तुम्ही कधी गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळलेली फुल साइझची छत्री पाहिलीय का? मी तर ती हातात धरून विमानप्रवास केलाय. हातात घ्यावी लागली, कारण ती सूटकेसमध्ये मावत नव्हती. हल्ली केवळ तेवीस किलो सामान विमानातून नेण्याची परवानगी असते. त्यामुळे बॅगांचा आकार आकुंचन पावलाय. पण आमच्या परिवारातल्या मंडळींचे आकार आकुंचन पावत नसल्यामुळे बíलनमधल्या स्थावर-जंगम प्रेक्षणीय स्थळांकडे पाठ फिरवून जम्बो साइझची छत्री शोधण्यासाठी अध्र्या-पाऊण दिवसाची आहुती द्यावी लागली.
तुम्ही म्हणाल, छत्रीच्या शॉिपगचं काय इतकं घेऊन बसलात! माझाही तसाच समज होता. पण धर्मपत्नीनं थेट एका महाकाय डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये धडक मारली. शंभर ग्रॅम मोहरी घेण्यासाठी दाणाबाजार गाठणाऱ्याही काही वल्ली असतात. हौस असते एकेकाची! तर- छत्र्या कुठे मिळतील, असं छत्री उघडण्याचा अभिनय करून विचारल्यावर काऊण्टरवरच्या सेविकेनं आकाशाकडे बोट वळवलं. वर पाहिलं. कोणत्या वस्तूंचा साठा कुठे केलाय, हे गुपित उलगडणारा लखलखता फलक दिसला. पाश्चिमात्य देशांमध्ये अर्थव्यवस्था मुक्त आणि ग्राहक हाच राजा! त्याचं जीवन उजळून टाकण्यासाठी तिथं अनंत वस्तू आणून ठेवल्या होत्या. फलकावर ‘यू फॉर अम्ब्रेला’ शोधून खुद्द छत्री विभाग हुडकण्यात अर्धा तास मोडला.
छत्री विभागात भरपूर छत्र्या होत्या. पण दुकानातर्फे एकही विक्रेता हजर नव्हता. बायकोनं एक गणवेशधारी छोकरा अचूक हेरला. तो म्हणाला, ‘ओपन शेल्फ सिस्टीम आहे. तुमच्या पसंतीची हवी ती घ्या.’
बायकोला तिच्या मावशीच्या पसंतीची छत्री हवी होती. पसंतीचे तपशील लिहून दिलेले होते : कापड फिक्कट, बॉटल ग्रीन आणि गडद शेवाळी यांच्या मधल्या शेडचं. त्याच्यावर अबोली रंगाचे नाजूक गुलाब. मूठ मोराच्या तोंडाची. फोिल्डगची नको. साइझ नीट बघून आण.
वामांगाकडून खुलासा आला- ‘मावशीच्या जावयानं सिंगापूरहून आणलेल्या छत्रीत तिचं फक्त डोकं मावतं. दोन्ही खांदे भिजतात. वारा आला की फोिल्डगची छत्री उलटते. बावळटच आहे!’
कोण बावळट? छत्री, मावशी की जावई? पण हे विचारायचं कोणी? मग ग्राहकराजानं ग्राहकराणीसोबत मान मोडून संशोधन केलं. वाकून वाकून राजा-राणीची कंबर भरून आली. छोटय़ा दुकानात ही मेहनत आम्हाला करावी लागली नसती. दुकानदारानं स्वत:च चटचटा माल दाखवला असता. इथं शेवटी तीन तासांच्या हातघाईनंतर शेवटच्या फळीवरच्या सांदीकोपऱ्यात मावससासूवांछित खजिना सापडला. हुश्श करून आम्ही खजिन्यासकट कॅश काऊण्टरवर गेलो.
संगणकाशी खाटखुट केल्यावर जर्मन कॅशिअर म्हणाली, ‘ही वस्तू तुम्हाला विकत घेता येणार नाही.’
म्हणजे तिनं हे इंग्रजीत भाषांतर करून सांगितल्यावरच समजलं. पहिल्यांदा ती हे जेव्हा जर्मन भाषेत म्हणाली तेव्हा बायको खेकसली, ‘बघत काय बसलात वेंधळ्यासारखे तिच्या थोबाडाकडे? या छत्रीवर फ्री गिफ्ट आहे ती घेऊन या, असं सांगतेय ती.’
भाषांतर कानावर पडताच बायको म्हणाली, ‘बघा. ही छत्रीच फुकट मिळतेय.’
‘काहीच विकत न घेता फुकट कशी देतील?’
‘बाय वन गेट वन फ्री स्कीममधली असणार. आपल्या आधी कुठल्यातरी मूर्खानं एक छत्री घेतली आणि त्यासोबतची दुसरी फ्री घ्यायला विसरला असणार. आपलं नशीब जोरात आहे आज.’  
