सार्वत्रिक निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सोमवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली. मात्र कार्यकारिणीने एकमताने त्यांचे राजीनामे नामंजूर केले. कठोर आव्हानांचा पक्ष सातत्याने मुकाबला करील, अशी घोषणाही कार्यकारिणीने केली आहे.
याआधी १९९९मध्ये, सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये बंड झाले तेव्हा सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. तेव्हाही कार्यकारिणीने एकमताने तो धुडकावल्यावर त्यांनी तो मागे घेतला होता.
सोनिया आणि राहुल यांच्या नेतृत्वावर कार्यकारिणीने विश्वास व्यक्त केला असला तरी काही काँग्रेस नेत्यांबद्दल पक्षातली नाराजी वाढत आहे. सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री, सी. पी. जोशी, अजय माकन, मुकुल वासनिक, मोहन प्रकाश, शकील अहमद, गुरुदास कामत, बी. के. हरिप्रसाद, अंबिका सोनी आणि दिग्विजय सिंह यांनी ज्या राज्यांचे प्रभारीपद सांभाळले तेथील दारुण पराभवास ते जबाबदार असल्याचा आरोप सुरू झाला आहे. राहुल यांच्या कार्यपद्धतीवरही काही नेते नाराज आहेत. सोनिया गांधी यांनीच पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हाती घ्यावीत आणि पक्षात उभारी आणावी, असा मतप्रवाहही वाढत आहे.