्या भूमीवर येते. यारलुंग त्सँगपो ही जगातील सर्वात उंचावरून वाहणारी नदी आहे. कारण तिबेटच्या पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची सरासरी १३ हजार फूट आहे. दक्षिण दिशेला वळणाऱ्या त्सँगपोमुळे नामचा बारवा आणि ग्याला पेरी या दोन महाकाय पर्वतशिखरांमध्ये एक प्रचंड मोठी घळ तयार झाली आहे. या घळीला किंवा गॉर्जला जगभरात ‘यारलुंग त्सँगपो ग्रँड कॅनियन’ म्हणून ओळखतात.

साधारणपणे २००२ सालापर्यंत या ग्रँड कॅनियनबद्दल जगाला फारशी माहिती नव्हती. पण आता ही ग्रँड कॅनियन जगातील सर्वात खोल घळ आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळमधून वाहणाऱ्या ‘काली गंडळी’ नदीची घळ जगातील सर्वात खोल (सुमारे ३००० मीटर) मानली जात होती. (काली गंडळी नदी नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतमाला आणि धौलगिरी पर्वतमाला या हिमालयाच्या मध्यवर्ती रांगांमधून वाहते.) मात्र, आज यारलुंग त्सँगपो नदीच्या प्रवाहामुळे नामचा बारवा शिखराभोवती तयार झालेली घळ ही पृथ्वीवरील सर्वात खोल घळ आहे. या ठिकाणी या घळीची जास्तीत जास्त खोली ६००९ मीटर असून, सर्वसाधारण सरासरी खोली २२६८ मीटर इतकी आहे. (सहा कि.मी. उंचीची घळ! कल्पनेनेच अंगावर काटा येतो ना?) अमेरिकास्थित कोलोरोडो येथील जगप्रसिद्ध ग्रँड कॅनियनपेक्षा यारलुंग त्सँगपो ग्रँड कॅनियन तिपटीने खोल आहे. ‘पे’ गावापासून सुरू झालेली ही घळ अंदाजे ५०४.९ कि.मी. लांबीची आहे. मात्र, नामचा बारवाभोवतीचा वेढा २०० कि.मी. लांबीचा असून तो सर्वात खोल आहे. या घळीची जास्तीत जास्त खोली ६००९ मीटर एवढी आहे. या घळीतील प्रवासाआधी समुद्रसपाटीपासून सुमारे १३ हजार फूट उंचीवरून वाहणारी त्सँगपो घळ संपेपर्यंत ६०० मीटर्स उंचीपर्यंत खालच्या पातळीवर येते. या प्रवासात फार उंचीचा धबधबा असेल, ही जगभरातील अनेक संशोधकांची गृहीत कल्पना मात्र खरी ठरली नाही. तरीही या संपूर्ण वाटेवर एक नाही, दोन नाही, तर चार धबधबे आहेत. पण ते साधारण ३५ ते ७० मीटर उंचीचे आहेत. यारलुंग त्सँगपो ग्रँड कॅनियनबद्दलची ही सर्व माहिती आज उपलब्ध आहे, कारण अनेक अयशस्वी मोहिमांनंतर २००२ साली सात कयाकर्सनी यारलुंग त्सँगपोच्या ग्रँड कॅनियनच्या प्रवाहात कयाकिंग करीत संपूर्ण घळ यशस्वीरीत्या पार केली. अत्यंत थरारक आणि जीवघेण्या अशा या साहसी मोहिमेमुळेच यारलुंग त्सँगपोच्या तिबेटच्या भूमीवरील अंतिम प्रवासाबद्दलची माहिती जगाला मिळाली. आजही या घळीदरम्यानच्या काही भागाबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. कारण अत्यंत दुर्गम अशा काही ठिकाणी माणसाने कधी पाऊल ठेवले असेल की नाही याबद्दलच शंका आहे. यारलुंग त्सँगपो नदीचा प्रवास हा असा रहस्यमय, गूढ आणि उत्कंठावर्धक भौगोलिक परिस्थितीतून होतो. आपल्यासारख्यांना निसर्गाच्या या रौद्र रूपाची कल्पनाही करणे शक्य नाही. या ग्रँड कॅनियनमधून प्रचंड वेगाने खळाळत उतारावरून खालच्या पातळीवर धाव घेत त्सँगपो नदी ज्या ठिकाणी भारतीय हद्दीत प्रवेश करते, त्या ठिकाणाला ‘तुतिंग’ म्हणतात. येथून पुढे तिची ओळख ‘सियँग’ म्हणून होते.

