बसपाच्या नेत्या मायावती यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची कामगिरी निराशाजनक असून हे सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना घटनाबाह्य़ आणि अर्निबध झाली असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजप जातीय तणावाचा आधार घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मायावती यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे रा. स्व. संघाच्या सदस्यांची घटनात्मक पदांवर वर्णी लावण्यासही त्यांनी हरकत घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांची खिल्ली  उडविण्याच्या प्रकारांवरही मायावती यांनी टीका केली असून भाजप आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या अशा अशोभनीय वर्तनामुळे संघराज्यीय रचना दुर्बळ होते, असे म्हटले आहे. रा. स्व. संघ पूर्वीपेक्षा अधिक अर्निबध झाला असून सरसंघचालकांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्यामुळे देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
सर्व नियम आणि पंरपरा धाब्यावर बसवून भाजप रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची घटनात्मक पदांवर वर्णी लावत असल्याने भविष्यात समस्या निर्माण होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.