जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्दय़ावरून कोकण पट्टय़ात शिवसेनेविरोधात मतांचे ध्रुवीकरण होण्यासाठी पावले टाकली जात आहेत. या मुद्दय़ावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली असून विधानसभा निवडणुकीत त्याचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने जैतापूर प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. या प्रकल्पाविरोधात स्थापन झालेल्या कृती समितीच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोआ) सत्ता आल्यावर या प्रकल्पाचा फेरविचार करून तो रद्द केला जाईल, अशी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला या पट्टय़ात चांगले मतदान झाले. या प्रकल्पासाठीचे भूसंपादन, अणुऊर्जेचा धोका, आंब्याच्या बागांवर होणारा परिणाम, पर्यावरणाचा धोका, आदी अनेक आक्षेप या प्रकल्पाबाबत घेण्यात आले आहेत. प्रकल्पातून खोलवर समुद्रात गरम पाणी सोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे माशांच्या उत्पादनावर परिणाम होऊन मच्छिमारी धोक्यात येणार आहे, अशी अनेक कारणे देत कृती समितीने प्रकल्पास विरोध केला होता आणि त्याला शिवसेनेने साथ दिली होती.
‘रालोआ’ चे सरकार केंद्रात आल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत बोलताना जैतापूर प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला ‘वाटाण्याच्या अक्षता’ लावल्या. मोदी यांनी सोमवारी भाभा अणुसंशोधन केंद्रात बोलतानाही अणुऊर्जेचे ठाम समर्थन करीत सर्व नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाचा कोणताही फेरविचार केला जाणार नाही, हे अधोरेखित झाले आहे.
आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने राजकीय व्यूहरचना केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्य़ातील मासेमारीला या प्रकल्पाचा त्रास होणार असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जैतापूर प्रकल्पाचे ठाम समर्थन करीत विरोध मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले होते. अनेक बैठकाही त्यांनी घेतल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेने राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्रही सोडले होते. राणे यांनी ठाकरे यांच्यावर आता टीका ‘प्रहार’ सुरू केल्याने विधानसभा निवडणुकीतही त्याला जैतापूरच्या निमित्ताने आणखी जोर चढणार आहे.
या प्रकल्पाच्या फेरविचाराचे लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन शिवसेनेने पाळले नाही, ही प्रचारमोहीमही तीव्र होण्याचे संकेत आहेत. युतीतील जागावाटपाच्या सूत्रानुसार रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील बहुतांश जागा शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाविरोधातील जनमताचा फटका शिवसेनेला अधिक बसण्याची चिन्हे आहेत.