‘चष्मा’ हा मानवाने दृष्टिदोष दूर करण्याकरिता रोजच्या वापरासाठी, तुलनेने कमी खर्चात बनवलेले साधन आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळिशीनंतर चष्मा वापरायची गरज निर्माण होई. त्यामुळे त्याला ‘चाळिशी’ असेही उपनाम मिळाले. चाळिशी म्हणजे तारुण्य संपले असे समजून लग्नाच्या बाजारात ‘चष्मा असलेली मुलगी नको’ अशा जाहिरातीही केल्या जात.
कालांतराने चष्मा या गोष्टीकडे बघण्याचा लोकांचाच दृष्टिकोन बदलला. त्यानंतर ही चाळिशी शाळकरी मुलांच्या नाकावरही दिसू लागली. पूर्वी लग्नाच्या बाजारात मुलींची अडचण ठरणारा चष्मा सध्या मुलींमध्ये ‘स्पेक्ट्स’ नावाने स्टाईल स्टेटमेंट ठरलाय. चष्मा आता विशेषण, वृत्ती-प्रवृत्ती दाखवणारं साधन म्हणूनही प्रसिद्ध झालाय. उदा. ‘काले चष्मेवाले’ किंवा ‘तुम्ही तुमचा चष्मा बदला..’ इ. इ.
सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने विविध राजकीय पक्ष, नेते, विश्लेषक यांना या ना त्या कारणाने ‘दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना ‘चष्मा’ या शब्दाचा वापर करावा लागतो. राजकारणात स्थिरस्थावर, वृद्धजर्जर झालेल्या पक्षांपासून तरुण, तेजतर्रार नवनिर्माणापर्यंतचे अनेक पक्ष आहेत. एखाद्याचा नंबर वर्षांनुवर्षे तोच राहावा तसे या पक्षांचे ‘दृष्टिकोन’- पर्यायाने ‘चष्मे’ फ्रेमसह परिचित झालेत.
मात्र, भारतीय राजकारणात नव्याने आलेले, भ्रष्टाचार निर्मूलन, व्यवस्था परिवर्तन, उद्योगपतींनी विकत घेतलेले पक्ष नेस्तनाबूत करण्यासाठी आलेले, भ्रष्टाचार निर्मूलन महामहोपाध्याय अण्णाजी हजारे यांनी बहिष्कृत केलेले, स्वयंघोषित ‘आम आदमी’ अरविंद केजरीवाल यांनी सर्व नेत्रतज्ज्ञांना देशोधडीला लावण्याचा पणच केलेला दिसतो. अर्थात हे नेत्रतज्ज्ञ राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टी तपासणारे आहेत.
अण्णा हजारे यांच्या ‘जंतरमंतर’वरील त्या प्रसिद्ध आंदोलनात अण्णा, किरण बेदी, प्रशांत भूषण यांबरोबरच अरविंद केजरीवाल प्रथम जनतेला माहीत झाले. अण्णा, किरण बेदी तशी प्रकाशझोतातली माणसे. भूषण पिता-पुत्र हे जेठमलानी पिता-पुत्राप्रमाणे दिल्लीच्या कायदेवर्तुळातील परिचित नाव (आणि ‘जेठमलानीज्’ इतकेच उपद्व्यापीही!). यात अरविंद केजरीवाल यांनी मात्र हनुमानाची भूमिका घेतलेली. त्यांच्या साध्या पॅण्ट-शर्टवर साधा स्वेटर, पायात साध्या चपला याचे कुठल्याही गोष्टीचे केव्हाही अप्रूप वाटणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी त्यावेळी पडदा फाटेस्तोवर कौतुक केलेले. तेच या आंदोलनामागचा ‘ब्रेन’ आहेत, असेही नंतर सांगितले जाऊ लागले. आणि लवकरच अरविंदजींनी ते खरे करून दाखवले.
