साताऱ्यात मतदान केल्यानंतर बोटावरची शाई पुसून मुंबईत मतदानाला येण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सल्ल्या’मुळे मुंबईतील पश्चिम महाराष्ट्रीय मतदारांवर लक्ष ठेवले जात असतानाच मुंबई-नवी मुंबईत राहणाऱ्या गुजराती, मारवाडी समाजातील काही मतदारांनी ‘दुबार’ मतदानाचा बेत आखल्याची खात्रीलायक बातमी हाती पडली आहे. येत्या २४ एप्रिलला मुंबई, ठाण्यातील मतदान आटपून ही मंडळी ३० एप्रिल रोजी कच्छ, सौराष्ट्र आणि राजस्थान येथील आपल्या गावी जाऊन मतदान करणार आहेत. अशा मतदारांच्या बोटांवरची शाई पुसण्याचे रसायन बनवण्याची जबाबदारी एका गुजराती उद्योजकाने घेतल्याचीही चर्चा आहे.  
मुंबईतील मलबार हिल, वाळकेश्वर, मुंबई सेंट्रल, कांदिवली, बोरीवली, घाटकोपर, मुलुंड, परळ, माटुंगा या उपनगरांमध्ये तर ठाण्यात मिरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई या भागातही गुजराती-मारवाडी समाजातील नागरिकांची संख्या मोठी आहे. ठाण्यात जवळपास दोन लाख ८० हजार मतदार या समाजाचे आहेत. या समाजाचा भाजपला मोठा पाठिंबा आहे. यापैकी अनेकांची नावे त्यांच्या मूळ गावीही यादीत कायम असल्याचे मेघजी सावजी चौधरी या गुजराती तरुणाने सांगितले. चौधरी यांचे ऐरोली सेक्टर १६ येथे यादीत नाव असून कच्छमधील रापर गावातही यादीत (मतदान अनुक्रमांक टीजेटी १७६७८ ६२, गुजरात) त्यांचे नाव आहे.
मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी गुजरातमधील सर्व जाती, धर्माचे आणि प्रातांचे मतदार एकटवले आहेत. आम्ही येथील मतदान आटपून मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी गुजरातला जाणार आहोत, असे तिकडे जाणारे १५ हजार तरुण तयार आहेत.
अश्विन रुपारेल, वाशी

एप्रिल मे महिन्यात गुजरात राजस्थानला गावी जाणाऱ्या प्रवाशांची दरवर्षी संख्या जास्त असते पण या वर्षी ती वाढली असून आम्ही तीन गाडय़ा वाढवल्या आहेत. त्यात २४ एप्रिल नंतर जाणारे प्रवाशी जास्त आहेत. या काळात गुजरातला जाणाऱ्या २२ रेल्वे गाडय़ा आणि विमानांचे आरक्षण झालेले आहे.     
पप्पू, इगल ट्रॅव्हल्स