पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा हे उच्च पातळीवरून ठरवून केलेले राजकारण असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बठकीत केला. राजशिष्टाचार पाळला जात नसल्याचा आरोप करणाऱ्यांनी अगोदर तो वाचून पाहावा असा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपाला दिला.
पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात हे सर्वानाच ज्ञात असायला हवे. राज्याच्या राजधानीत म्हणजे मुंबईत आल्यानंतर शिष्टाचार म्हणून आपण स्वागताला गेलो होतो व निरोप देण्यासही गेलो होतो. मात्र सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यात आली. त्याठिकाणी राज्याची मागणी म्हणून गॅस व कोळशाची मागणी केली. त्याचा गरअर्थ काढण्यात आला.
सार्वजनिक कार्यक्रमात एखाद्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून पदावरील व्यक्ती उपस्थित नसते हेच या मंडळींना अद्याप समजलेले नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, वेगवेगळ्या घटनामध्ये राज्याच्या प्रमुखांना अवमानित करण्याचे उच्च पातळीवरील ठरवून केलेले राजकारण असल्याचा संशय येण्यासारखी स्थिती आहे. नागपूरच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्यामागे हेच कारण आहे. त्यामुळेच आपण नागपूरला जाण्याचे टाळले. मुंबई येथे दोन दिवसानंतर मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना आमंत्रित करण्यात आले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.    
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत सिंचन प्रकल्पांची चौकशीची मागणी झाली आहे का, असे विचारले असता, याबाबत आपण अद्याप माहिती घेतली नसल्याचे सांगत उत्तर देण्याचे टाळले. चंद्रपूर जिल्’ाातील मारण्यात आलेला वाघ नरभक्षक होता की नाही याबाबत अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय निश्चित आहे. काँग्रेसने मागील निवडणुकीत वाटय़ाला असणाऱ्या जागांसाठीच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सर्व जागासाठी चाचपणी झाली हे जरी खरे असले तरी आघाडी होणार हे निश्चित असल्याचे सांगत काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
‘वैफल्यग्रस्त शिवसेनेकडून भ्याड हल्ले’
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीच्या प्रकाराचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. जिल्ह्य़ातही अनेक ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध केला. या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटेल आहे की, थोरात हे राज्यातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. राज्यात त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो. ते जनतेचे नेते आहेत. वैफल्यग्रस्त शिवसेनेने हा भ्याड हल्ला केला आहे. काँग्रेस आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक चांगले निर्णय झाले. राज्य सरकारने हे निर्णय घेतल्यामुळे विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. त्यामुळेच राज्यातील वरिष्ठ व कर्तबगार मंत्र्यांवर अशा प्रकारचे हल्ले त्यांनी सुरू केले आहेत, असे चव्हाण म्हणाले.
या घटनेबाबत स्वत: थोरात म्हणाले, आपण नेहमी पुरोगामी विचाराचे आणि सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे राजकारण केले. आजची घटना म्हणजे एक विकृत कृती आहे. यामागे दुसराच कोणीतरी आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा उन्माद त्यांना चढला असून त्यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे. आता जनताच अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवेल. असे असले तरी आपण सर्व कायदा व सुव्यवस्था पाळणारे आहोत. त्यामुळे जनतेला त्रास होईल, कोणाच्या मालमत्तेचे नुकसान होईल अशी कृती करू नका. सर्वानी संयम व शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
नगर शहरात निषेध
थोरात यांच्यावर झालेल्या ‘शाईफेकीच्या हल्ल्याचा’ काँग्रेसचे नगरचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी निषेध केला आहे. अशा भेकड प्रकारांनी प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस कार्यकर्ते गांधीवादी विचारांचे असल्याने ते या प्रकाराला अहिंसेच्याच मार्गाने योग्य ते उत्तर देतील, थोरात हे अजातशत्रू असताना असे भ्याड प्रकार घडवले जातात, हे निंदनीय आहे, असे सारडा यांनी म्हटले आहे.