गोपनीय पत्र क्र.- १३/ब/२०१५ अज
मा. विधिमंडळ अध्यक्ष यांचे कार्यालय,lok01
मुंबई
प्रति,
मा. मुख्य सचिव,
मंत्रालय, मुंबई
विषय- सेवनविषयक विधिमंडळाचे अधिकाराचे पालन व सरकारमान्य सेवनयोग्य पदार्थाची जंत्री व तदर्थ बाबी यांविषयी.
महोदय,
ज्या अर्थी महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ यांस राज्यातील नागरिकांनी जे येथे जन्मल्यापासून व मृत्यूपर्यंत राहत आहेत व/ किंवा जे या राज्याहून अन्यत्र राहत नाहीत अशांनी कोणत्या गोष्टी/ बाबी यांचे सेवन करावे हे ठरविण्याचा अधिकार असल्याचे मा. न्यायालय यांस कळविण्यात आले आहे, त्या अर्थी हा अधिकार असल्याचे स्पष्ट होते व ज्या अर्थी या अधिकारान्वये सरकारमान्य सेवनयोग्य पदार्थाची यादी तयार करणेचा निर्णय तदविषयक विधिमंडळ समितीने घेतला आहे त्या अर्थी ही यादी तयार करावयाची आहे. त्याकरिता आपले अखत्यारीतील सर्व विभागांत व खात्यांत कोणते पदार्थ सेवन केले जातात हे कळवावे. माहिती तातडीने व/ किंवा १५ दिवसांचे आत पाठवावी.
कळावे.
आपला,
(सही)
मा. विधिमंडळ अध्यक्षांचे सचिव यांचेकरिता
४ ४ ४
प्रति,
मा. सचिव,  
विधिमंडळ अध्यक्षांचे कार्यालय, मुंबई
महोदय,
आपले पत्र क्र. १३/ब/२०१५ अज यानुसार आपणांस कळविणेत येते, की संबंधित माहिती विविध विभागांतून मागविणेत येत असून ती प्राप्त होताच तिची छाननी करून आपणांस पाठविणेत येईल.
कळावे.
आपला,
(सही)
मुख्य सचिव, मंत्रालय यांचेकरिता
४ ४ ४
प्रति,
मा. मुख्य सचिव
महोदय,
ज्या अर्थी मंत्रालयामध्ये ‘खाते’ हा शब्द वापरात आहे व ज्या अर्थी ‘खाते’ यामध्ये मूळ धातू ‘खा’ असा आहे (संदर्भ- बालभारती, इ. चौथी) त्याअर्थी विविध खात्यांकडूनही सेवनयोग्य पदार्थाची यादी मागविणेत यावी. कळावे.
आपला,
(सही)
मा. विधिमंडळ अध्यक्षांचे सचिव यांचेकरिता
 ४ ४ ४
प्रति,
मा. सचिव,  
विधिमंडळ अध्यक्षांचे कार्यालय, मुंबई
महोदय,
आपण पाठविलेला संदर्भ पडताळणेचे कामी एक द्विसदस्यीय समिती नेमणेत येत आहे. कळावे.
आपला,
(सही)
मुख्य सचिव, मंत्रालय यांचेकरिता
४ ४ ४
प्रति,
मा. मुख्य सचिव
महोदय,
संदर्भ पत्र क्र. १३/ब/२०१५ अज. या पत्राद्वारे मागविणेत आलेली माहिती आपणांकडून गेल्या ३७ दिवसांत प्राप्त झालेली नसून, सदरील माहिती तातडीने पाठवावी.
कळावे.    
 आपला,
(सही)
मा. विधिमंडळ अध्यक्षांचे सचिव यांचेकरीता
४ ४ ४
प्रति,
मा. सचिव,  
विधिमंडळ अध्यक्षांचे कार्यालय, मुंबई
महोदय,
मंत्रालयातील विविध विभाग व खात्यांकडून मागविणेत आलेल्या माहितीची छाननी करणेचे कामी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे-
१. राज्याच्या विविध विभागांमध्ये कोणत्याही प्रकारचे पदार्थ सेवन केले जात नाहीत.
