गेले सुमारे दीड-दोन महिने घाम गाळलेला, चपला झिजवलेल्या, तोंडावर सतत हसू आणण्याने जबडा दुखू लागलेला, अपुरी झोप, वेळीअवेळी खाणेपिणे, संताप-निराशा अशा भावनांवर सतत नियंत्रण ठेवावे लागल्याने मानसिक कुचंबणा झालेली.. ही लक्षणे निवडणुकीला उभ्या राहिलेल्या सगळ्याच उमेदवारांना लागू पडतात. निवडणूक ही उमेदवाराची एक परीक्षाच.. मतदान पार पडल्याने ती आज पूर्ण झाली. मतदानाचा दिवस या सगळ्यातून सुटका करणारा दिवस. आजचा दिवस नेटाने पार पाडला की सुटलो! हुश्श! कसोटीच्या या शेवटच्या काही तासांत ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी मुंबई-ठाण्यातील काही  उमेदवारांसोबत होते. त्यांनी सादर केलेला हा ‘आँखो देखा हाल!’

उत्तर मध्य : पूनम महाजन
आत्मविश्वास, पण..
प्राजक्ता कासले
पूनम महाजन यांची मतदानाच्या दिवशीची फेरी आत्मविश्वास व त्यासोबत अस्वस्थताही दाखवत होती. वांद्रे ते विलेपार्ले मार्गे मातोश्री असा दौरा करत, पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत असताना पूनम महाजन कार्यकर्त्यांना सूचना देण्यापासून त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्थाही पाहात होत्या.
गुरुवारी कसोटीच्या दिवशी पूनम सकाळी ७.०० वाजताच घरातून बाहेर पडल्या. आदल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत काम केल्याचे श्रम चेहऱ्यावर यत्किंचितही दिसत नव्हते. सकाळी घरातून निघताना काय केलेत, असे विचारले असता, ‘निघण्यापूर्वी आईने औक्षण केले. नेहमीप्रमाणे देवासमोर हात जोडले. बाबांच्या फोटोला नमस्कार केला, बस्स एवढेच!’ – असे उत्तर त्यांनी दिले.
वरळी समुद्रकिनाऱ्याजवळच्या पालिका शाळेत भाऊ राहुल याच्यासोबत मतदान केल्यावर त्या गाडीत बसल्या तेव्हा ८.०० वाजले होते. तेवढय़ात त्यांच्या चुलतभावाला फोनवर ‘साहेबां’कडे जाण्याचा निरोप आला व रस्ता बदलून तिन्ही गाडय़ा गोपीनाथ मुंडे यांच्या घराकडे निघाल्या. मामांचा आशीर्वाद घेऊन वांद्रे येथे पोहोचताना, कोणीतरी चहाची आठवण केली. ‘कुठेतरी टपरीवर घेऊया’, असे सांगत पूनम महाजन यांनी पुन्हा फोनवर सूचना द्यायला सुरुवात केली.
एकहाती काम सांभाळत असलेल्या पूनम यांच्यासोबत मग वांद्रे येथे आशीष शेलार आले. मतदार यादीत नावच नाहीये, अशा तक्रारी ऐकत, मतदारांना नमस्कार करत प्रत्येक बूथवर त्या मतदान प्रतिनिधीची चौकशी करीत होत्या. सुपारी टँक शाळेत मतदानासाठी आलेल्या सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची त्यांची संधी मात्र थोडक्यात हुकली. वांद्रे इथल्याच शिवसेना शाखेत मग चहा-कॉफीचा कार्यक्रम झाला. गझधर बंदच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये गाडीतून न उतरता मतदारांशी संवाद सुरू झाला. दरम्यान, इतर बूथवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद सुरूच होता.
गुजराती मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडत असल्याने आनंद व्यक्त केला जात होता. वांद्रेहून सांताक्रूझपर्यंत गेलेल्या गाडय़ा मग स्टेशनजवळच्या स्कायवॉकखाली थांबल्या व गाडीमध्येच नाश्ता सुरू झाला. मात्र घडय़ाळाकडे पाहात आणि ‘मातोश्री’कडून येत असलेल्या फोनवरच्या निरोपाकडे लक्ष देऊन तो थोडक्यात आटोपता घेतला गेला. मातोश्रीच्या कडेकोट बंदोबस्तात पोहोचल्यानंतर १० मिनिटांचा विसावा घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह गाडय़ा बाहेर पडल्या. मतदान करून उद्धव ठाकरे पुन्हा मातोश्रीवर पोहोचले आणि मग पुन्हा गाडय़ा सांताक्रूझ-विलेपाल्र्याच्या दिशेने निघाल्या..
सुशेगात, निवांत!
दिवस गेला धावपळीत!
विचारपूस : कार्यकर्त्यांची आणि जखमी हवालदाराचीही!
ना चिडचिड, ना चिंता, शांत आणि निवांत ..!
आधी, एकला चलो रे.. नंतर कार्यकर्त्यांची साथ