काही संगीतकारांच्या गाण्यांत शोधायला गेलो तरी उथळ शब्द, सवंग आशय सापडतच नाही. चित्रपटसंगीत हे प्रामुख्याने व्यवसाय डोळ्यापुढे ठेवून केलं जात असल्यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ करण्याची वेळ गीतकार/ संगीतकारावर कधी ना कधी येतेच. पण खय्याम, जयदेव, मदनमोहन, वसंत देसाई यांसारख्या संगीतकारांची गाणी ही शब्द, आशय या दृष्टीनेसुद्धा श्रीमंत म्हणावीत अशीच होती. त्यात वसंत देसाईंना संस्कृतप्रचुर िहदी लिहिणारे भरत व्यासांसारखे कवी मिळाल्यामुळे मूळचा राजस आणि अभिजात भाव झळाळून उठला नसता तरच नवल. पण भाषा खानदानी किंवा संस्कृतप्रचुर असली तरी गोडव्याशी तडजोड केलेली दिसत नाही. ‘बिरह समुद्र में छाडी गयो पिव’ (पिया ते कहाँ गयो, संत मीराबाई) सारखी ओळ बघा. आता, ‘बिरहसमुद्र’ हा काही मुलायम किंवा सोपा शब्द नव्हे, पण अशा शब्दांचे कोपरे न टोचता, त्यांना एका सुंदर मेलडीमध्ये घेऊन येण्यासाठी देसाईंसारखा संगीतकार लागतो. ‘निर्बल से लडाई बलवान की’ हे असंच थोडं धाडसी गाणं. कारण कुठलंही तत्त्वज्ञान सांगणारं गाणं रंजकतेत कमी पडण्याची भीती असते. पण इथेही, देसाईंच्या स्वरयोजनेमुळे ते श्रवणीय, गुणगुणल्यासारखं बनतं. ‘मालकंस’सारख्या भारदस्त आधारावर उभं असलेलं, मन्नादांनी खुल्या, ठोस आवाजात गायलेलं हे गाणं सामान्य माणूस गुणगुणू शकला, ते त्या पकड घेणाऱ्या चालीमुळे.
लोकसंगीताचा अतिशय कल्पक उपयोग करून घेताना वसंत देसाईंनी मूळच्या रांगडेपणाला धक्का न लावता, त्याचं असं बेमालूम रसायन बनवलं, की काहीशा रानटी वासाची ती फुलं अलगद आपल्या दिवाणखान्यात दिमाखानं विराजमान झाली. ‘मुरलिया बाजे रे जमुना के तीर’, ‘संया झूठोंका बडम सरताज निकला’ ही काही निवडक उदाहरणं. गाणं आणि सहजोद्गार यांच्या ‘मधलं काहीतरी’ जे असतं, ते कंपोज करणं फार अवघड. ‘संया झूठोंका बडम’मध्ये ‘परदेसी की प्रीत बडी होती बुरी’ ही ओळ ज्या पद्धतीने थांबते, ज्या स्वरावर (?) थांबते, ते ऐकण्यासारखं आहे. इथे, गाणं आणि बोलणं यांच्या मधलं काहीतरी ऐकू येतं. यातले आलापसुद्धा, ग्रामीण स्त्रीचेच वाटावेत असे रांगडे, खुले आहेत, पण तरीही मेलोडियस. ‘बडा तीखा वो..!’ म्हणताना जो विस्मय, जी लटकी तक्रार त्या चालीत येते, ती कशामुळे? तर ते शब्द किंचित वर उचलल्यामुळे. ऐकून बघा. भरत व्यासांची अनुप्रास शैली- ‘मुख ‘मोड’ चला, दिल ‘तोड’ चला, मुझे ‘छोड’ चला’सारख्या शब्दांत खूप खुलते. दिग्दर्शक विकास देसाईंनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, ‘बडा तीखा वो..!’ या ओळीवर, संध्या जी खेळण्यातली गाडी घेऊन चाललीय, ती गाडी अडकते आणि बरोबर पुढच्या बीटवर ‘तिरंदाज निकला’ला ती सोडवते. क्या बात है! वा!!
‘कोरस’ची ताकद ओळखणाऱ्या अनिल विश्वास, नौशाद, सलीलदा यांच्या बरोबर वसंतरावांचंही नाव घ्यावं लागतं. त्यांच्या अनेक गाण्यांना, कोरसचा भव्य पडदा पाश्र्वभूमीला लाभला आहे. त्या पाश्र्वभूमीवर ते गाणं झगझगीतपणे उठून दिसतं. कोरससाठी ओळी, आलाप संगीतबद्ध करताना विविध सप्तकांचा, ूल्ल३१ं ेी’८ि चा खोल विचार करण्यात देसाईंचा अभ्यास दिसतोच, पण त्यातही एक वेगळेपणा आहे. सामान्यत: रोमँटिक द्वंद्वगीतात कोरस क्वचित आढळतो, पण ‘नन सो नन’सारख्या प्रणयमधुर गाण्यात तो आहे. (त्याची विस्तृत चर्चा आपण करणार आहोत.) ‘ए मालिक तेरे बंदे हम’सारखं गाणं जेवढं लताबाईंचं आहे, तितकंच ते कोरसचंही आहे. वसंतरावांच्या गाण्यात अनेक ठिकाणी कोरस हा वाद्यांऐवजी एक म्युझिक पीस म्हणूनही येतो. काही वेळा तो संवाद स्वरूपात असतो. गायक-गायिकेच्या ओळींना प्रतिसाद दिल्यासारखा येतो. ‘ए मालिक तेरे बंदे’, ‘नन सो नन’सारखी गाणी या दृष्टीने ऐकून पाहा. ‘पिया ते कहा’मधला स्त्री कोरस व्हायोलिनच्या पीससोबत कसा गुंफलाय ते ऐकण्यासारखं आहे.
