मोदी लाट, सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी आणि सहा पक्ष व संघटनांना एकत्र आणून महायुती घडविल्याने आम्हाला राज्यात मिळणाऱ्या मतांची संख्या चांगलीच वाढणार असून ३५ हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांना फायदा होण्यासाठी राज्यभरात मतदारयादीतून सुमारे ५७ लाख नावे वगळण्यामागे नोकरशहांचे षड्यंत्र असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.                        
भाजप-शिवसेना युतीला २००४ मध्ये ४२.७३ टक्के मते मिळाली होती व २५ जागा मिळाल्या होत्या, तर २००९ मध्ये मतांमध्ये घट होऊन ३५.१७ टक्के मते मिळाली व जागा २० मिळाल्या होत्या. सहा ते सात टक्के मते कमी झाल्याने पाच जागांचा फटका बसला होता. मनसेला गेल्या निवडणुकीत ४.६ टक्के मते मिळाली होती. भाजप-शिवसेना युतीसोबत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), स्वाभिमानी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम पक्ष आहे. सत्ताधारी आघाडीला एक कोटी ४३ लाख मते होती, तर भाजप-शिवसेनेला एक कोटी २९ लाख मते होती. महायुतीतील घटकपक्ष वाढल्याने १० लाख मते वाढली आहेत, असे मुंडे म्हणाले.
 बीड मतदारसंघात आंधळे गावात भाजप कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार झाल्याने तेथे फेरमतदान घेतले जाणार आहे. तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागणीवरून फेरमतदान होत आहे. आम्ही सहा ठिकाणी फेरमतदानाची मागणी केली असून त्यावर मात्र निर्णय झालेला नाही.