बदलत्या काळानुसार निवडणुकीत आधुनिक प्रचारतंत्राचा आधार सगळेच पक्ष घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून यंदा देशभरात सुमारे पाचशे कोटी ‘एसएसएम’ पाठवून उमेदवार तसेच पक्षांकडून मतांचा जोगवा मागण्यात येत आहे. हे एसएमएस पाठवण्याचा वेग दरसेकंदाला सुमारे ८०० ते ९०० एसएमएस असा भन्नाट आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून सोशल मीडियासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एसएमएस, व्हॉइस एसएमएस, व्हिडीओ क्लिप, रिंगटोन आदींचा वापर सुरू आहे. यात एसएमएस आणि व्हॉइस एसएमएसचा मुक्तहस्ताने वापर होत आहे. देशात एसएमएस व व्हॉइस एसएमएस देणाऱ्या सात-आठ प्रमुख कंपन्या असून लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्याराज्यांमध्ये या सेवा देणारे वितरक निर्माण झाले आहेत. एका बडय़ा कंपनीच्या संचालकांच्या म्हणण्यानुसार राजकीय पक्षांकडून निवडणुकीनिमित्त किमान पाचशे कोटींहून अधिक ‘एसएमएस’ पाठविले जाणार आहेत. पिनॅकल टेलिसव्‍‌र्हिसेस, एसीएल, वेल्टी आणि नेटकेअर आदी बडय़ा कंपन्यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असून या कंपन्यांकडे मोबाइलचा डाटाबेस मोठय़ा प्रमाणात आहे.
उमेदवार अथवा पक्षांसाठी एसएमएस पाठविण्याची क्षमता, ते संबंधित ठिकाणी पाठविले जातात का, याची निश्चित माहिती पक्षांना व उमेदवारांना मिळते. नागपूरस्थित पिनॅकल टेलिसव्‍‌र्हिसेसकडे सुमारे शंभर कोटींच्या घरात एसएमएस पाठविण्याचे काम विविध राजकीय पक्षांनी सोपविले आहे. यात आम आदमी पार्टीपासून मनसेपर्यंत वेगवेगळ्या पक्षांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल आदी प्रमुख नेत्यांच्या सभांसाठी कोटीच्या घरात एसएमएस पाठविण्यात येतात. पक्षाशिवाय उमेदवारही मोठय़ा प्रमाणात या सेवांचा वापर करीत असून बहुतेक उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांमध्ये किमान एक कोटींच्या घरात मतदारसंघात एसएमएस तसेच व्हॉइस एसएमएस पाठविण्यावर भर देत आहेत.
राजकीय पक्षांनी २००५-०६ च्या सुमारास एसएमएस तंत्र प्रभावीपणे वापरण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठय़ा संख्येने एसएमएस पाठवण्यासाठी एका एसएमएसला तीन पैसे असा दर होता. २००९ च्या निवडणुकीत राजकीय पक्षांना याचे महत्त्व उमजून मोठय़ा प्रमाणात या सेवांचा वापर सुरू झाला आणि सरकारला यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा साक्षात्कार झाल्यामुळे एका एसएमएससाठी ७ पैसे कर (इंटरकनेक्ट चार्जेस) लावण्यास सुरुवात झाली. यातून सध्या मोठय़ा प्रमाणात एसएमएस पाठवायचे झाल्यास ९ ते १० पैसे प्रती एसएमएस असा दर झाला आहे. व्हॉइस एसएमएससाठी ३० सेकंदाला ३५ पैसे असा दर असून अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी दीड मिनिटांचा व्हाइस एसएमएस पाठविला होता. याशिवाय रिंगटोन आणि व्हिडीओही मोठय़ा प्रमाणात लोकांना पाठविण्यात येत आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नितीन गडकरी, आपच्या अंजली दमानिया आणि काँग्रेसचे विलास मुत्तेमवार याच्यासाठी एसएमएस पाठविण्याचे काम एकाच कंपनीकडून करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकाच कंपनीला काम देताना विश्वासार्हता ही गोष्टही लक्षात घेतली जाते.
’एसएमएस कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणात पाठविण्यात येणाऱ्या एसएमएसवर ‘ट्राय’चे बारीक लक्ष असते. ज्या मोबाइलमध्ये ‘डू नॉट डिस्टर्ब’ची सेवा असेल त्यांना एसएमएस पाठविता येत नाहीत.
’प्रचाराचे एसएमएस पाठविताना वैयक्तिक बदनामी अथवा अश्लील एसएमएस पाठविण्यास बंदी असून याचे उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीचा परवाना रद्द करण्याचा ‘ट्राय’ला अधिकार आहे.