कॅशिअरनं कपाळावर आठय़ा चढवत भाषांतर रिपीट केलं. मी विचारलं, ‘का विकणार नाही?’
‘कारण ही वस्तू आमच्या सिस्टीममध्ये दिसत नाही.’
‘पण नजरेसमोर तर दिसतेय ना?’ बायकोनं छत्री उंचावून तिच्या डोळ्यांपुढे मोर नाचवला.  
‘पण आमच्या सिस्टीमनुसार ती दुकानात नाही.’
‘असं कसं? ही काय, दुकानातच तर आहे!’
‘सॉरी! नेक्स्ट कस्टमर प्लीज.’
‘नसेल तुझ्या कॉम्प्युटरमध्ये तर त्या शेल्फवर किमतीचं लेबल आहे ते तू स्वत: जाऊन वाचून ये.’
‘पण ती जोवर स्क्रीनवर येत नाही तोवर मी बिल बनवू शकत नाही, तुम्ही पसे देऊ शकत नाही आणि ही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही.’  
तीन तासांची मेहनत वाया गेली. मी ढेपाळलो. बायको संतापली. ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडली जाताच कॅशिअरनं बेल दाबली. मला वाटलं, आता पोलीस येणार. पण समोरून एक प्रशस्त आत्याबाई आली. छातीवरच्या नेमप्लेटकडे बोट वळवून म्हणाली, ‘आय अ‍ॅम बर्नी. स्टोअर सुपरवायझर.’
समस्येचं आकलन झाल्यावर बर्नीआत्यानं पलीकडच्या एका संगणकाशी झटापट केली आणि भाचीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.. ‘ही वस्तू आमच्या स्टॉकमध्ये नाही. तुम्ही दुसरी छत्री पसंत करा. पण मला वाटतं की, तुम्ही रेनकोटच घ्यावा. म्हणजे तुमचे दोन्ही हात मोकळे राहातील.’
मग मीही ईरेला पेटलो. ‘आम्हाला हीच छत्री हवी. कॉम्प्युटरवर जमत नसेल तर हातानं बिल बनवा.’
बर्नीनं प्रस्ताव फेटाळला. ‘इथलं सगळं कामकाज आता कॉम्प्युटरबरहुकूम चालतं. हातानं बिल बनवण्याची परवानगी नाही.’
‘मग तुमचा कॉम्प्युटर नीट तपासा. तोवर थांबतो आम्ही.’
‘सोमवापर्यंत थांबावं लागेल. सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर वीकएंडला नसतो. ’
‘मग तुमच्या मॅनेजरला बोलवा. त्याला तरी दुकानात असलेली वस्तू विकण्याचा अधिकार असेल ना?’
बर्नी तडफेनं उत्तरली, ‘नाही. नियम म्हणजे नियम. तो मोडण्याचा अधिकार कोणालाच नाही.’
कलियुग संपून संगणकयुग चालू झाल्यापासून मानवी अक्कल चालवून निर्णय घेण्याची क्षमता संपुष्टात येतेय. मी तडक मॅनेजरकडे गेलो आणि विचारलं, ‘कमाल आहे. तुमचा कॉम्प्युटर तुमच्या-आमच्या सोयीकरता आहे की आपण कॉम्प्युटरच्या गुलामीत आहोत?’
तो धास्तावून म्हणाला, ‘अरे देवा! सिस्टीममध्ये व्हायरस घुसला की काय? म्हणजे आता बाकीचाही स्टॉक तपासावा लागेल. सिस्टीम क्रॅश होण्यापूर्वी तुम्ही पटकन् रेनकोट घेऊन टाका. ’
‘त्यापेक्षा ही छत्रीच देऊन टाका की! म्हणजे आम्ही सुटलो. अन् तुम्हालाही उगीच स्टॉक चेकिंग करायला नको.’
‘पण बिल बनल्याखेरीज क्रेडिट कार्ड कसं घेता येणार? दोन्ही सिस्टीम एकमेकांशी जोडलेल्या आहेत.’
‘बिल कोणाला हवंय? कॅशमध्ये पसे घ्या की!’
‘कॉम्प्युटरमधून बिल तयार झालं नाही तर कॅश रजिस्टरचा खणच उघडत नाही. माझा नाइलाज आहे. सिक्युरिटी सिस्टीमच तशी बनवली गेली आहे.’
हताश होऊन आम्ही बाहेर पडलो. संध्याकाळी हॉटेलच्या मॅनेजरशी सल्लामसलत केल्यावर तो म्हणाला, ‘जवळच ‘पॅटल्स’ नावाचं एक दुकान आहे. नक्की काय हवंय, ते दुकानमालकाला सांगा. त्याच्याकडे नसलं तर तो एक-दोन दिवसांत आणून देईल.’
परेशभाई पटेलनं अगदी हवी तश्शी चिनी छत्री सोमवारी संध्याकाळी आणून दिली. सोबत गिफ्ट पेपर फ्री!