पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर…
गा णं तुम्हा-आम्हाला आवडतं. ते कधी टीव्हीवर भेटतं. कधी रेडिओवर. कधी गाडी चालवताना. कधी गणपतीच्या मिरवणुकीत. गाणं हा प्रकारच आवडत नाही अशीही माणसं असतात; पण अगदीच मोजकी. संगीतामधली वेगवेगळ्या सुरांची, नादांची, लयींची दालनं वेगवेगळ्या तऱ्हेच्या माणसांना साद घालतात; खुणावतात. माणसाच्या जगण्याला इतकी लगत चिकटलेली.. सातत्यानं चिकटलेली कला दुसरी क्वचितच कुठली असेल.
हा- पण सगळीच गाणी काही सगळ्यांना आवडत नाहीत. सगळे संगीतप्रकार सगळ्यांना बोलावत नाहीत. काहींना कुमार आणि किशोरीबाईंचंच गाणं हवं असतं. काहींना ‘आशिकी टू’चीच गाणी लागतात. काहींना फक्त बाबूजी. आणि काहींना त्या साऱ्यासकट, किंवा ते सारंच वगळून फक्त जॉन डेन्व्हर किंवा मग मायकेल जॅक्सन किंवा लेडी गागा किंवा नोरा जोन्स! ही सातासमुद्रापलीकडची नावं आपण ऐकलेली असतात. क्वचित त्यांचं गाणंही ऐकलेलं असतं. किंवा गल्लीतल्या काळ्यांचा किंवा पवारांचा नुकताच मिसरूड फुटलेला पोरगा ते कुठलं- जस्टीन बीबरचं गाणं ऐकवून गेलेला असतो. तुमच्यापैकी काहींनी या गाण्यांचीही पारायणं केलेली असतील. पण तरीदेखील एक गोष्ट उरतेच : त्या सातासमुद्रापलीकडच्या नावांइतकेच ते सूरदेखील पलीकडचे असतात. त्यांना जवळ केलं तरी त्यांच्यात आणि आपल्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी असतेच. निदान सुरुवाती सुरुवातीला तरी नक्कीच! भाषा वेगळी असते.. इंग्रजी असली तरी तिचं गाण्यामधलं उच्चारण हे वेगळंच असतं. सुरांची फिरत वेगळी असते. त्यातल्या त्यात पटकन् उमगतो तो ताल. तो उडता ताल ऐकून पॉप, रॉक वगैरे जरा मजेसाठी, जरा नाचण्यासाठी बरे संगीतप्रकार आहेत असं कुणी म्हणतं. आणि मग तसं म्हणताना आपण त्या ‘पॉप्युलर म्युझिक’ची पाळंमुळं विसरतो. त्याची लखलखती मांडणी आणि त्या मांडणीमागची अफाट मेहनत नजरेआड करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघायची राहून जाते, ती म्हणजे- त्याची संस्कृती! रॉक संगीत हे काही केवळ इलेक्ट्रिक गिटारवर आणि ड्रम्सवर नाचणारं गाणं नसतं; तर ती असंतोषाची, विद्रोहाची अभिव्यक्ती करू शकणारी सशक्त संस्कृतीदेखील असते. ‘ब्लूज’ संगीतामागे अमेरिकेतील काळ्या गुलामांची व्यथा अजूनदेखील ठसठसत असते. पॉप संगीत, जॅझ संगीत, कंट्री संगीत आणि त्यांचे अनंत उपप्रकार हे अशा स्व-सामर्थ्यांनिशी केवळ अमेरिकेत, युरोपातच नव्हेत, तर जगभर आज नांदत आहेत. त्यातही जॅझ असतं काहीसं आपल्या शास्त्रीय संगीतासारखं.. आशीर्वाद देणाऱ्या एखाद्या आजोबांसारखं. पॉप हे देखण्या ललनेसमान आहे. रॉक हे शिव्या घालून मग गळ्यात गळे घालणाऱ्या जिगरी याराचं गाणं आहे . आणि ‘कंट्री’ मात्र जी आई वाढत्या मुलग्याची मैत्रीण बनून जाते, तिच्यासारखं आहे.
