गेल्या वर्षी काँग्रेस सरकारने सचिन तेंडुलकर व वैज्ञानिक सी.एन.आर. राव यांना भारतरत्न दिल्यानंतर आता भाजपप्रणीत एनडीए सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना यंदाच्या वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.
वाजपेयी हे एक कुशल राजकारणी मानले जातात व त्यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. गृह मंत्रालयाने भारतरत्नसाठी शिफारस केलेल्या पाच नावांमध्ये अटलबिहारी वाजपेयी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा समावेश असल्याचे समजते. नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनीच या दोघांच्या नावाची घोषणा भारतरत्न या सर्वोच्च सन्मानासाठी करणार हे जवळपास निश्चित आहे.
चार दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने भारतरत्नची पाच पदके तयार करण्याचा आदेश भारत सरकारच्या टांकसाळीला दिला आहे. पाच पदके तयार करण्यास सांगितले याचा अर्थ पाच जणांना भारतरत्न मिळणार असा मात्र मुळीच नाही, काही पदके राखीव ठेवली जाणार आहेत. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाच्या नियमानुसार वर्षांला तीनपेक्षा जास्त भारतरत्न देता येत नाहीत.