लोकपाल आंदोलनात सर्व राजकीय पक्षांना ‘चपले’प्रमाणे बाहेर ठेवणाऱ्या या आंदोलनातून बाहेर पडून केजरीवाल यांनी ‘आम आदमी पार्टी’ म्हणजे ‘आप’ हा नवा राजकीय पक्ष काढला. अण्णा हजारे, किरण बेदी त्यापासून दूर राहिले, तर अंजली दमानियांपासून अनेक लोक त्या पक्षात सामील झाले. यात वेगळे नाव होते योगेंद्र यादव यांचे. अण्णांचे शिष्य म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचे मत बाजूला ठेवत, पण त्यांचा आदर करत राजकीय पक्ष काढलाच. आधुनिक द्रोणाचार्यास आधुनिक एकलव्याने अंगठा न देता अंगठा दाखवला.
त्यानंतर अरविंद केजरीवाल यांची गाडी भरधाव सुटली. लोकपाल आंदोलन सुरू झाल्यावर ‘हा कोण केजरीवाल?’ यावर आपल्या राजकीय अनुमान संस्कृतीतील पहिल्या धडय़ाप्रमाणे ‘तो संघाचा माणूस’ असा संशय व्यक्त केला गेला. नंतर तो भाजप प्रायोजित आहे असा गवगवा झाला. पण पुढे केजरीवाल भाजपवरही झाडू चालवायला लागल्यावर आतून खूश असलेले संघ-भाजपही सावध झाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सेफोलॉजिस्टसकट सर्वानी ‘आप’ला कच्चा लिंबू ठरवले होते. पण केजरीवाल का जादू (की झाडू?) चल गया आणि दिल्लीत काँग्रेस नामशेष झाली, तर भाजपच्या तोंडचा सत्तेचा घास काढून घेतला गेला. आणि विश्लेषकांसह राजकीय पक्षांच्या झोपा उडाल्या! डावी आघाडी, उजवी आघाडी, तिसरी आघाडी, चौथा पर्याय या सर्वापलीकडे जाऊन ‘आप’ उभा ठाकला.
यानंतर अरविंद केजरीवाल यांनी विशिष्ट कोनातून चालायला नकार देतानाच नागमोडी वळणांना लाजवेल अशी वळणे घेतली. दिल्लीत कुणाचाच पाठिंबा घेणार नाही, विरोधी पक्षातच राहू, पुन्हा निवडणुकांना सामोरे जाऊ, आम्ही इथे सत्तेसाठी नाही, तर ‘व्यवस्था परिवर्तना’साठी आलोय, असे सांगत सांगत त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवले. त्यावर ‘तुम्ही काँग्रेसचा पाठिंबा कसा घेतला?’ या सवालावर त्यांचे उत्तर : ‘आम्ही कुठे घेतला? त्यांनी दिला.’ अशा रीतीने त्यांनी राजकीय निर्णय लग्नाच्या अहेराच्या पातळीवर आणला.
पुढे त्यांनी हीच आपली शैली बनवली. प्रत्येक वेळी ‘मला कुठे सत्ता हवी? मला मुख्यमंत्री नाही व्हायचे, पंतप्रधान नाही व्हायचे, मला व्यवस्था बदलायचीय..’ असं ते म्हणत राहिले. राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटसारखी केजरीवालांची ‘व्यवस्था’ हे एक गूढच आहे. केजरीवाल आता वेड पांघरून पेडगावला जायच्याही पलीकडे गेलेत. ते काय पांघरतील नि कुठे जातील, हे सीआयएलाही कळणार नाही, इतका त्यांचा भोवरा गरगरवणारा आहे. योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासारख्या संघटनात्मक लोकशाही मानणाऱ्या आणि विचारपूर्वक मांडणी करणाऱ्या लोकांना केजरीवाल पक्षप्रमुख म्हणून सहन करणे आणि त्यांच्या अराजकी कृतींचे समर्थन करणे दिवसेंदिवस कठीण जाणार आहे. केजरीवाल बदलू पाहणारी ‘व्यवस्था’ नेमकी कुठली, हे निदान त्यांना तरी माहीत असेल अशी वेडी आशा करायला काहीच हरकत नाही.
