बिहारमधील सरण मतदारसंघ गेल्या वेळी नव्याने निर्माण झाला आहे. यापूर्वी तो छप्रा मतदारसंघ होता. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यापूर्वीच्या दोन मतदार संघात येथून विजयी झाले. मात्र यावेळी चारा घोटाळ्यामुळे लालू आपोआप रिंगणाबाहेर गेले. त्यामुळे त्यांच्या पत्नी राबडीदेवी येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी पुन्हा रिंगणार आहेत. त्यांनीही येथून यापूर्वी विजय मिळवला आहे. सरणमध्ये विकासाचा अभाव हा प्रमुख मुद्दा. या मतदारसंघात यादव, राजपूत त्याचबरोबर दलित मतदारांची संख्या मोठी आहे. राबडी देवी आणि रुडी यांच्याखेरीज संयुक्त जनता दलाने सलीम परवेझ यांना मैदानात उतरवले आहे.
लालू प्रसादांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही लढाई अस्तित्वाची आहे. राबडीदेवींचा पराभव झाला तर लालूप्रसादांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. यावेळी संयुक्त जनता दल आणि भाजपची फाटाफूट झाल्याने लालूंना विजयाची आशा आहे, तर रुडींनी मतदान केंद्रनिहाय कुठल्या समुदायाची किती मते आहेत याचा अभ्यास करून निवडणूक व्यवस्थापन केले आहे. यादव विरुद्ध रजपूत असे या निवडणुकीला स्वरूप आले आहे. राबडीदेवी जरी रिंगणात असल्या तरी लालूप्रसाद विरुद्ध राजीवप्रताप रुडी असाच हा सामना आहे.
राबडी देवी
*भाजप-जनता दल युती तुटल्याने मतविभागणीचा फायदा मिळण्याची शक्यता
*लालूप्रसादांनी यापूर्वी प्रतिनिधीत्व केल्याने फायदा
*दलित मते मोठय़ा प्रमाणात भाजपला जाण्याचा अंदाज
*लालूप्रसादांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवल्याने मतदारांच्या नाराजीचा फटका.
राजीवप्रसाद रुडी
*केंद्रात महत्त्वाचे खाते मिळाल्यास विकासाला हातभार लागेल असा प्रचार
*राज्यात मोदी प्रभावाचा फायदा मिळेल अशी अपेक्षा
*संयुक्त जनता दलाशी युती नसल्याने मतविभागणीचा फटका
*चित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चेत भाग घेणारा नेता अशी रुडींची प्रतिमा त्रासदायक.