काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेवर जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचे नेते यासिन मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेला फुटीर शक्तींमुळे खीळ बसल्याचा निष्कर्षही मलिक यांनी फेटाळून लावला आहे.
काश्मीरचे फुटीर नेते पाकिस्तानी अधिकाऱ्यांची गेल्या २४ वर्षांपासून भेट घेत असून तसा प्रघात आहे. जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान अथवा परराष्ट्र सचिव भारतभेटीवर येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रियेला आम्ही खीळ घातली, असे म्हणणे अयोग्य आहे.
उलटपक्षी आम्ही शांतता प्रक्रिया अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यामुळे सर्वाना आपली मते मांडता येत आहेत, आम्ही त्रयस्थ नाहीत, काश्मिरी जनतेला त्यांच्या भवितव्याशी निगडित कोणत्याही चर्चेत सहभागी करू घ्यावयास हवे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान आम्हाला कोणताही राजनैतिक अथवा राजकीय लाभ देणार नाहीत, मोदींनी कठोर भूमिका घ्यावयाचे ठरविले तेव्हा आम्ही काश्मिरी लोकांनी आमची चळवळ अधिक बळकट करण्याचे ठरविले आहे, असेही मलिक यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील मुलाखतीत स्पष्ट केले.