साधारणत: १९४० चे दशक हे नवकथेचे दशक मानले जाते. या दशकात मराठी कथापरंपरेत मूलगामी परिवर्तन घडले. गंगाधर गाडगीळ, अरिवद गोखले, पु.भा.भावे, व्यंकटेश माडगूळकर आदी कथाकारांनी या काळात लिहिलेली कथा नवकथा ठरली. या कथेपूर्वीची सर्वात महत्त्वाची कथा वामन चोरघडे यांची मानली जाते. ही कथा खऱ्या अर्थाने लघुकथा आहे. दीर्घत्व हे त्यांच्या कथेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे त्यांनी लिहिलेली वैशिष्टय़पूर्ण लघुकथा त्यांच्याबरोबरच संपलेली आहे. जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक lok20कथांचे हे दोन भागातले संपादन नुकतेच प्रकाशित झाले आहे. चोरघडे यांनी आपल्या सात कथासंग्रहांमधून जवळपास १५० कथा लिहिलेल्या आहेत. यापकी त्यांच्या निवडक कथांचे या दोन भागांत संपादन केलेले आहे. यातील त्यांच्या कथा आजही अनेक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
तत्कालीन रंजक किंवा बोधवादी कथेच्या प्रभावाखाली येऊन चोरघडे यांनी कथा लिहिलेली दिसत नाही. तिला मानवी जीवनाचे विविध स्तरावरील दर्शन घडवण्याची आस आहे. चोरघडे मानवीमूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन कथेतून घडवतात. मानवाचे मूलभूत भाव टिपणाऱ्या त्यांच्या अनेक कथा या संपादनात आहेत. प्रेम, राग, लोभ, मत्सर, जिज्ञासा या भावनांबरोबरच मानवी जीवनाच्या तळस्पर्शी जाणिवा टिपण्याचे विलक्षण सामथ्र्य चोरघडे यांच्या कथेमध्ये आहे. फडके-खांडेकरांच्या बरोबरीने परंतु स्वतच्या स्वतंत्र वाटेने जाणारी चोरघडेंची कथा अनेक दृष्टीने महत्त्वाची ठरते. रंजन, ध्येय आणि बोधवादात आकंठ बुडालेली तत्कालीन कथा चोरघडय़ांना कधी जवळची वाटली नाही. याचे कारण जीवनातील अंतिम सत्याचा शोध हे त्यांचे ध्येय होते.
१९३२ च्या दरम्यान लिहिलेली त्यांची ‘अम्मा’ ही पहिली कथा या संकलनात आहे. या पहिल्या कथेपासूनच जीवनातील सत्याचा शोध ते सुरू करतात. ही कथा म्हणजे बालमनात त्यांच्या मनावर झालेला श्रमाचा संस्कार आहे. कडाक्याच्या थंडीत काम करणाऱ्या अम्माला पाहून लेखक अंतर्मुख होतो. अम्मामुळे त्याला कळून चुकते की, कष्टणाऱ्यांपुढे थंडी, ऊन, वारा शरण येतात. त्यामुळे या गोष्टींपासून बचावण्याचे रिकामटेकडय़ांचे फाजील लाड ते सोडून देतात. अशा वरकरणी छोटय़ा प्रसंगांतून त्यांची कथा आकार घेत जाते. स्वाभिमान हा त्यांना आकर्षति करणारा गुण ते अनेक कथांचा विषय करतात. प्रचंड कष्टाळू, गरीब हमाल, कामकरी, आदिवासी स्त्रिया, शेतकरी यांच्या स्वाभिमानी जीवनाचा वेध ते कथेतून घेतात. या दृष्टीने त्यांची ‘सव्वापाच आणे’ ही कथा वाचनीय आहे. गरिबीतही फुकटचे काही न स्वीकारणारा हमाल त्यांना कथेचा विषय करावासा वाटतो. ‘समुद्राचे पाणी’ या कथेतील पोटासाठी मुंबईकडे निघालेला प्रवासी दोन दिवस उपाशी राहूनही चोरी करू धजत नाही. उलट जेवण देणाऱ्या सहप्रवाशाला तो म्हणतो, ‘साहेब, सुखी राहो तुमची घरधनीण; पण मला ते खाण्याचा हक्क नाही. इतक्या उमरीत मी कधी दान घेतलं नाही. हात आहेत तोवर भिक्षा मागणार नाही. रागावू नका. देव तुम्हाला सुखी ठेवील!’ त्यांचे हे सांगणे एखाद्या निरागस बालकाप्रमाणे आहे. ही निरागसता पाहून मुंबईत याचे काय होईल याची चिंता सहप्रवासी करतो. तो म्हणतो, ‘उंचावरून कोसळणारी नदी पर्वतांच्या दऱ्यांत पुष्कळदा लुप्त होते.’ मुंबईच्या अफाट समुद्रात तसे याचे होईल या अभद्र विचाराने तो अंतर्मुख होते. काव्यात्म अनुभूती देणारी ही कथा चोरघडे यांच्या कथालेखनाचे सामथ्र्य अधोरेखित करते.
विषयवैविध्यता हा त्यांच्या कथालेखनाचा विशेष असल्याने त्यांची कथा जीवनाचे सांदीकोपरे धुंडाळताना दिसते. बालमनाचे, निसर्गाचे, प्राणीसृष्टीचे, कष्टकऱ्यांचे मोठे विलोभनीय भावविश्व ते साकारतात. बालमनाचा तळ शोधताना ते तितकेच लहान होतात. ‘काचेची किमया’, ‘आणभाक’, ‘पोर’, ‘कुसुमाची पहिली लघुकथा’ यांसारख्या कथा वाचताना याचा प्रत्यय येतो. बालमन निरागसतेने अनेक खेळ खेळत असते. प्रत्येक गोष्टीविषयीच्या त्याच्या म्हणून काही कल्पना असतात. या मनाला जीवनातील वाईटाचा अद्याप स्पर्श नसतो. त्यामुळे या वयात जीवनात आलेली जुलिया ‘काचेची किमया’ या कथेत हे बालमन कशा प्रकारे व्यापून टाकते आणि विरहाने भावव्याकूळ झालेल्या अबालमनाला हळवे बनवते हे चोरघडे बालमनात डोकावून लिहितात. अशाच चंचल परंतु निष्कलंक हृदयाची स्पंदने ते ‘पोर’ या कथेमध्येही टिपतात.
चोरघडे यांच्या कथाविश्वाचा मोठा भाग स्त्रीविषयीच्या भावविश्वाने व्यापलेला आहे. स्त्रीकडे पाहण्याची त्यांची म्हणून एक दृष्टी आहे. बालमनाप्रमाणे स्त्रीचे मनही ते तिच्या अंत:करणाने समजून घेतात. त्यांच्या या भावविश्वात लहान मुलींपासून वृद्धेपर्यंतची स्त्री येते. त्यामुळेच कष्टकरी स्त्रिया, संसारी, कुमारिका, शाळकरी अशा अनेक स्त्रिया त्यांच्या कथेत दिसतात. व्यक्त न करता येण्यासारखी अनाम दुखे झेलणाऱ्या lr21स्त्रिया जीवनसंघर्ष कसा करतात, त्यांच्या वाटय़ाला आलेले दुख त्या कशा झेलतात ते ‘रात्रिरेव व्यरंसीत्’ या लघुकथेतून दाखवतात. किरकोळ स्वरूपाच्या संवादातून साकारलेली ही कथा स्त्रीच्या भावविश्वाचा ठाव घेते, तर ‘विहीर’ कथेतील स्त्रीचे भागधेय वाचकाला भावव्याकूळ बनवते. ‘विहीर’ हे स्त्रीचे प्रतीक आहे. तळाचा ठाव न घेता येणारे स्त्रीचे जीवनदर्शन ते या कथेतून घडवतात. दूरून विहिरीजवळचे दृश्य विलोभनीय वाटते. ही विहीर ‘फुलाफळांनी