सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
सिंचन घोटाळ्याची चौकशी केलेल्या चितळे समितीने अजित पवार व सुनील तटकरे या जलसंपदा विभागाच्या तत्कालीन मंत्र्यांना ‘क्लीन चिट’ दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. पण या दोघांच्याही उघड चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरकारकडे परवानगी मागितली आहे. यावरून सिंचन घोटाळ्यात पवार व तटकरे यांचा संबंध असल्याचे स्पष्ट होते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने चौकशीची मागणी करण्याची भाजपची पूर्वनियोजित योजना असल्याचा आरोप केला आहे.मागणी करणारे हे भाजपशी संबंधित संघटनेत पूर्वी काम करीत होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.