गत निवडणुकीत ३ लाख ८९ हजार मतांनी जिंकलेल्या सुषमा स्वराज आणि राघोगडच्या राजघराण्याचे लक्ष्मण सिंह यांच्यातील द्वंद्व विदिशात रंगणार आहे. लक्ष्मण सिंह हे काँग्रेसचे सरचिटणीस ‘वाचाळवीर’ दिग्विजय सिंह यांचे बंधू. विदिशा हा भाजपसाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ मानला जात असून, यंदा चार लाखांचे मताधिक्य मिळावे यासाठी स्वराज यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. गेल्या वेळी जरी ३ लाख ८९ हजार मते मिळाली असली तरीही ‘त्या’ ११ हजार मतांचे महत्त्व काही औरच असते, त्याने प्रतिपक्षावर मानसिक दडपण येते आणि तेच आणण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. काँग्रेसमध्ये मात्र पक्षांतर्गत कलह सुरू आहेत. सुरुवातीस काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेले मागील उमेदवार राजकुमार सिंह यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली होती. राजकुमार हे भाजपलाच मदत करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी येथील चित्र फारसे आश्वासक नाही. त्यातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून विजय मिळवल्याने भाजपसाठी हे सुचिन्ह आहे.
सुषमा स्वराज
*भाजपसाठी परंपरागतदृष्टय़ा सुरक्षित मतदारसंघ
*नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उत्साहवर्धक निकाल
*रोजगार आणि शाश्वत विकासाबद्दल जनमनांत असलेली नाराजी
*मतदारसंघातील काही ठिकाणी असणारे पायाभूत सुविधांचे प्रश्न
लक्ष्मण सिंह
*राजकुमार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसच्या मतविभाजनास चाप
*काँग्रेसने आपली संपूर्ण ताकद प्रचारासाठी वापरणे
*मतदारसंघातील गावागावापर्यंत भाजप पोहोचलेला असणे
*डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पानिपत