लवलवलेल्या निरनिराळ्या वेलींची चिरण’ वाटते, परंतु जवळ गेल्यास ‘कुणाचेही जीव घ्यायला सोकावलेली, तोंड न बांधलेली अशी ती एक विहीर आहे आड दडलेली’. ही आड दडलेली विहीर म्हणजे स्त्रीच्या वाटय़ाला आलेले जीवन आहे. ज्यातून ‘त्या बिचाऱ्या खोल खोल घागरी टाकून जपून जपून जीवन ओढताहेत’. काव्यात्म अनुभूती देणाऱ्या या कथेतील ही वाक्ये स्त्रीचे दुख नेमकेपणाने मुखर करतात. कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून होणारी मानहानी सांगत या स्त्रिया आपले मन मोकळे करतात. घरातील सारी कर्तव्ये, जबाबदाऱ्या स्त्रीच्याच वाटय़ाला येतात. त्यातून त्यांचे स्वातंत्र्य हरवते, मनाची आणि शरीराची फरफट सुरू होते. तलावावरील खळबळत्या पाण्यात सावल्या हालत राहतात. त्याप्रमाणे जीवनात जाणूनबुजून पाऊल घालून स्वतचे अस्तित्व अस्थिर करून घेतल्याचे चित्र ते ‘तलाव’ या कथेतून मांडतात. या तलावात कपडे धुण्यासाठी आलेली प्रत्येक स्त्री म्हणजे दुखाचे प्रतीकच. हे स्त्रीचे दुख आजही संपलेले नाही; म्हणूनच चोरघडेंची बहुतांश कथा समकालीन वाटते.
जीवनातील नानाविध प्रश्नांना चोरघडे यांची कथा सहजतेने भिडते. झुंजतेही. आपल्या जीवनात वस्तूचे मूल्य ठरवणारे निकष आपण तपासून पाहिले पाहिजेत याचे सूचन ते काही कथांच्या माध्यमातून करतात. त्या दृष्टीने त्यांची ‘वस्तूचे मूल्य’ ही कथा पाहण्यासारखी आहे. फुले आणि फुलमाळी यांच्या माध्यमातून ते एक मानवी मूल्य साकारतात. ते साकारण्यासाठी ते कथेची मांडणी अशी करतात की वाचक अंतर्मुख बनतो. मानवी मूल्यांवर लिहितानाही त्यांची कथा तत्त्वचच्रेत अडकत नाही; तर ती कलात्मकच होताना दिसते. ‘कला..जीवन’ या कथेमध्ये निसर्गाचे विहंगम दृश्य टिपतानाही त्यांची ही कलादृष्टी दिसून येते. या कथेप्रमाणेच ‘िपजरा’ या कथेतूनही अंतिमत: खरी कला निसर्ग उधळत असल्याचा संदेश ते देतात. या कथांमधून लेखकाला असणारी निसर्गाची ओढ, पशूपक्ष्यांविषयीचा त्यांचा मानवतावादी, अिहसावादी दृष्टिकोनही स्पष्ट होतो.
मानवी जीवनाला स्वार्थ, आपमतलबी वृत्ती व्यापून आहे. ही वृत्ती व्यक्तीचा आणि मानवतेचा कसा घात करते याचे चिंतनप्रवृत्त करणारे चित्र त्यांची कथा टिपते. ‘गुलामांचे संकल्प’ या कथेत रोममधील गुलामगिरी, सीझर, त्यांचे उमराव यांनी मानवतेचा मांडलेला खेळ ते रेखाटतात. माणसांना गुलाम बनवून पायी तुडवलेली मानवता पाहून वाचक स्तब्ध होतो. तेथील क्रूर, िहस्र वर्तवणूक मानवी स्वातंत्र्य संपवणारी आहे. त्या स्वातंत्र्यासाठी गुलाम असलेले दोन मित्र पळून जाऊन जंगलात राहण्याचे ठरवतात. परंतु त्यांच्यामध्ये मुक्तीसाठीचा क्रूर खेळ लावून जी अमानुष िहसा केली जाते ती हृदय पिळवटून टाकणारी आहे.