ब्रह्मपुत्रा नदीची तिबेटमधील ओळख, तिचे मानवी कल्पनेपलीकडचे अस्तित्व, तिच्या भौगोलिक स्थितीशी निगडित अनेक रहस्यमय, रंजक प्रवाद व दंतकथा वाचून माझे मन इतके प्रभावित झाले होते, की यारलुंग त्सँगपोचा ग्रँड कॅनियन पाहायला जाण्याची स्वप्नं मला पडायला लागली. अर्थातच तूर्तीस तरी हे स्वप्न सत्यात उतरणे अशक्य असल्याचे ठाऊक असल्याने निदान तुतिंगला तरी जायचंच असं मी ठरवलं होतं. म्हणूनच ‘पासीघाट’ या गावातून अरुणाचलमध्ये प्रवेश केला.

अरुणाचल प्रदेश म्हणजे आपल्या देशाचे पूवरेत्तर टोक. अत्यंत दुर्गम, पहाडी इलाखा. मागच्या अरुणाचल भेटीत तेथील लोकांच्या आडमुठेपणाचा कटु अनुभव आला होता. त्यामुळे तुतिंगपर्यंत कसे पोहोचायचे, हा मोठाच प्रश्न होता समोर. शिवाय मला ट्रॅव्हल कंपनीबरोबर प्रवास करायला आवडत नाही. पण तरीही साधारण माहितीनिशी प्रवासमार्ग ठरवला. दिब्रुगढपर्यंत (आसाम) मुंबईहून थेट विमानाने तासा- दीड तासात पोहोचलो. तिथून अरुणाचलचे एक टोक असलेले नामदफा अभयारण्य पाहिले. आणि पुन्हा दिब्रुगढला परत येऊन ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून ‘पासीघाट’ला जाण्यासाठी फेरीबोट घेतली. फेरीबोटीने आपण ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर उतरतो. हा प्रवास म्हणजेही एक आगळावेगळा अनुभवच होता. ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या बारीक रेतीतून सामानासकट चालणे अशक्यच असते. पलीकडे पोहोचल्यानंतर अरुणाचलमध्ये जाण्यासाठी आम्हाला टॅक्सी घ्यायची होती. पण टॅक्सीपर्यंत पोहोचणार कसे, तेच उमजेना. तेवढय़ात मराठी बोलणारे एक तरुण कुटुंब दिसले. पुण्याचा तो तरुण आर्मीमध्ये होता. बायको-मुलांना घेऊन पोिस्टगच्या ठिकाणी चालला होता. त्याने आम्हाला लिफ्ट दिली आणि ‘शिलापत्थर’ या आसाम-अरुणाचल सीमेवरील गावात सोडले. तिथून आम्ही पासीघाटला पोहोचलो. सियँग नदीच्या किनाऱ्यावर वसलेले पासीघाट हे अरुणाचलमधील बऱ्यापैकी मोठे शहर. पण हॉटेले वगैरे फारशी नाहीत. आम्हाला सर्किट हाऊसवर खोली मिळाली. आम्ही तुतिंगला जाणार असल्याचे कळल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटायचे. ‘कशासाठी तिकडे जाताय? तिथवर जाण्याचा त्रास सोसेल का? रस्ता खराब आहे. कशाला जाताय तिकडे..?’ हे व असेच उद्गार ज्याच्या-त्याच्याकडून ऐकायला मिळत होते. सगळेच जण आम्हाला तुतिंगला जाण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करत होते. पर्यटनाचा त्या भागात मागमूस नव्हताच. डिव्हिजनल कमिशनरच्या ऑफिसमध्ये माहितीसाठी गेले तर तिथेही तेच.. ‘तुतिंगला का जाताय?’ तिथल्या टुरिझम ऑफिसरने तर आम्हाला सरळसरळ तिकडे न जाता अलोंगला जा म्हणून सुचवले. एखादी सुमो जीप ठरवली तर काहीच्या काही भाडे सांगायला लागले. शेवटी मनाला मुरड घातली आणि ‘पासीघाट’ इथेच रात्र काढून दुसऱ्या दिवशी अलोंग या अरुणाचलमधील दुसऱ्या शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला. म्हणायला अंतर १२५ कि.मी.चे; पण संपूर्ण रस्ता घनदाट जंगलातून. वळणावळणाचा. हिरवंगार, घनगर्द वृक्षांनी व्यापलेलं, बांबू, वेत यांनी गच्च भरलेलं ते सदाहरित जंगल पाहून डोळे निवले. परंतु एखादा पक्षी वा एखादं जनावर (हरीण, लांडगा, कोल्हा वगैरे)- काही म्हणता काही दिसलं नाही. अरुणाचलचे आदिवासी सर्व काही मारून खातात. वाटेत अनेकजण बंदूक घेऊन सर्रास शिकार करताना दिसले. आदिवासींना कुणाचीही भीती वा बंधन नसते. त्यामुळे जंगलात पशुपक्षी असले तर ते खूप आतमध्ये असावेत. आम्हाला अख्ख्या प्रवासात एकही पक्षी दिसला नाही.