अतिशय सुंदर रीतीने स्वरांचे सेतू बांधत, अंतऱ्यातून मुखडय़ाला अलगदपणे येणं वसंतरावांना साधलं होतं. ‘टिम टिम टिम तारोंके दीप जले’सारख्या गाण्यात, ‘चाँद किरनों की डाली पे है झूमता, चांदनी ले रही देखो अंगडाइयाँ’ ही ओळ, एखादं पीस हवेच्या लहरीवर वर-खाली होत तरंगत जमिनीवर यावं तसं. रेगम, सारेग, धनीरेगनीसा असे षड्जावर येतात. (‘टिम टिम टिम’ची एक गंमत जाता जाता.. या शब्दांना ‘सा’ ‘ग’ ‘प’ असे सुटे स्वर दिल्याने खरंच हे शब्द लुकलुकतात!) असं सुरेख ’्रल्ल‘्रल्लॠ ‘सन सनन सनन, जा री ओ पवन’ यामध्ये दिसतं. एक तर चंद्रकंस रागातला शुद्ध निषाद त्या झोंबणाऱ्या वाऱ्यासारखाच. अंतरा षड्जावर पोचतो आणि एका छोटय़ाशा आलापाने (नीसानीधम, गमगसा) वरच्या ‘सा’पासून खालच्या ‘सा’वर सुरेख झेप घेतली आहे. ‘ओ दिलदार, बोलो इक बार’ मधलं ’्रल्ल‘्रल्लॠ आठवा. ‘तो फिर आओजी, मेरा दिल बडम है बेकरार’वरची ती तान, अशीच सुंदर िलक घेऊन येते.
स्वत:च्या टेंपरामेंटपेक्षा क्वचित वेगळी गाणीही वसंतरावांनी दिली. ‘मं सागर की मस्त लहर’ आणि ‘आ गयी बहार’ ही गाणी ऐकताना, पियानो, पाश्चात्त्य कॉर्डस्, हार्मनी यांचा वेगळाच रंग दिसतो. अशी आणखी काही गाणी त्यांनी दिली असती, तर ‘शास्त्रीय संगीतवाले’ हा शिक्का, ही इमेज ते बदलू शकले असते. कदाचित, नियतीने आयुष्य अचानक पुसून टाकल्यामुळे हा अवसरही त्यांना मिळाला नसावा. त्यांच्या कारकिर्दीचा मोठा भाग व्ही. शांतारामांच्या चित्रपटांचा असल्यानेही या मर्यादा पडल्या असाव्यात. ‘आ गयी बहार’ आणि २० हून अधिक वर्षांनी आलेले राजेश रोशनच्या ‘होठो पें गीत जागे’ (मनपसंद) या गाण्यात खूप साम्य आहे. कदाचित दोन्हीची प्रेरणा एखादी वेस्टर्न हार्मनी असावी. वसंतरावांनी दिलेल्या हलक्या फुलक्या गाण्यांची संख्यासुद्धा कमी नाही. ‘ओ दिलदार’, ‘झुक झुक झोला खाए, तेरा खत ले के सनम’ या गाण्यातली गोलाई, गोडवा स्तिमित केल्याशिवाय राहत नाही. ‘ओ दिलदार’मधला तो ‘बोलो’ तर कहर गोड.
‘रेलगाडी’, ‘नानी की नाँव चली’ सारखी गद्याच्या सीमारेषेवरची गाणी देताना, ‘एक था बचपन’सारखं गंभीर, अंतर्मुख करणारं गाणंही ते देऊ शकले. गुजरी तोडीचा करुण भाव त्या शब्दांना सुंदर स्वरकोंदण देऊन गेला. ‘इक था’ हा शब्द भूतकाळात जातो याचं रहस्य, तो ज्या पद्धतीने लांबवलाय, त्यात आहे. ठराविक साचेबद्ध अंतरे न बांधता, त्यांना वेगळी ट्रीटमेंट देणं, त्यात वैविध्य आणणं, यामुळे हे गाणं आपल्याला हलवतं. यातलाही कोरस ‘संवादक’ आहे. ‘जीवन से लंबे है बंधू’मध्येही ‘लंबेऽऽऽ’ हा स्वर असा दीर्घ केल्यामुळे जीवन संपतं, पण रस्ता संपत नाही हे सत्य ठळकपणे समोर येतं.