लोकपाल आंदोलनापासून केजरीवालांना इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया यांचे सामथ्र्य जसे कळले तसेच त्यांचे उपद्रवमूल्यही कळले. इलेक्ट्रॉनिक मीडियाला सनसनाटी हवी असते. तर सोशल मीडियाला कुणीतरी कुणालातरी नागवे करतोय हे ज्याम भारी वाटते. पाकीटमाराला पकडलेल्या गर्दीत एरवी झुरळही न मारणारे हात धुऊन घेतात तसे या सोशल मीडियावर घरबसल्या तत्त्वज्ञान झोडण्यापासून कमरेखालचे शेरे, विनोद काही सेकंदांत जगभर पसरवून प्रसंगी ‘विकृत’ आनंद घेणाऱ्यांची प्रवृत्ती वाढती आहे. (या दोन्ही माध्यमांचा सकारात्मक वापरही होतो. पण त्याचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे.) केजरीवाल या दोन्ही माध्यमांना योग्य ते खाद्य पुरवतात.
केजरीवालांच्या मुलाखती म्हणजे आटय़ापाटय़ा असतात. त्यात थेट उत्तर नसते. कशाचेही समर्थन असते. आपण किती ‘परोपकारी गोपाळ’ आहोत, हा भाव कायम चेहऱ्यावर. त्यांच्या मुलाखतीमधील प्रश्नोत्तरे साधारण पुढीलप्रमाणे असतात.
प्रश्न : तुम्ही काँग्रेसचा पाठिंबा घेतलात..
उत्तर : आम्ही घेतला नाही, त्यांनी दिला.
प्रश्न : तुम्ही निवडणुकीआधी खूप आश्वासने दिली होती..
उत्तर : त्यातली बरीच पूर्ण केली. वीज दरकपात, वाढीव पाणी, इस्पितळांत औषधे, पोलिसांनी पैसे खाणे कमी केले. वाहन परवान्यातला भ्रष्टाचार थांबला..
प्रश्न : तुम्ही जनलोकपाल बिल मांडताना घटनात्मक गोष्टी पाळल्या नाहीत..
उत्तर : कुठल्या गोष्टी? घटनेत कुठे असे लिहिलेय? मी वाचलीय घटना. घटनेत असे कुठेही लिहिलेले नाही..
प्रश्न : पण घटनातज्ज्ञही म्हणताहेत..
उत्तर : तज्ज्ञ काय म्हणतात, यापेक्षा घटनेत काय लिहिलेय, हे महत्त्वाचे.
तरीही पत्रकार ‘घटना, घटनात्मक’ करत राहिला तर केजरीवालांचे ठरलेले अस्त्र बाहेर काढतात. ते थेट त्या पत्रकाराला विचारतात : तुम्ही घटना वाचलीय? ते कलम माहितीय? तुम्ही पाहिजे तर पुन्हा वाचा नि माझ्याकडे या!
आता इलेक्ट्रॉनिक मीडियातला पत्रकार घटना वाचून पुन्हा येईल, हे म्हणजे अडवाणींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यासारखे होईल, हे केजरीवाल चांगलेच जाणतात. अशा जुगलबंदीने त्यांचा दर्शक व ‘नेटकरी’ खूश होतो, हेही त्यांना माहीत असेल.
फार पूर्वी दूरदर्शनवर इ/ह जमान्यात ‘जनवाणी’ नावाचा कार्यक्रम विनोद दुआ सादर करीत. सरकारी माध्यम असून मंत्र्यांना अडचणीत आणणारे प्रश्न दुआ शांतपणे, प्रसंगी समोरच्याला डिवचत विचारीत. तेव्हा विनोद दुआ असेच हीरो झाले होते. आज प्रश्न तेच आहेत, राजकारणीही तेच आहेत. त्यावेळचे हीरो विनोद दुआ कुठल्याशा वाहिनीवर ‘इंडिया का जायका’ नावाचा कार्यक्रम सादर करतात.. म्हणजे भारतातले रसनावैविध्य! प्रशांत दामलेंच्या ‘आम्ही सारे खवय्ये’सारखेच हे प्रकरण. प्रणव रॉयच्या बरोबरीने वावरणारे विनोद दुआ आज ‘कहाँ गए वो लोग’च्या यादीत आहेत!
