गुजरातमधील २००२च्या दंगलींमध्ये मी बघ्याची भूमिका बजावलेली नाही. आजही माझ्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये अत्यल्प तथ्य जरी आढळले, जर मी दोषी असल्याचे स्पष्ट झाले तर माल फाशी द्या, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी २००२ मधील गुजरात दंगलींबाबत केल्या जाणाऱ्या आरोपांनी प्रत्युत्तर दिले. या कालावधीत अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिले. मात्र सत्य समजून घेण्याची त्यांची इच्छा नव्हती, अशी भावना त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
या दंगलींबाबत अनेक कपोलकल्पित बातम्या पसरवून त्याचा संबंध आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला जे काही सांगायचे होते ते सांगितले. आता जनतेच्या न्यायालयात असून, त्यांचा निकाल ऐकण्यासाठी उत्सुक आहे, असे ते म्हणाले.  प्रसारमाध्यमांनी आपली प्रतिमा मलीन केली नसती तर मोदी कोण आहेत हे माहितही झाले नसते, अशी कोपरखळी त्यांनी मारली. मोदी पंतप्रधान झाले तर वृत्तपत्रांचे संपादक पळून जातील, असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले होते. गुजरातमध्ये गेली १४ वर्षे भाजपचे सरकार आहे, मात्र कोणी भीतीने सोडून गेले असल्यास सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.
देशाच्या इतिहासात काँग्रेसची कामगिरी सर्वात खराब असेल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्वोत्तम कामगिरी करेल, असे भाकीतही मोदींनी वर्तवले. मुस्लिम पद्धतीची टोपी घालण्यास नकार का दर्शविला, या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला लांगूलचालन आवडत नाही. आणि टोपी घातली नाही याचा अर्थ एखाद्या धर्माबद्दल आकस आहे, असा होत नाही, असे मोदी म्हणाले. रॉबर्ट वधेरा यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही, मात्र त्याचवेळी राजकारण्यांविरोधातील खटले प्रलंबितही ठेवणार नाही असे आश्वासनही मोदींनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.  सध्याची लाट भाजपची आहे. मोदी पक्षापेक्षा कधीही मोठे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माफी मागून प्रश्न सुटतात का ?
गुजरात दंगलींबाबत आपण क्षमायाचना करणार का, या प्रश्नास उत्तर देताना मोदी यांनी माफी मागितल्याने सगळे प्रश्न सुटतात का आणि त्यामुळे कोणाच्याही वेदना कमी होतात का, असा प्रतिसवाल केला. तसेच माफी मागणे आणि माफ करणे ही व्यवस्थाच अयोग्य असल्याचे सांगितले.