राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेनाला पर्याय देण्यासाठी भारिप-बहुजन महासंघ, शेकाप, भाकप, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे काही गट यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील आठवडय़ात २८ ऑगस्टला त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्यात व्यापक राजकीय आघाडी उभी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मागील २००९ च्या विधानसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, शेकाप, यांनी एकत्र येऊन रिपब्लिकन डावी लोकशाही समिती (रिडालोस ) स्थापन केली होती. रिडालोसने त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगलीच दमछाक केली होती. रिपब्लिकन पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी, रिडालोसचे आठ उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर रामदास आठवले यांनी युतीशी हातमिळवणी केल्यामुळे रिडालोसचा प्रयोग अल्पायुषी ठरला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा डावे पक्ष व भारिपने एकत्र येण्याचे ठरविले आहे. दोन दिवसांपूर्वी माकप, भाकप, शेकाप, व जनता दलाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी राज्यात समाविचारी पक्षांची व्यापक आघाडी उभी करण्याबाबत चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांनीही त्याला दुजोरा दिला. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेनेला पर्याय देण्याचा प्रयत्न आहे, त्याबाबत डाव्या पक्षांशी बोलणी सुरु आहेत. २८ ऑगस्टला त्यासंदर्भात बैठक होणार आहे. त्यात व्यापक राजकीय आघाडी करण्याबाबत निर्णय होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.