सध्याच्या कमालीच्या निराशाजनक, अराजकसदृश पर्यावरणात केजरीवालसारखा काजवाही सूर्य भासू लागतो, यावरून समर्थ पर्यायाची निकड लक्षात यावी. हजारेंसकट या मंडळींनी काही आशा निर्माण केली होती. पण हजारेंसकट केजरीवालांनी त्यावर पाणी टाकले.
आज केजरीवाल काय बोलताहेत? तर काँग्रेस, भाजप मुकेश अंबानींनी विकत घेतलेत. हा देश मुकेश अंबानी चालवतात. दुसरीकडे कॉपरेरेटना माझा विरोध नाही, काही चांगले उद्योजकही आहेत, असंही ते म्हणतात. म्हणजे आयएसआयसारखे केजरीवाल मार्क असेल तर स्वच्छ, शुद्ध, पारदर्शी उद्योग! साध्या घरात राहतो सांगून पाच बेडरूमचे दोन बंगले स्वत:च पत्र लिहून मागायचे? कायदा मोडणाऱ्या मंत्र्याच्या बाजूने उभे राहताना ‘मंत्र्याने रात्री फिरू नये, कुठे गुन्हा होत असेल तर जाऊ नये, पोलिसांना आदेश देऊ नयेत, जागेवरच न्याय करू नये, असे कुठे लिहिलेय? आम्ही मंत्री, मुख्यमंत्री, सचिवालय.. सगळेच आम्हाला वाटेल तसे चालवू. आम्ही तेच करायला आलोय. मुख्यमंत्र्यांनी धरणे धरू नये, रात्री रस्त्यावर झोपणे यात घटनाबाह्य काय? रस्त्यावर बसून फायलींचा निपटारा केला तर त्यात बोंबाबोंब कशाला? आम्ही कुठे निवडणुका लढतोय? लोक लढवताहेत. आम्ही कुठे मंत्री, मुख्यमंत्री झालो? लोक झाले! मला पंतप्रधान नाही व्हायचे, पण लोकांना वाटत असेल तर लोक करतील. लोक ठरवतील. मी साधा माणूस आहे. मला काही नको. सामान्य माणसाला द्या. माझी विचारसरणी विचारू नका. माझे धोरण विचारू नका. पक्षसंघटन विचारू नका. संस्थापक, उमेदवार, प्रचारक, प्रवक्ता यातला फरक विचारू नका. आमचे काही चुकत नाही. तुम्हीच आमच्याकडे चुकीच्या पद्धतीने बघता. तुम्ही तुमचा चष्मा बदला. काँग्रेस, बीजेपीच्या चष्म्यातून बघू नका. कारण त्यांना अंबानीने चष्मा दिलाय. मला साधा आम आदमीचा चष्मा हवाय. ’
यू-टय़ूबने केजरीवालांच्या चष्म्याच्या आतले डोळे आणि त्या डोळय़ांतले भिंग लोकांसमोर ठेवलंय. केजरीवाल मात्र म्हणतात, त्यात काहीच वावगे नाहीए! आपने आता ‘झाडू’प्रमाणे केजरीवाल चष्मेही वाटावेत!
शेवटची सरळ रेघ : हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक अजित विशिष्ट शैलीमुळे मिमिक्री आयटममधले एक अनिवार्य पात्र झाले. त्यांच्या नावावरचे खास त्यांच्या स्टाईलमधले संवाद प्रसिद्ध झाले. परवा राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीविरोधातही उमेदवार उभे केले. ते वाचून वाटले, राज ठाकरे महायुतीच्या पांडवांना अजित स्टाईल म्हणताहेत : मैं तुम्हें लिक्विड ऑक्सिजन में डाल दूँगा.. लिक्विड तुम्हें जीने नहीं देगा, ऑक्सिजन तुम्हें मरने नहीं देगा!