१६ व्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याअंतर्गत देशातील ११ राज्यांमध्ये ११७ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. पुदुच्चेरी या एकमेव केंद्रशासित प्रदेशातही २४ तारखेलाच मतदान होईल. मतदानाच्या उर्वरित टप्प्यांपैकी हा सर्वात मोठा टप्पा असून २०७६ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतपेटय़ांमध्ये बंद होईल. या उमेदवारांमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी, मावळत्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, वादग्रस्त दूरसंचारमंत्री ए. राजा, अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांचे सुपुत्र कार्ती आदींचा समावेश आहे.
तामिळनाडूमध्ये भाजपचे इंद्रधनुष्य
तामिळनाडूतील सर्वच्या सर्व म्हणजे ३९ जागांवर गुरुवारी मतदान होणार आहे. भाजपने यंदा सहा स्थानिक पक्षांसह ‘इंद्रधनुष्य युती’ केली असून द्रमुक आणि अखिल भारतीय अण्णा द्रमुक या पक्षांशी भाजपचा कडवा मुकाबला होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीयमंत्री नारायण सामी, द्रमुक नेते वायको आणि टी. बाळू आणि माजी मंत्री दयानिधी मारन् आदी उमेदवारांचे भवितव्य मतपेटय़ांमध्ये बंद होईल.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही प्रतिष्ठेचा प्रश्न
उत्तर प्रदेशात गुरुवारी १२ जागांसाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी समाजवादी पक्षासाठी हे मतदान प्रतिष्ठेचे ठरेल यात वाद नाही. कारण पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव, त्यांच्या स्नुषा आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल गुरुवारी होणाऱ्या मतदानास सामोरे जात आहेत. या निवडणुकीत एकूण १८७ उमेदवार रिंगणात असून मथुरा येथून ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी व फरुकाबाद येथून परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद आपले नशीब अजमावत आहेत. बिहारमध्ये माजी नागरी उड्डाणमंत्री शहानवाझ हुसैन भागलपूरमधून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर कटिहारमधून निवडणुकीस सामोरे जात आहेत. येथे नक्षलवाद्यांच्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे.
आसामात पंतप्रधान मतदान करणार
आसामात ६ जागांवर मतदान होणार असून, १९९१ पासून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर दिसपूर मतदारसंघात मतदान करतील. हा येथील शेवटचा टप्पा असून या वेळी ७४ उमेदवारांचे भविष्य मतपेटय़ांमध्ये बंद होणार आहे. झारखंडमध्ये चार जागांसाठी मतदान होणार असून त्यात माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि बाबुलाल मरांडी विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.
दृष्टिक्षेपात सहावा टप्पा
*मतदानाचा टप्पा – सहावा
*एकूण राज्ये – ११
*केंद्रशासित प्रदेश – १
*उमेदवार – २०७६
*जागा – ११७
*मतदार – १८ कोटी
राज्ये
महाराष्ट्र (१९), तामिळनाडू (३९), बिहार (७), उत्तर प्रदेश (१२), पश्चिम बंगाल (६), जम्मू आणि काश्मीर (१), झारखंड (४), छत्तीसगढ (७), मध्य प्रदेश(१०), राजस्थान (५), आसाम (६)