अभिजनांनी पुष्कळदा ‘पॉप्युलर म्युझिक’ला नाकं मुरडली, अजूनही मुरडतात. पण पुष्कळ संगीतशास्त्राच्या अभ्यासकांनी जनसंगीत, अभिजात संगीत आणि लोकसंगीत (Popular music, classical music and folk music) यांचा मूलभूत त्रिकोण मांडला आणि त्या तिन्ही टोकांचे सांधे दाखवले. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात तर मला वाटतं, तो त्रिकोण घट्ट राहिलेला नाही. तीनही संगीतशाखा एकमेकांत घुसत नवनवे आकार शोधत आहेत. मग सेलिना गोमेझ एखाद्या गाण्यात तबलाच जोडीला घेते किंवा शुभा मुदगल शास्त्रीय गाण्यामध्ये लोकसंगीत आणत राहतात. या ‘पलीकडच्या’ गाण्याविषयी हे सदर बोलणार आहे त्याचं साधं कारण म्हणजे ते आता तितकंसं ‘पलीकडचं’ राहिलेलं नाही; ते आपला उंबरठा ओलांडून घरात आलेलं आहेच! गावागावातल्या तरुण मुलांच्या पाठीवर ‘गिटारी’ दिसू लागल्या आहेत आणि सुरांपेक्षाही त्यांना कॉर्डस्ची तोंडओळख अधिक आहे. काश्मीर खोऱ्यात दहावीमधल्या तीन मुली ‘प्रगाश’ नावाचा बँड तयार करून रॉक गातात आणि मग मुक्ती बशीरूद्दीन अहमद त्यावर बंदी घालतो. या दोन स्वतंत्र घटना आहेत आणि ‘इये देशी’ त्या एकाच वेळी घडत आहेत. जरा आसपास बघा- कित्येक रेस्टॉरंट्समध्ये भलेबुरे जॅझ किंवा रॉक बँड्स वाजताहेत. कॉलेजमध्ये ‘अग्नी’सारखे देशी रॉक बँड्स गॅदरिंगला धुमाकूळ घालत आहेत. बंडाना डोक्याला बांधून लेदर जॅकेट्स घालणारी ‘मेटल’ संगीतचाहती पोरं ‘कोस्टा कॅफे’ किंवा ‘बरिस्ता’मध्ये त्या गाण्यांमधल्या शिव्या चघळत आहेत. ‘इमो’ किंवा ‘पंक’सारख्या विकट केश-वेशभूषांचे पंथ नांदेड, अमरावती, जालना, नंदूरबार, कणकवलीमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये दिसणार आहेत..? कदाचित- हो! आणि म्हणूनच हे सदर फक्त त्या पलीकडच्या संगीतावर, गाण्यांवर, गायकीवर, कवितांवर बोलणार नाही; ते संगीत मूलत: ज्या समाजातून घडतं आणि ज्या ज्या समाजांवर धडकतं, त्या साऱ्यांवरही बोलणार आहे. कारण संगीत हे काही शून्यातून तयार होत नाही. ते समाजामधल्या घटनांमधून, राजकारणातून, अर्थकारणामधून तयार होतं आणि पुन्हा फिरून त्यावरच प्रभाव गाजवतं. याच कारणामुळे संगीतावर बोलायचं तर फक्त रेकॉर्डिगच्या वेळची स्मरणरंजनं पुरेशी नाहीत; फक्त तांत्रिक समीक्षा पुरेशी नाही. मला उमज आल्यापासून वाढताना जाणवलं आहे की, Music is a social phenomenan – बस्स! म्हणजे गायक, गीतकार, वादक, संगीतकार यांची प्रतिभा दैवी असेलही (आणि पुष्कळदा ती असतेच!); तरी संगीत ही घटना मात्र सामाजिक आहे. आणि जागतिकीकरणाच्या या सांप्रत काळात तर ती आर्थिकही घटना आहे. सतरा वर्षांच्या जस्टीन बीबर या टिन-पॉप गायकाची संपत्ती शंभर मिलियन डॉलर असल्याची बातमी जेव्हा आपण वाचतो तेव्हा संगीतामागचं प्रबळ अर्थकारण सहज ध्यानी येतं. आता गाणं काही दीडशे वर्षांपूर्वी शेतातलं काम उरकल्यावर थकलेले काळे गुलाम गायचे तसं साधं-सोपं राहिलेलं नाही. फिरत्या रंगमंचावर, रंगीबिरंगी प्रकाशात, कानठळ्या बसवणाऱ्या वाद्यसंगतीसोबत, कमी कपडय़ांनिशी आता गाणं गायचं असतं आणि समोरचा प्रेक्षकगणही बेहोशीतच असतो. ज्या दिवशी कानात घालायच्या हेडफोन्सचा शोध लागला तेव्हाच स्वत:च्या हक्काचं ‘श्रवण-जग’ माणसाला निवडता येऊ लागलं. आता रस्त्यावरची गर्दी, मुलांचा गोंगाट, मैत्रिणीची कटकट.. काही ऐकायला नको. हेडफोन्स कानात घालून मरीय कॅरेचं गाणं लावलं की पुरे! आजचं जनसंगीत हे तंत्रज्ञानानिशी किती तयारीनं उभं आहे! इंटरनेटनं जग बदललं तसं संगीतही बदललं. त्या गाण्यांची निर्मिती आणि प्रसार हेही पार पालटलं. सॉफ्टवेअरवर सारी वाद्यं ‘वाजवून घेऊन’ एकेकटय़ा माणसाला छोटय़ा खोलीत संगणकासमोर बसून आरामात गाणं तयार करता येऊ लागलं.
बदलली नाही ती संगीताची माणसाच्या हृदयाला भिडण्याची शक्ती. ती जणू शाश्वत आहे. पुढे वर्षभर आपल्याला बघायची आहे ती पलीकडच्या, काहीशा परक्या भासणाऱ्या संगीताची ही शक्ती! ती कधी गायकीत आहे, कधी वादनात, कधी गाण्याच्या दर्शनात. (कारण गाणं आता केवळ ऐकायचं नाही, तर ‘बघायचंही’ आहे!) आळंदीच्या त्या ज्ञानी, साक्षात्कारी युवकानं फार पूर्वीच म्हटलं होतं- ‘‘विषयाचा विसरू पडे। इंद्रियांची कसमस मोडे। मनाची घडी घडे। हृदयामाजी।’’
कुठल्याही काळामधलं, संस्कृतीमधलं चांगलं संगीत अखेर याहून वेगळं काय करतं?