अलोंग हेसुद्धा डोंगराच्या कुशीत वसलेलं अरुणाचली गाव. तिथे मात्र आम्हाला तुतिंगला घेऊन जाण्यासाठी एक ड्रायव्हर तयार झाला. दिवसाचे चार हजार रुपयांप्रमाणे भाडे! आम्ही पहाटे पाचला प्रवासाला सुरुवात केली. वाटेत यांग कियाँग या मोठय़ा गावाजवळ सियँग नदी फेरीमधून ओलांडावी लागते. अलोंग ते यांग कियाँग हा संपूर्ण प्रवास नदीच्या काठानेच आहे. आधी काही काळ सिओम नदीच्या काठाने आहे. ही नदी सियँगला मिळते तो संगमही प्रेक्षणीय आहे. त्यानंतर आपण सियँग ओलांडून (ब्रिजवरून) पलीकडे जातो. यांग कियॉंगपर्यंतचा कमीत कमी पाच-सहा तासांचा प्रवास खडतर आहे. पण घनदाट जंगलाचं देखणं रूप आणि खोल दरीतून वाहणारी पाचूच्या रंगाची सियँग पाहताना मन हरखून जातं. तिच्या प्रवाहाचा वेग उंचीवरूनही चांगलाच जाणवतो. विशेष म्हणजे तिच्या किनाऱ्यावर कुठल्याच हालचाली नसतात. म्हणजे मासेमारी किंवा नावेतून प्रवास वगैरे. तिच्या प्रवाहाचा वेग आणि खोली यामुळे मनुष्य तिच्यापासून चार हात लांबच असतो असे जाणवले. इथल्या रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर वाटले- एवढी मोठी नदी वाहते आहे, तर तिच्यातून नावेने प्रवास केला तर किती सुखाचं होईल. पण तसा प्रयत्न कुणीही करत नाहीत. कारण सियँगचा प्रवाह खूप धोकादायक आहे. तिच्या खोलीचा अंदाज येत नाही, असं आमच्या ड्रायव्हरने सांगितले. तिच्या खोलीमुळेच तिचा प्रवाह नेहमी पाचूच्या रंगाचा दिसतो. कधी गडद हिरवा, तर कधी निळसर हिरवा. यांग कियाँग गाव बऱ्यापैकी मोठे आहे. पण आपल्याकडील शहरांच्या तुलनेत फारच लहान. या भागातील लोक सोयीसुविधांपासून वंचित आहेत. छोटी छोटी गावं. वीज नाही. धड रस्ते नाहीत. पावसाळ्यात धो-धो पाऊस कोसळतो. अशावेळी प्रवास अशक्यच. पण आजकाल या भागातही पावसाचं येणं मनमानी झालंय. केंद्र शासनानं दिलेला पैसा तळागाळापर्यंत पोचतो की नाही, कुणास ठाऊक. यांग कियाँगजवळ गाडीसह नदी ओलांडून पलीकडे जायचे होते. या ठिकाणी अगदी नदीच्या काठाशी जाता आले. दोन्ही बाजूंनी डोंगररांगांनी बंधनात ठेवलेल्या सियँगचा प्रवाह खोल खोल असून प्रचंड वेगानं वाहतो. पण या नदीचे रूप इतकं सुंदर आहे, की तिच्याबद्दल भययुक्त प्रेम वाटत राहतं..