२. काही विभागांचे- उदा. गृह, महसूल, सा. बां. यांबाबतीत माध्यमांतून अवास्तव व खोडसाळ वृत्ते प्रसिद्ध होतात. चारा खाल्ला, शेण खाल्ले अशा प्रकारचे उल्लेख हे विपर्यस्त असून त्यामुळे जनतेचा गरसमज होतो.
३. उपरोक्त बाब लक्षात घेऊन समितीने सदरील पदार्थ शासकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीचे कामी पाठविले. प्राप्त अहवालानुसार चारा, शेण, गणवेश इत्यादी पदार्थाचा ज्या अर्थी मनुष्याचे जठरावर विपरित परिणाम होतो त्या अर्थी हे पदार्थ सेवनयोग्य नसून ते सेवन केले जात नाहीत.
४.  गणवेश हा खाण्याची नसून परिधान करण्याची बाब असल्याचेही प्रयोगशाळेत निष्पन्न झाले आहे.     
कळावे.
आपला,
(सही)
मुख्य सचिव, मंत्रालय यांचेकरिता
४ ४ ४
प्रति,
मा. मुख्य सचिव
महोदय,
शासनाचे विविध विभाग व खात्यांमध्ये कोणत्याही पदार्थाचे सेवन केले जात नाही हे समजले. तथापि मा. विधिमंडळ कार्यालयाचे निदर्शनास आणून देणेत आलेनुसार ज्या अर्थी मंत्रालयामध्ये पसे खाल्ले जाण्याचे उल्लेख आढळतात त्या अर्थी त्याचेसंबंधाने खुलासा करणेत यावा.
कळावे.     
आपला,
(सही)
मा. विधिमंडळ अध्यक्षांचे सचिव यांचेकरिता
४ ४ ४
प्रति,
मा. सचिव,  
विधिमंडळ अध्यक्षांचे कार्यालय, मुंबई
महोदय,
पसे ही सेवनयोग्य वस्तू आहे की काय, याची खातेनिहाय चौकशी करणेकरिता नेमणेत आलेल्या समितीकडे पसे पाठविणेत आले आहेत. तथापि समितीकडून अद्याप त्याबाबतीने काहीही कळविणेत आले नाही. सदरील माहिती प्राप्त होताच आपणांस कळविणेत येईल. कळावे.
आपला,
(सही)
मुख्य सचिव, मंत्रालय यांचेकरिता
४ ४ ४
प्रति,
मा. मुख्य सचिव
महोदय,
खातेनिहाय चौकशीची माहिती आपणांकडून अद्याप प्राप्त झालेली नसून त्यामुळे सेवनयोग्य पदार्थाची यादी प्रसिद्ध करणेचे कामी दिरंगाई होत आहे. तातडीने कार्यवाही करावी. कळावे.     
 आपला,
(सही)
मा. विधिमंडळ अध्यक्षांचे सचिव यांचेकरिता
४ ४ ४
प्रति,
मा. सचिव,  
विधिमंडळ अध्यक्षांचे कार्यालय, मुंबई
महोदय,
सेवनयोग्य पदार्थ छाननी समितीकडे पसे सेवनयोग्य आहेत की कसे, याबाबतची तपासणी करणेकरिता सोपविणेत आलेले पसे प्राप्तच झाले नसलेचे समितीचे म्हणणे असून, समितीचे मा. अध्यक्ष यांनी ते पसे खाल्ले असे अन्य सदस्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करणेकरिता निवृत्त न्यायमूर्तीची चौकशी समिती नेमणेचे प्रस्तावित आहे. त्याबाबतचा अहवाल येताच आपणांस कळविणेत येईल.
कळावे.
आपला,
(सही)
मुख्य सचिव, मंत्रालय यांचेकरिता
४ ४ ४
 (आमचे मंत्रालयातील वार्ताहर कळवितात की, परवाचे दिवशी निवृत्त न्यायमूर्तीच्या समितीने चौथ्यांदा आपला कार्यकाल वाढवून घेतला. त्यामुळे सरकारी सेवनयोग्य पदार्थाच्या यादीत पसे येतात की काय, हे निश्चित होऊ शकलेले नाही. तेव्हा नागरिकांनी याची नोंद घ्यावी व जुनाच परिपाठ चालू ठेवावा. कळावे. बाकी मेहरबानांस तर सर्वच जाहीर आहे!)   lok02