राज्यात ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग करण्यासाठी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना सोबत घेणाऱ्या भाजपने आता आठवलेंना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यासाठी अनुकूलता दर्शवली असल्याचे समजते. राज्यातील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आठवलेंना तसे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येते.
नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्यालाही स्थान मिळावे यासाठी रामदास आठवले सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री राज्यातील महायुतीच्या खासदारांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी गडकरी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांशी आठवले यांची चर्चा झाली. त्यात आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्याबाबत भाजप अनुकूल असल्याचे संकेत त्यांना या नेत्यांनी दिल्याचे समजते. परंतु कॅबिनेटऐवजी त्यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.