वसंतरावांच्या शैलीची वैशिष्टय़ं उलगडणारी ही काही सुंदर गाणी- बादलों बरसो नयन की कोरसे (संपूर्ण रामायण, भरत व्यास).
मला मुळात या गाण्यातला ‘नयन की कोरसे’ हा शब्दच खूप भावतो. निसर्ग आणि आपल्या भावना, याचं एकरूपत्व, इतकं मनोहर शब्दांत, चालीत प्रतििबबित होणं, हे खूप दुर्मीळ.
बादलों, बरसो नयन की कोर से
बिजलियाँ, कडको हृदय की ओर से
‘बादलोंऽऽऽ’ शब्दाला जे डोलवलंय ते अप्रतिम.
ए घटाओ गर्जना को थाम लो,
आज मेरे करुण स्वर से काम लो
बँध गया सावन नयन की डोर से
ढगांनो, माझ्या डोळ्यांच्या कडांमधून बरसा, माझ्या हृदयाची तडफड त्या विजेच्या कडकडाटात एकरूप होऊ दे, माझी करुण आर्त हाक असताना तुमची गर्जना कशासाठी, असा खूप वेगळा सुंदर विचार. ‘प्राण तडपे भाग्य की झकझोर से, बादलों बरसो नयन की कोर से’ या गाण्यात ‘झकझोर’सारखा शब्द किती नादमय झाला आहे!
‘नन सो नन नाही मिलाओ’ (झनक झनक, हसरज जयपूरी) अत्यंत कोमल, तरल असं हे युगुलगीत. मालगुंजी रागाची पाश्र्वभूमी घेऊन आलेलं. पण ‘नन सो नन नाही मिलाओ’ या शब्दांत जे माधुर्य आहे, जी मुग्ध भावना आहे, ती त्या स्वरात अचूक उमटते, हे जास्त महत्त्वाचं. खर्जात जाणारा मुखडा बांधणं, हेही धाडसच. पण त्यामुळेच तर तो प्रणय खूप संयत झालाय. उद्यानात नृत्याविष्काराद्वारे मन व्यक्त होत असताना, कोरसचा संवाद खूप बोलका, त्या दृश्याशी मिळताजुळता. कारंजं उसळल्यासारखा. धसाऽऽ हा आरोही कोरस त्या वातावरणाला कुठल्या कुठे नेतो.
नीले गगन पे झूमेंगे आ
बादल का प्यार देखेंगे आ
म्हणताना ‘गगन’ शब्दावर लागलेला वरचा षड्ज, उत्तुंगतेचा दैवी भास निर्माण करतो.
‘मेरे ए दिल बता’ (झनक झनक, हसरत जयपुरी) लताबाईंच्या, उंच स्वरात तीव्रता गडद करणाऱ्या आवाजाचा पुरेपूर उपयोग करत बांधलेलं हे गाणं एक वेदना घेऊन येतं, पण संगीतकाराचं कौशल्य कुठे जाणवत असेल तर ते ‘प्यार तूने किया, पायी मंने सजा, क्या करूं क्या करूँ’ या ओळीत. ‘क्या’वरची जी मींड आहे, त्यामुळे तो केवळ प्रश्न न राहता, विरहिणीची आर्त पुकार बनते. थोडं आणखी मन गुंतवत, कान देऊन ऐकलंत, तर त्या आलापात गुंफलेले हुंदके, गदगदलेला आवाजही जाणवतो. अंतऱ्याच्या ओळीमध्ये जो छोटा आलाप आहे, त्यात कोमल-शुद्ध स्वर लागोपाठ घेऊन किंचित भय रसाचा आविष्कारही दिसतो. गडद कारुण्यात बुडवणारी ती नी ध ध प ही फ्रेज. क्या बात है!
‘मिया मल्हार’चा डौल राखत, ‘गुलज़ारी’ शब्दांना चढवलेला अत्यंत मेलोडियस साज म्हणजे, ‘बोले रे पपीहरा’(गुड्डी, गुलज़ार). त्या गुड्डीला, त्या अबोध शाळकरी मुलीला, वाणी जयरामचा आवाज फिट्ट बसला. ‘नित मन प्यासा, नित मन तरसेऽऽ’ वर वाणीजी जो स्वर लांबवतात, आणि किंचित थांबतात, तो क्षण किती सुंदर आहे!
पलकों पर इक बूँद सजाए
बठी हूँ सावन ले जाए
जाए, पी के देस ये बरसे
पापण्यांवर सांभाळलेला, सजवलेला हा थेंब, थेट ‘त्या’च्या कडेच जाऊन बरसला तर? बोले ‘रे’ वरचा किंचित हेल खूप गोड. स्वत:च्या आवाजात गात, वाणीनं हे गाणं गाजवलं. वाणीजींच्या देव्हाऱ्यात वसंतरावांची तसबीर असावी यात आश्चर्य नाही. आयुष्यातला सुवर्णक्षण वसंतरावांनीच तर त्यांना दिला.
(क्रमश:)

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!