भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यामध्ये राष्ट्रपतीपद भूषवण्याची योग्यता निश्चितपणे आहे, असा निर्वाळा केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला. चित्रवाणीवरील एका कार्यक्रमात त्यांनी अडवाणींसह मुरलीमनोहर जोशींची स्तुती केली.
लालकृष्ण अडवाणी यांचा राजकारणातील अनुभव आणि त्यांनी भूषवलेले उपपंतप्रधानपद पाहता त्यांना लोकसभा अध्यक्ष करणे उचित ठरणार नव्हते. त्यामुळे राष्ट्रपतीपद त्यांच्यासाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रती आम्हा सर्वाना आदर आहे, त्यांच्यासाठी योग्य असे पद मिळायला हवे, अशी भावना आहे.
वयाची पंचाहत्तरी पार केलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे नाही या पंतप्रधानांच्या भूमिकेतून मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली नाही. या ज्येष्ठ नेत्यांची तुलना त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी केली. आता नवी पिढी येत आहे, मलाही दहा वर्षांनी नव्या नेतृत्वाला संधी द्यावे लागेल, असे गडकरींनी सांगितले. मुरलीमनोहर जोशी यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होण्याची इच्छा असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले. जोशी हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्ष करून घेईल, असे गडकरी यांनी सांगितले.
मोदींच्या कार्यपद्धतीचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर मंत्र्यांचे ऐकून घेतात, त्यांचे काही मुद्दे मान्य करतात, असे गडकरींनी स्पष्ट केले. मंत्री मोदींना घाबरत असल्याचे वृत्त चुकीचे आहे. पंतप्रधानांना प्रत्येक विषयाची सखोल माहिती असल्याने विभागाचे सचिव घाबरतात हे मान्य केले. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही कठोर निर्णय अपेक्षित असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. अर्थमंत्र्यांकडे निधीची मागणी केल्यावर सध्याच्या योजनांसाठीच निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येण्यासाठी थोडा कालावधी लागेल.