विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची विधिमंडळाचे २ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी नियुक्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी जाहीर केले. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत मार्च महिन्यात संपली.  या सदस्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी सहा जणांची नियुक्ती केली जाते. काँग्रेस व राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी आहे.
एलबीटीबाबत फेरविचार
स्थानिक संस्था करास (एलबीटी) व्यापारी वर्गाचा असलेला विरोध लक्षात घेता या कराच्या वसुलीबाबत फेरविचार करण्याकरिता समिती नियुक्त करण्यात आली आहे. व्यापारी वर्गाने व्हॅटबरोबर एक टक्का कर आकारण्याची मागणी केली असली तरी दोन ते अडीच टक्के कराची आकारणी करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आनंदीबेन पटेल याच मोदींच्या वारसदार?
अहमदाबाद:गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू सहकारी आणि राज्याच्या महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांची गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोदी हे बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देणार असून नव्या नेत्याच्या निवडीसाठी सत्तारूढ आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासह मोदी यांचे निकटचे सहकारी अमित शहा, ज्येष्ठ मंत्री नितीन पटेल, सौरभ पटेल आणि पक्षाचे राज्य सरचिटणीस भिकुबाई दलसानिया यांची नावे चर्चेत आहेत. आनंदीबेन पटेल यांची निवड झाल्यास त्या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील.
जितन मांझी यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
पाटणा:बिहारचे ३२वे मुख्यमंत्री जितन मांझी आणि त्यांच्या १७ सदस्यांच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी राजभवनात शपथ घेतली़  बिहारचे राज्यपाल डी़ वाय़  पाटील यांनी त्यांना छोटेखानी कार्यक्रमात शपथ दिली़  तसेच २३ मे रोजी सभागृहात विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे निर्देशही या वेळी राज्यपालांनी दिल़े  मांझी यांच्या नव्या मंत्रिमंडळात नितीशकुमार शासनातील सर्व मंत्र्यांचा समावेश आह़े बिहारमधील सत्तारूढ जद(यू)ला दिलेला बिनशर्त पाठिंबा कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.बिहारमधील भाजपच्या दोन बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विजयकुमार मिश्रा आणि राणा गंगेश्वर सिंग यांनी राजीनामे सादर केले.
उत्तर प्रदेशात सपा, बसपाची झाडाझडती
लखनौ: लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षातील, राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या ३६ जणांची हकालपट्टी केली आहे. तर निवडणुकीत एकही जागा न मिळाल्याने संतप्त झालेल्या बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी राज्यातील पक्षातील सर्व शाखा विसर्जित केल्या आहेत.