10म नोरंजनासाठी काय काय करता येऊ  शकतं हे नेर्दलड्समधल्या (किंवा एकूणच युरोपातल्या) लोकांना विचारा! इथे वास्तव्यास आल्यापासून अनेक गोष्टींनी माझं लक्ष वेधून घेतलं आणि तशातच मनोरंजनाची एक भन्नाट कल्पना पाहायला आणि अनुभवायला मिळाली- पुतळ्यांची स्पर्धा! नेर्दलड्समधल्या आन्र्हेम गावी दर वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येते. या वर्षी या स्पर्धेचं आठवं वर्ष आहे. गंमत म्हणजे हे पुतळे इतर निर्जीव पुतळ्यांसारखे नाहीत, तर जिवंत असतात. जगभरातून (मुख्यत्वे युरोपातून) वेगवेगळे देश ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. त्यामध्ये नवशिके आणि मातब्बर असे दोन गट असतात. नवशिक्यांमधल्या सर्वोत्कृष्ट पुतळ्याला ५०० युरो तर मातब्बर गटातील सर्वोत्कृष्ट पुतळ्याला २००० युरो बक्षीस म्हणून देण्यात येतात. गेली ३ र्वष आता हे पुतळे रात्री दिव्यांच्या झगमगाटातदेखील पाहता येतात.
तर ही २०१० सालची गोष्ट! मी आणि माझे मित्र ही स्पर्धा पाहायला गेलो. आन्र्हेम स्टेशनच्या बाहेर पडल्यावर सगळीकडे “World Statues Festival 2010, Arnhem” असे बोर्डस् दिसत होते आणि शहरातली ती मध्यवर्ती जागा- जिथे ते प्रदर्शन म्हणजे स्पर्धा भरली होती तिकडे जाण्यासाठी दिशादेखील दाखवल्या गेल्या होत्या. लोकांचे लोंढे त्याच दिशेने जात होते. साधारण १० मिनिटे चालत गेल्यावर त्या प्रदर्शनाला जमलेल्या गर्दीचा खरा अंदाज आला. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाचं मनोरंजन करेल अशी ही स्पर्धा! आपल्याकडे जशी गणपतीसाठी किंवा दहीहंडीसाठी वेगवेगळी मंडळं असतात तशा जवळपास १०० वेगवेगळ्या जिवंत पुतळ्यांच्या संकल्पना तिथे मांडल्या होत्या. आणि सर्व संकल्पना एकापेक्षा एक! लहान मुलांसाठी देखील एक स्वतंत्र विभाग होता. आता जिवंत पुतळे म्हणजे काय, तर माणसेच स्वत:च्या अंगावर रंगरंगोटी करून किंवा विशिष्ट अशी वेशभूषा करून उभी होती. कुणी इजिप्शियन देवता, कुणी परी, कुणी एक सुंदरसे जोडपे, कुणी राक्षस असे विविध पुतळे होते. जसजसे आम्ही पुढे पुढे जात होतो तसतसे पुतळे अजूनच मजेशीर वाटत होते. मधूनच थोडा वेळ एखाद्या पुतळ्यापाशी आम्ही थांबत होतो. प्रत्येक पुतळ्यासमोर एक वाटी किंवा भांडं होतं. त्यामध्ये लोक स्वखुशीनं पैसे टाकत होते. भांडय़ात पैसे पडल्याचा आवाज आला की पुतळा हलायचा आणि वेगळी ‘पोझ’ घ्यायचा. ती ‘पोझ’ पुन्हा कोणी पैसे टाकेपर्यंत तशीच राहायची.
एक पुतळा एका लहान मुलीचा होता. तिच्या हातात एक बाहुली होती आणि त्या बाहुलीचा एक पाय तुटला होता. ती बाहुली मुद्दामहून खालती पडत होती. बाहुली खाली पडली की पुतळ्याला रडू येई आणि पुतळ्याचा हात आपसूक डोळ्यापाशी जाई. लहान मुले ती बाहुली उचलून त्या मुलीच्या पुतळ्याच्या हातात बसवायचा प्रयत्न करत होती, पण बाहुली हातात बसत नव्हती. कुणी पैसे टाकले की बाहुली हातात बसायची आणि चेहऱ्यावर हास्य उमटायचे. थोडय़ा वेळाने पुन्हा ती बाहुली खाली पडायची. लहान मुलांना खूपच मजा येत होती. असाच अजून एक पुतळा होता. त्यामध्ये एका प्रवाशाची संकल्पना दाखवली गेली होती. तो प्रवासी फार घाईत होता. त्याच्या अंगावर एक कोट होता आणि शिवाय पावसासाठी असा एक वेगळा कोट त्या पुतळ्याच्या हातात होता. एक रमची बाटली, एक वर्तमानपत्र असा एकूण वेश होता. दरवेळी या सगळ्यातली एक गोष्ट खाली पडत होती. लहान मुलांनी ती उचलून दिली की ती घेताना दुसरी गोष्ट पडायची. ती उचलून देताना मुलं दमून जात. मग थोडा वेळ पुतळा स्तब्ध असे. मोठी मजा!
एक तर पुतळा असा होता, की त्याचं डोकं समोरच्या टेबलवर असे आणि बाकी शरीर खुर्चीवर बसून. थोडय़ा थोडय़ा वेळाने शरीराचे हावभाव बदलत आणि चेहऱ्याचेही! अर्थात, हे एक टीम वर्क होतं, पण इतकं शिताफीनं केलं जात होतं की बास! आता अशा सगळ्या पुतळ्यांमध्ये महात्मा गांधी नसते तरच नवल! पण हे गांधीजीसुद्धा प्रत्येक जण जो भांडय़ात पैसे टाकेल त्याला एका कागदाच्या छोटय़ाशा पुंगळीतून एक छापील संदेश देत होते. गांधीजींनी त्यावेळी मला दिलेला संदेश होता- “Glory lies in the attempt to reach one’s goal and not in reaching it.”
लहान मुलांच्या विभागात कोणी बाहुली किंवा परी बनलेलं होतं, तर कुणी बर्ड फीडर, कुणी फोटोग्राफर होतं. कुणी नेपोलियन, कुणी फॉरेस्ट ऑफिसर तर कुणी शास्त्रज्ञ. डच लोकांचं प्रतिनिधित्व रेम्ब्रांट ह्या चित्रकाराच्या रूपात आणि अ‍ॅन फ्रँकच्या रूपात केलं होतं. ती अ‍ॅनसुद्धा गांधीजींप्रमाणेच पैसे टाकणाऱ्यांना संदेश देत होती. एकूणच मोठी जत्रा जमली होती. सगळं पाहून मजा आली.. तो दिवस खरंच खूप मस्त गेला.
माणसाची प्रतिभा आणि बुद्धी त्याच्याकडून काय काय करवून घेईल आणि मनुष्याला कशा कशात वैविध्य सापडेल हे एक कोडंच आहे. पण त्यामुळे दरवर्षी या स्पर्धेमध्ये उत्तमोत्तम पुतळे बनत आहेत आणि तुमच्या आमच्यासारख्यांना स्तब्ध करत आहेत. “Others have seen what is and asked why. I have seen what could be and asked why not.”  असं प्रख्यात चित्रकार पाब्लो पिकासो म्हणून गेलाय आणि हे या स्पर्धेला अगदी तंतोतंत लागू पडतं!
wishwas2610@gmail.com