भाजपच्या काही आमदारांवर दंगलप्रकरणी ठपका ठेवण्यात आला असला, तरी त्याचा आपल्या निवडणुकीतील यशावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजितसिंग यांचा बालेकिल्ला असलेल्या बागपत मतदारसंघातून निवडणूक लढण्याची सत्यपालसिंह यांची इच्छा आहे. विकासाच्या मुद्दय़ावर आपण ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या दंगलींनंतर या मतदारसंघातील जनतेच्या मनात विशेषत: मुस्लीम आणि जाट समाजामध्ये कटुतेची भावना निर्माण झाली आहे, हे सत्यपाल यांनी मान्य केले. मात्र आपण विकासाच्या मुद्दय़ावरच भर देणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात सत्यपालसिंह यांनी
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
मुस्लीम समाजाकडून आपल्याला प्रतिसाद मिळत आहे, प्रत्येकाला विकास हवा आहे, मात्र काही जणांच्या मनात काय आहे त्याची आपल्याला कल्पना नाही. वीज, रस्ते आणि उद्योगधंदे आल्यास त्याचा लाभ सर्वानाच होईल, काही शिक्षकांनीही आपल्याला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.