पब, मद्य हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे, असे वक्तव्य गोव्यातील भाजप आमदार विष्णू वाघ यांनी केल्याने नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. संस्कृती आणि धर्माच्या नावाखाली यावर बंदी घालणे चुकीचे असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बिकनीवर बंदी घालण्याचे जे वक्तव्य केले होते त्याच्या निषेधार्थ विधानसभेच्या अधिवेशात २२ जुलै रोजी आपण धोतर परिधान करणार असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले. ढवळीकर यांच्या मताशी आपण सहमत नाही. ढवळीकर यांचे पूर्वज धोतर परिधान करीत होते, तोच कित्ता त्यांनी गिरवावा, असा सल्लाही वाघ यांनी दिला. धर्माच्या नावाखाली पब आणि मद्याला विरोध कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
आमदाराविरुद्ध  मारहाणीचा गुन्हा
बंगलोर:मध्यरात्री एका बारमध्ये पार्टी करत असताना रोखल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आमदार आणि त्याच्या समर्थकांनी दोन पोलिसांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री एक वाजल्यानंतर बार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस तेथे गेले. त्या वेळी आमदार विजयानंद काश्यपनवर आणि त्यांचे समर्थक तेथे होते. त्या वेळी पोलिसांनी त्यांची छायाचित्रे घेताच धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर कुबन पार्क येथील निरीक्षकालाही तक्रार घेऊ नका अशी धमकी या आमदाराने दिल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. गृहमंत्री जॉर्ज यांना या घटनेची माहिती देऊ, मात्र आपण धक्काबुक्की केलेली नाही असा दावा काश्यपनवार यांनी केला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीयांसमवेत आपण गेलो होतो, असा युक्तीवादही त्यांनी केला आहे.
‘काँग्रेस कार्यकाळातील नोकरभरती घोटाळय़ाची चौकशी’
भोपाळ :‘मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ’ (एमपीपीईबी) घोटाळाप्रकरणी विरोधकांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घेरले असतानाच काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या सरकारी नोकरी भरतीतील अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश चौहान यांनी दिले आहेत.काँग्रेसच्या आरोपांना प्रतिहल्ला करण्यासाठी चौहान यांनी हे पाऊल उचलले आहेत. काँग्रेस तुमची विकेट घेण्यासाठी सज्ज आहे, असे त्यांना विचारले असता, ‘मी क्रिकेटमधली विकेट नाही, तर मी रामायणातील अंगदप्रमाणे आहे. काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आले तरीही ते माझे स्थान डळमळीत करू शकत नाही,’ असे चौहान म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकाळात नियम धाब्यावर बसवून अनेकांच्या भरत्या करण्यात आल्या. त्याची चौकशी राज्य सरकारकडून करण्यात येईल, असे ते म्हणाले.
लवकरच नवे राज्यपाल -राजनाथ
नवी दिल्ली :सरकार लवकरच राज्यपालांच्या रिक्त जागा भरेल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे. मात्र ७ जुलै म्हणजे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकापूर्वी त्या करणार काय, याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर आतापर्यंत चार राज्यपालांनी राजीनामा दिला आहे,  तर हंसराज भारद्वाज आणि देवानंद कोनवार यांनी या महिन्याच्या अखेरीस मुदत संपत आहे. काँग्रेस सरकारने नियुक्त केलेले काही राज्यपाल कायम राहण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची राज्यपाल म्हणून वर्णी लागण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यपालांच्या मुद्दय़ावर काँग्रेसने टीका केली होती.