भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मुलाखत दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आल्यानंतर त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मुलाखतीवरून निर्माण झालेल्या वादाची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे किंवा नाही या बाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात येणार असल्याचे प्रसार भारतीने स्पष्ट केले आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शन ही सरकारी प्रसिद्धिमाध्यमे असून ती स्वायत्त असलेल्या प्रसार भारतीच्या नियंत्रणाखालील आहेत. सरकारी प्रसिद्धीमाध्यमावरून मोदी यांची मुलाखत प्रसारित झाल्याने वाद निर्माण झाला आहे. दूरदर्शनच्या वतीने २६ एप्रिल रोजी मोदी यांची मुलाखत घेण्यात आली आणि ती दुसऱ्याच दिवशी प्रसारित करण्यात आली. मात्र मोदी यांनी प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्याबद्दल केलेली विधाने या प्रसारणातून वगळली असली तरी समाजमाध्यमां-वरून जाहीर झाल्याने वाद निर्माण झाला आहे.
संपादित मुलाखत प्रसारित करण्यात आल्यामुळे आपल्याला आणीबाणीच्या काळाचे स्मरण झाल्याचे मोदी यांनी नमूद केल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची लक्षणे दिसत आहेत. तर प्रसार भारतीच्या कारभारात सरकार हस्तक्षेप करीत नसल्याचे स्पष्टीकरण माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी दिले आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे किंवा नाही याचा निर्णय सोमवारी त्याबाबतच्या दस्तऐवजाची तपासणी केल्यानंतर घेण्यात येईल, असे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार यांनी सांगितले. सिरकार यांनी प्रसार भारतीच्या सदस्यांना पत्र लिहिले आहे. मोदी यांची मुलाखत प्रसारित करण्यात आल्यानंतर सरकारी प्रसिद्धीमाध्यमाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत, असे सिरकार यांनी पत्रात म्हटले आहे.
तथापि, मुलाखतीमधील भाग जाणूनबुजून संपादित करण्यात अथवा वगळण्यात आलेला नाही, असे दूरदर्शन न्यूजच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जेथे संपादन करण्यात आले आहे ते तांत्रिक कारणास्तव करण्यात आले, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, व्यावसायिक स्वातंत्र्य टिकविण्यासाठी दूरदर्शनला झगडावे लागत असून त्यामुळे आपल्याला आणीबाणीच्या काळाचे स्मरण झाले असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद अधिकच पेटण्याची लक्षणे दिसत आहेत. माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी, सरकार प्रसार भारतीच्या कारभारात हस्तक्षेप करीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.