मानवच मानवाची करीत असलेली ही विटंबना गांधीविचाराच्या चोरघडेंना न पाहवणारी होती. त्यामुळे ते िहसेविषयी सतत बोलत राहतात. ‘महायात्रा’ या कथेमध्ये समाजातील श्रद्धा-अंधश्रद्धेच्या समजातून पुढे आलेल्या नरबळीसारख्या मानवी क्रूरतेचे टोक गाठणारे अनुभव लिहितात. अंधश्रद्धेपोटी चालणारी नरबळीची प्रथा देवीच थांबवते असा भास ते या कथेतून घडवतात आणि वाचकाला अस्वस्थ करतात. या कथेत ते देव या कल्पनेचीच चिरफाड करतात. ही चिरफाड वाचकाचा थरकाप उडवते. या कथेतून एक उत्कर्ष िबदू गाठताना ते जी काव्यात्म भाषा वापरतात- ती लघुकथांमध्ये फार क्वचित दिसते. अशी काव्यात्म भाषा वापरून आशयसूत्र परिणामकारक करण्याचे खास तंत्र चोरघडेंच्या अनेक कथांमध्ये दिसते.
‘भाकरीची गोष्ट’मध्ये आलेले ग्रामजीवन, ‘मातीची भांडी’मध्ये आलेले आदिवासी गोंड जमातीचे चित्रण, ‘अतिथी देवो भव!’मध्ये आलेले गरीब शेतकरी कुटुंबाचे भावविश्व चोरघडेंची कथा किती वैविधपूर्ण जीवनदर्शनाची मागणी करते ते स्पष्ट करते. त्यांच्या अनेक कथा उपेक्षित, वंचित, अलक्षित अशा वर्गाचे बारकाईने चित्रण करणाऱ्या आहेत. जीवनाची अशी नवनवी अनुभूती टिपताना त्यांची कथा ठोकळेबाज तंत्र वापरत नाही. ती खुली आणि जीवनाइतकीच नावीन्यपूर्ण रीतीने लिहिली जाते.
चोरघडे यांनी रूढ कथेला नाकारत तिला संकेतापासून मुक्त केली. त्यासाठी त्यांनी कोणतेही बंधन घालून न घेता कथेला अनेक पातळीवरचे विषय दिले. त्यांची साधी सरळ भाषा तत्कालीन रंगरंगोटी केलेल्या कथेतही उठून दिसते. त्यांची कथा बारकाईने वाचताना त्यांनी अभिव्यक्तीच्या पातळीवर केलेले प्रयोग लक्षात येतात. जीवनातील विविध स्तरातील लोकांचे विविध तऱ्हेचे अनुभव ते सारख्याच समरसतेने रेखाटताना दिसतात. त्यांच्या कथेचा विषय कोणत्याही स्तरातील समाज असो; व्यक्तिरेखेच्या मनाच्या सूक्ष्म भावछटा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांची सारी कथा वाचताना अजून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते- ती म्हणजे त्यांना असणारे तीव्र सामाजिक भान. अशा अनेकविध वैशिष्टय़ांमुळे त्यांची कथा आजही ताजी आणि समकालीन वाटते. म्हणूनच या संपादनाचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे.
‘वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ व २’ – संपादक : आशा बगे, डॉ. श्रीकांत चोरघडे, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठे – १९२+२००, मूल्य -२००+२०० रुपये.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)