काँग्रेस संस्कृतीत नेतृत्वाचे गुणगान गायचे किंवा नेतृत्वाचे चुकले तरीही ब्र काढायचा नाही ही कला नारायण राणे यांना अगदी गेल्या महिन्यापर्यंत बहुधा अवगत नसावी. पण राजीनामा नाटय़ानंतर राणे बरेच काही शिकलेले दिसतात. कारण राहुल की प्रियंका या वादग्रस्त प्रश्नावर मतप्रदर्शन करण्याचे टाळून राणे यांनी विलंबाने का होईना पण काँग्रेस संस्कृती आत्मसात केल्याचे शुक्रवारी बघायला मिळाले.
भविष्यातील पराभवाचे वाटेकरी व्हायचे नाही, असे सांगत राणे यांनी गेल्या महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण तीन आठवडय़ांत राणे यांचे मन परिवर्तन झाले आणि त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्याची बक्षिसी म्हणून आगामी निवडणुकीसाठी प्रचार समितीचे अध्यक्षपद राणे यांच्याकडे सोपविण्यात आले. राणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समितीची पहिली बैठक टिळक भवनात पार पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अन्य नेते तिला उपस्थित होते. प्रचार कसा करायचा यावर अभिनेत्री नगमा यांच्यासह अनेकांनी वेगवेगळी मते मांडली.
बैठकीची माहिती पत्रकार परिषेदत देताना आज राणे यांनी नेतृत्वाची बाजू उचलून धरली. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवणाऱ्या राणे यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे समर्थन केले.
१ सप्टेंबरला प्रचाराचा आरंभ
काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात १ सप्टेंबरला हुतात्मा चौकातून होणार आह़े  त्या दिवशी मशाली पेटवून त्या राज्यभर पाठविल्या जातील. बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
मोदींविरोधात आक्रमक
भाजपने प्रचाराच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. महागाई वाढली, रेल्वे दरवाढ झाली. भाजप नेत्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हे आपण लोकांसमोर उघड करू, असा इशाराही राणे यांनी दिला.