दिवसभराच्या प्रवासानंतर अंधार पडता पडता तुतिंगला पोहोचलो. १६ तास प्रवास सुरू होता. तुतिंग हे गाव अगदी छोटंसं आहे. आर्मीचा मोठा कॅम्प आहे. बाकी वस्ती जेमतेम. पेट्रोल पंप नाही. वाटेतही कुठे नाही. पेट्रोल दीडपट भावाने घ्यावे लागते. तुतिंगच्या सर्किट हाऊसमध्ये राहण्याचे ठरवले होते. पण तिथल्या ऑफिसरने आधी कळवले नाही म्हणून रूम दिली नाही. गावात लाइट नव्हते. मग अंधारातच एकुलते एक हॉटेल (जुजबी सुविधा असलेले) शोधले आणि तिथं रात्र काढली. सकाळी तिथल्या एका सुंदर मॉनेस्ट्रीला भेट दिली. नंतर दोन-तीन कि.मी. अंतरावर सियँग नदीवर असलेला वायरब्रिज पाहायला गेलो. डाव्या बाजूने नदीचा प्रवाह तिबेटमधून येताना दिसत होता. पात्र विस्तीर्ण होते; पण दोन्ही बाजूंनी डोंगरकडांनी बंदिस्त होते. ढग आणि धुकं यामुळे डोंगररांगा निळसर दिसत होत्या. त्यापलीकडेच कुठेतरी नामचा बारवा शिखर आणि त्याला वेढणारी यारलुंग त्सँगपोची मोठी घळ होती. फार दूर नाहीच. पण कधीही न पोचता येण्याइतकी दूर.. दुर्गम.

तुतिंगला जाऊन मला फक्त ब्रह्मपुत्रा- म्हणजेच सियँग- म्हणजेच यारलुंग नदीचं आपल्या भूमीवर येणं पाहायचं होतं. ते पाहिलं आणि परत फिरलो. ड्रायव्हरला म्हटलं, ‘परत अलोंगसाठी निघूया. तुझे तीन दिवसाचे ठरलेले पैसे देऊ. पण आजच अलोंगला पोहोचव.’ वाटेत पुन्हा एकदा सियँगचे आगळेवेगळे अनादी सौंदर्य डोळ्यांत साठवीत १६ तासांहून अधिक प्रवास करून सुखरूप अलोंगला परतलो.

अरुणाचल प्रदेश आपल्या देशाच्या मुख्य भूमीपासून फार दूर आहे. पण तरीही तो आपलाच प्रदेश आहे. मात्र, इनरलाइन परमिट घेतल्याशिवाय तिथे जाता येत नाही. मात्र, निसर्गानं नटलेल्या अरुणाचलकडे सरकारनं लक्ष पुरवलं पाहिजे, हे नक्की!

सियँग नदी पासीघाटनंतर लोहित आणि दिहिंग नद्यांना मिळते आणि पुढे तिचा प्रवाह सपाट भूप्रदेशात येतो. या तीन नद्यांची मिळून ब्रह्मपुत्रा नदी बनते. आपल्या पुराणानुसार, ब्रह्मपुत्रा ही नदी नसून ‘नद’ आहे.. ब्रह्माचा पुत्र! या नदीचा प्रवाह पुढे इतका मोठा आणि विस्तारित होतो, की बहुतेक ठिकाणी तो दहा कि.मी. इतका रुंद आहे! पुढे ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये जाते आणि मेघना व पद्मा या नावांनी गंगेच्या प्रवाहात मिसळते. आता चीन सरकारने यारलुंग त्सँगपो ग्रँड कॅनियनवर धरण बांधायला घेतले आहे. त्याचा परिणाम भारत व बांगलादेशच्या पर्यावरणावर होईल अशी शक्यता आहे. तिबेटमधील पर्यटनादरम्यान आता ही घळ पाहायला मिळते असं कळतं. बघू- भविष्यात तिकडे जाता येतेय का..!

राधिका टिपरे

१ंँ्रि‘ं३्रस्र्१ी@ॠें्र’.ूे